Home लेख आयुर्वेद कुतूहल ( ८ )

आयुर्वेद कुतूहल ( ८ )

0

वसंत ऋतुचर्या
साधाणपणे रथ सप्तमी नंतर सौर वसंत ऋतूची सुरवात होते, म्हणजे साधारण फेब्रुारीपासून ते मार्च हा काळ समजावा. वसंत ऋतू उत्तरायणात दुसरा ऋतु, ह्या ऋतूत थंडी ओसरून हळू हळू सूर्याची किरणे तीव्र होऊ लागतात आणि वातावरणात गरमीची चाहूल लागते. वातावरणात अनेक पुष्प, फुले ह्या काळात येतात नवं चैतन्य असते.
निसर्ग आपले रूप हळू हळू बदलतो जेणे करुन मानवी शरीरावर त्याचा अधिक त्रास होऊ नये, म्हणूनच वसंत ऋतू मध्ये रात्री आणि पहाटे गारवा असतो तेच दिवसा आणि दुपारी ऊन मात्र ग्रीष्म ऋतू सारखे असते.
ज्याप्रमाणे बर्फाळ भागात सूर्य किरणे पडल्यावर जसा बर्फ वितळतो अगदी त्याचप्रमाणे थंडी नंतर आलेल्या गरमी मुळे ह्या काळात आपल्या शरीरातील कफ पातळ होण्यास सुरवात होते. आणि आपल्याला कफ विकार उद्भवतात.
ह्याच काळात सर्दी, खोकला, घश्याला सूज येणे अश्या तक्रारी उद्भवतात दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना ह्या ऋतूत दम्याचे वेग येतात, ते ही छातीत कफ अधिक भरल्याने.
हया काळात गरम पाणी, हळद मीठ घालून अथवा मध घालून त्याच्या गुळण्या कराव्यात जेणेकरून हे त्रास आटोक्यात राहतील.
* म्हणूनच ह्या ऋतूत ऋतुचर्या हि कफ दोषाचे शमन व्हावे ह्या साठी तयार केली आहे.
* ह्या ऋतूत व्यायाम आणि उद्वर्तन म्हणजेच अंगाला उटणे लावणे ह्याला अत्यंत महत्व आहे, ह्याचमुळे शरीरातील अतिरिक्त कफ व मेद हे दोन्ही शरीरातून कमी होतात.
* कफ वाढल्याने ह्या काळात अग्निमांद्य होते. म्हणजेच आपल्या नेहमीच्या भुकेच्या तुलनेत काही अंशी भूक कमी लागते अशा वेळी अधिक मात्रेत केलेला आहार हा हानिकाराकच असतो. म्हणून ह्या ऋतूत आहार नेमका करावा. ह्यामध्ये अधिक शाररीक परिश्रम करणारे व्यक्ती येत नाहीत कारण त्यांच्या कामामुळे त्यांची पचनशक्ती चांगलीच असते व त्यांना भूकही चांगली लागते.
* कफाचे आधिक्य असल्यामुळे ह्या ऋतूत आहारात कडु, तिखट, तुरट रसाचे पदार्थ असावेत. तसेच आहार हलका असावा, पचायला जड असणारे पदार्थ अधिक खाऊ नयेत. पडवळ, कारली, दोडका, भोपळा अश्या फळभाज्या आहारात असाव्यात तसेच साळीच्या, ज्वारीच्या लाह्या, असे पदार्थ आहारात असावेत.
* ऋतू नुसार मिळणारी फळे, भाज्या ह्यांचा हि समावेश असावा.
* तहान लागल्यावर पाणी पिताना ते सहसा उष्णोदक म्हणजे कोमट पाणी असावे, जेणेकरून कफ वाढणार नाही व पचनशक्ती सुधारेल.
* ह्या काळात दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणे व्यर्ज आहे ह्यामुळे शरीरात कफ वाढतो असे आयुर्वेदाचे मत आहे. हि अट आजारी आणि वृद्ध व्यक्तींना लागू होत नाही.
* ह्या ऋतूत पहाटे आणि रात्री जरी गारवा असला तरी सकाळ दुपार ह्यात ऊन कडक असते म्हणूनच दुपारी बाहेर पडताना ह्या ऋतूत डोके झाकून बाहेर पडावे ह्यासाठी छत्री अथवा कपड्याचा वापर करावा.
* आयुर्वेदात स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी ह्या काळात निरोगी व्यक्तीने देखील वैद्याच्या सल्ल्याने वमन व नस्य हि पंचकर्मे जरूर करावीत ह्यामुळे पुढील रोगांना आळा बसतो. रोगी व्यक्तीनी वैद्याच्या सल्ल्याने ह्याचा लाभ घ्यावा.
वसंत ऋतू हा नवं चैतन्याचा ऋतु आहे आणि कफ दोष देखिल शरीरात नवं निर्मिती करतो फक्त त्याचं प्रमाण योग्य असावे एवढंच.
भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।

डॉ शार्दूल चव्हाण

– लेखन : वैद्य शार्दुल चव्हाण. एम. डी. आयुर्वेद

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version