पुणे स्थित श्वेता गांधी यांचा अन्न पदार्थाचा व्यवसाय आहे. या बरोबरच त्यांना लिखाणाची आवड आहे. “न्युज स्टोरी टुडे” परिवारात त्यांचे स्वागत आहे. वाचु या त्यांच्या काही कविता.
— संपादक
1) शब्दांनाही होतात वेदना
तेव्हा शब्द भिडले काळजाला
जेव्हा शब्दांनी शब्दांवर वार केला
शब्दांची झाली अशी दुर्दशा
मिटली आता शब्दांची ही अशा
शब्दांनीच कधीतरी शब्दांना मारले
त्यांनीच कधीतरी शब्दांना तारले
आपलेपणाचे होते काही शब्द
अपशब्द पाहून शब्दच होतात निशब्द
असे शब्दांची बघून गाठ
कधी कधी शब्द फिरवतात पाठ
शब्दांच्या गाठीशी उरते निरव शांतता
उरलेल्या अशी गाठींची कोण करणार पूर्तता
शब्द होतात हे सर्व पाहून अगदी स्तब्ध
कारण शब्दांनाही असतो शब्दांचा प्रारब्ध
होतात मग शब्दांनाही वेदना
बोलतात शब्द, करू नका माझी वल्गना
तीव्र असते ही वेदनेची कळ
नाही भरून निघत वेदनेची झळ
द्या शब्दाना तुम्ही जरा पाठबळ
तरच संपेल आमच्या शब्दांची झळ.
2) पहाट
हो भागाळली आहे मी
ऐकणार का मानवा प्रार्थना
नको करूस ना अशी
नारीची रे वल्गना
जमीन माझी तप्त झाली
मलाही भेगे ती पडली
थकले माझे हे नयन
कधी तृप्त होणार सुलोचन
बाल्यावस्थेत च होत आहेत
मुलींवर ते अत्याचार
नका करू ना त्यांना असे लाचार
प्रत्येक जण देतो ना दोष
त्या वरुण राजावर काढतो रोष
मानवांचा कुठे गेला हा
माणुसकीचा नैतिक कोष
मी पण धरणी माता
आहे एक नारी
का होत आहे इथे
नैतिकतेची चोरी
हेच सर्व पाहून भागाळले मी
दुःखी कष्टी झाले आहे मी
पडल्या आहेत मला चिरा आणि भेगा
आता तरी हो ना रे मानवा जागा
नको होऊ असा तू कोडगा
नाहीतर नरकात काय
कुठेच मिळणार नाही तुला
मृत्यूनंतर जागा
त्रिशंकू सारखा फिरत राहशील
स्वतःला ह्याच्यातून कसे सोडवशील
करशील याचना तू मरणाची
म्हणून प्रार्थना ऐकून घे धरणीची
तरच होईल सुंदर उषःकाल
उधळेल नभात सुंदर गुलाल
सगळ्यांसाठी असेल ही नवी पहाट
प्रत्येक नारी चालेल मान करून ताठ.
3) प्रीत पावसाची
पावसाच्या अलवार सरीत
चिंब मी भिजते
तुझ्याच प्रेमाच्या वर्षावात
मनापासून मी थीजते
तीच तर सर पावसाची
दरवर्षी अचूक येते
उलघाल मनाची माझ्या
मग ह्याच वर्षी का होते
ये रे ये रे पावसा करत
तुझीच तर वाट मी पाहते
मनाचा विरोध झुगारून
तुलाच का मी पाहते
प्रत्येक थेंब सरीचा
मी अधीर होऊन झेलला
तुझ्याच आठवणीत
माझा प्रत्येक क्षण पहिला
अशी प्रीत पावसाची
नेहमीच असे फुलणारी
सरींचे गुंज ऐकत
मनाच्या हिंदोळ्यावर जगणारी
4) माझे गुरू
जिच्या पोटी घेतला जन्म
जीने दाखवले हे विश्व
जीने भरले श्वास हृदयात
ती माझी आई,
माझी पहिली गुरू
तिलाच सर्वप्रथम वंदन
जीने दिले हे मला जीवन
दुसरा गुरू माझे साई
जे आहेत माझ्या सोबत
ठाई ठाई
तिसरा गुरू माझा अनुभव
अनुभव ने खूप काही शिकवले
शाळेत जरी मी काना मात्रा शिकले
तरी अनुभवाने दाखवले मला जीवनात
मात्रा कुठे वाढवायची आणि कुठे कमी करायची
चौथा गुरु माझा आत्मविश्वास
कधी हरले तर कधी जिंकले
पण माझ्या आत्मविश्वासाने मला नेहमीच तारले
मला कधीच डगमगू नाही दिले
पाचवा गुरु माझे शिक्षक
ज्यांनी दिली मला अक्षर ओळख
ज्यामुळे मी लिहू आणि वाचू लागले.
— रचना : सौ श्वेता गांधी. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
