Home साहित्य आई नावाचं पान…..

आई नावाचं पान…..

0

हाताचं करून पाळणा आई रात रात जागते.
सुखी ठेव माझ्या बाळाला हे मागणे देवाकडे मागते.
कष्ट करू खूप दुखते पाठ आणि मान
खूप महत्त्वाचं असतं, आयुष्यामध्ये आई नावाचं पान.

नऊ महिने नऊ दिवस, सोसल्या अनंत कळा.
श्वासापर्यंत अखेरच्या असतो, आपलाच तिला लळा.
कान आतुरले आईचे ऐकण्या गाणं.
खूप महत्त्वाचे असते, आयुष्यामध्ये आई नावाचं पान.

आपण मोठं व्हावं, हे तिच्या जगण्याचं सार .
दहा रुपयांसाठी, काम केलं खाणीवर.
मोठ्या दिमाखात म्हणायची माझी मुलं माझी शान.
खूप महत्त्वाचं असतं, आई नावाचं पान .

दिवस रात्र आई, गाड्या वाळूच्या भरायची .
कितीही झाला धूर तरी,
भाकऱ्या चुलीवर करायची.
झाडाच्या सावलीत, झोप लागायची छान .
खूप महत्त्वाचं असतं, आयुष्यात आई नावाचे पान.

शब्दात गुंफून शब्द, शब्दही झाले मोती.
खूप मनापासून जपली, सगळी नातीगोती.
घर होत लहान परंतु काम तिचे महान.
खूप महत्त्वाचे असते, आयुष्यात आई नावाचं पान

नऊवारी साडी, आई चापून चोपून नेसायची.
नव्हती गंध पावडर तरी, खूप सुंदर दिसायची .
साधं भोळ रूप तिचं दिसायचं खुप गोजिरवाणं.
खुप महत्त्वाचं असतं, आयुष्यात आई नावाचं पान.

सुखी ठेव देवा तिला, जिने मला जन्म दिला.
संघर्षाची तिची कहाणी, रोज आठवते मला.
क्षणोक्षणी मला येते, आईची आठवण
खूप महत्त्वाचं असतं, आयुष्यात आई नावाचं पान.
आई नावाचं पान.

— रचना : भारती वसंत वाघमारे. मंचर, जिल्हा पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version