Home साहित्य आठवणीतील मदर

आठवणीतील मदर

0

थोर समाजसेविका भारतरत्न, नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त मदर तेरेसा यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलातून पोलीस उपअधीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या, सुनीता नाशिककर मॅडम सांगताहेत त्यांच्या सेवा काळातील एक अविस्मरणीय अनुभव…

मुंबईत विमानतळ सुरक्षा विभागात एके दिवशी रात्रपाळी कर्तव्य असताना मला आदेश मिळाला कि, संत मदर तेरेसा ह्या विमान प्रवास करत असून विमानात बसेपर्यंत त्यांना सुरक्षा द्यावयाची आहे.

मानवतेच्या करूणेची त्यागमुर्ती, माझं आदर्श व्यक्तिमत्व मला जवळून पहायला मिळणार याचा मला अतोनात आनंद झाला. क्षणात मला माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत आठवली. या मुलाखतीत एक प्रश्न मला असा विचारला होता की, नोबेल पुरस्कार मिळालेल्या एका महिलेचे नाव सांगा ? तक्षणीच मी मदर तेरेसा यांचं नाव सांगून त्या थोर सेवाव्रती माझ्या आदर्श आहेत, हे सांगितल्याचे आठवलं. आणि आज आपण त्यांना बघणार, त्यांच्या सेवेत राहणार याचा मला अतोनात आनंद झाला.

मी व माझे सहकारी अधिकारी पोलिस उप निरीक्षक रामोळे आम्ही दोघे संत मदर तेरेसा यांचे आगमन होताच त्या करूणेच्या मूर्तीस पाहूनच धन्य झालो. विमान सुटायला वेळ असल्याने त्यांना घेवून आम्ही स्वागत कक्षात गेलो.

संत मदर तेरेसा वयोमानानुसार थकल्या होत्या. पण चेहऱ्यावर तोच अथांग करूणेचा भाव ! त्यांना चरण स्पर्श केला. मी श्रांत झाले.

साधारणतः तासभर मला त्यांच्यासोबत थांबायला मिळाले. अर्थात वयोवृद्ध अवस्थेमुळे त्यांच्याशी संवाद साधता आला नाही. तरी देखिल एका अवर्णनीय अनुभूतीचा प्रत्यय आला. मी धन्य झाले.

खरंच, ज्या पोलिस दलामुळे ही संधी मिळाली त्या दलाची मी शतशः ऋणी आहे.

सुनिता नाशिककर

– लेखन : सुनिता नाशिककर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version