Home साहित्य “ओठावरलं गाणं” (५३)

“ओठावरलं गाणं” (५३)

9

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. रेडिओ ऐकणाऱ्या श्रोत्यांनी आज जर हे गाणं ऐकलं तर त्यांना निश्चितच आपलं बालपण आठवेल, शाळेतले दिवस आठवतील, पाटीवर गिरवलेली “श्रीगणेशाय नमः” ही अक्षरं आठवतील. कारण आज आपण अशा एका गाण्याबद्दल बोलणार आहोत जे लिहिलं आहे कविवर्य योगेश्वर अभ्यंकर यांनी आणि गाण्याचे शब्द आहेत –

शाळा सुटली पाटी फुटली | आई मला भूक लागली

मित्रांनो, आठवलं ना तुमचं बालपण ? शाळा सुटल्यावर ही मुलगी आपल्या आईला सांगते आहे, “आई शाळा सुटल्याची घंटा झाली आणि घरी येण्यासाठी मी धावत सुटले कारण आई, काय झालं माहिती आहे का, मधल्या सुट्टीत खाल्लेली पोळीभाजी कधीच हजम झाली आणि आता मला काहीतरी खायला दे कारण मला खूप म्हणजे खूपच भूक लागली आहे.”

शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागूनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली

भूक लागली म्हणून मी घरी येण्यासाठी जोरात पळत सुटले आणि नेमकं नको तेच घडलं. जमिनीतून वर आलेल्या एका दगडाची ठेच माझ्या पायाला लागून मी धडपडले….आई माझं ढोपर फुटलं पण मला जास्त वाईट याचं वाटतंय की बाबांनी कालच, शाळेचा पहिला दिवस म्हणून अगदी कौतुकाने आणलेली पाटी सुध्दा फुटली…. अणि मी खाली पडल्यामुळे शाळेचा फ्रॉक तर मळलाच पण नवी कोरी पाटी फुटली हे मला आत्ताच समजलं….
तुझी शप्पथ आई !

धम्मक लाडू चापट पोळी
नको देऊ मज हवीच गोळी
किंवा दे ग खमंग चकली
दे ना लवकर भूक लागली

आई, आता तू डोळे वटारून आणि हात उगारून मला विचारते आहेस कि आता धम्मक लाडू हवा आहे की चापट पोळी हवी आहे….. म्हणजे पाठीवर गुद्दा हवा आहे की गालावर चापट हवी आहे ? पण आई मी पायाला ठेच लागून पडले आणि त्यामुळे पाटी फुटली यात माझा काय दोष बरं ? तू मला पाटी फुटली म्हणून शिक्षा कर हवं तर पण आत्ता मात्र धम्मक लाडू आणि चापट पोळी न देता मला मस्तपैकी गोड गोळी दे किंवा काल संध्याकाळी केलेली आणि माझा हात पोचू नये म्हणून उंचावर ठेवलेल्या डब्यातील खमंग चकली दे, कारण आई मला आत्ता खूप भूक लागली आहे.

सायंकाळी जाऊ दे मला
पटांगणावर खेळायला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ भूक लागली

आई, मला खाऊ दे, पण लगेच शाळेचा अभ्यास करायला सांगू नकोस बरं का, कारण आज मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर क्रिकेट खेळणार आहे, क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी आमच्या दोन्ही टीम्सदेखील तयार आहेत आणि मैदानावर सगळे माझी वाट पहात असतील. तू काल केलेली खमंग चकली मला खायला दे कारण चकलीचं नाव काढल्यावर पोटातले कावळे भुकेने काव काव करतायत. तेंव्हा मला तुझ्या हातची चकली खाऊ म्हणून दे आणि तो खाऊ खाऊन झाल्यावर मी मैदानावर खेळायला जाते.

ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे यांनी सुंदर चाल दिलेलं हे गाणं कुंदा बोकील यांच्या आवाजात ऐकताना आपलं मन आपसूकच बालपणीच्या आठवणीत रमून जातं आणि गाणं संपलं तरी मन मात्र शाळेच्या आठवणींमध्ये रममाण होतं.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

9 COMMENTS

  1. योगेश्वर अभ्यंकर यांच्या अनेक गाण्यांपैकी हे एक उत्कृष्ट बालगीत. याला श्रीनिवास खळे यांनी सुरेख संगीत दिले आहे. कुंदा बोकील या गायिकेने ते समर्थपणे सादर केले आहे. आपले रसग्रहण नेहमीप्रमाणेच वाचनीय झाले आहे. अशी असंख्य जुनी गाणी आजही लोकांच्या तोंडी ऐकायला मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version