1) पाऊस रॅप
किती केल्या विनंत्या
पण पडत नव्हता पाऊस,
शेतकरी झाला हैराण,
पेरायचा होता ऊस
पाऊस होता गायब,
एसीचं बिल वाढलं,
बिल भरायला
त्याने कर्ज काढलं
छत्री रेनकोट जूनमध्ये
नाय बाबा दिसले,
पावसाळ्यावर सारे
कवी पण रुसले
बादल-बिजली-बारखा ची
बैठक झाली ढगात,
पाऊस लागला कोसळायला,
दिसतोय ना रागात
शाळा बंद, रूळावर पाणी,
गटारात पडली माणसं,
चौपाटीवर तुफान पाऊस,
दिसेना भाजलेली कणसं
गटाराच्या सफाईचे
कोटी गेले वाया,
शिव्या-शाप देई तुम्हाला
सगळ्या आया-बाया
येरे माझ्या मागल्या,
नेहमीच येतो पावसाळा,
भजी खा गुमान,
आंदोलन नको करू बाळा
नेत्यासाठी संकट नसतं,
कोट्यवधींची येते माया,
नेते फोडण्यात व्यस्त सारे,
झोपा आता राया.
— रचना : गजाभाऊ लोखंडे. नवी मुंबई
2) धुडगूस ..
मुसळ धार पाऊस
घालू लागी धुडगूस
सूर्य गेला ढगाआड
उन्हाची रे धुसफूस
घामळल्या शरीरास
पुरे ओलीचिंब हौस
पाण्यां खाली गुडूप
रस्त्यां नसे मागमूस
हेंदाळणा-याढगाला
कुणीतरी लावे फूस
नो एन्ट्री कुठेच नसे
रे वाट्टेलं तिकडे घूस
छत्र्या अन् रेनकोट
चालू केवढा जुलूस
आईदाटते बाळाला
उगाचं नको भिजूस
अंदाज चुके पावसा
वावरा पेरणी उरूस
विनंती कळकळची
नको उगा बा रुसूस
झाडे भिंती घरे पडे
खूप जागी नासधूस
नुकसान कुठे किती
कराजरा विचारपूस
कृपाकरी सर्वांवरती
जरी विषारी माणूस
धर्म तुझा सोडायचा
विचार नको आणूस
–– रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
3) पर्जन्य ऋतू
बरसल्या सरी पावसाच्या
भिजवून माझे तनमन
गंध दरवळला मृत्तीकेचा
जाहले ऊर्जेने मन उन्मन…1
अमृतसरीच्या ऋतूमध्ये
मनसोक्त मी चिंब न्हाहते
नक्षत्राच्या जलसरीनी
कुंद हवेत मन गं रमते…2
पर्जन्यऋतू मनास मोहवी
गारवा त्याचा मज आवडे
ऋतू सर्वोत्तम मोदभरे जरी
कुणासनसे खरेतर वावडे…3
चिंबचिंब भिजूनी तयात
आनंदभासे तन मनाला
थेंबथेंब झेलूनी या देहात
ग्रीष्माचा दाह गं आटला…4
पर्जन्यवृष्टी भासे मज मोहक
उगवे चहुंकडे मऊ हिरवळ
विहरती जलात, हंस, बदक
आसमंतीवाहेरम्यवावटळ ..5
तरुलता झोकात डोलती
सजधजली नटूनी वसुंधरा
पक्षीगणं मोदे किलबिलती
आवेगे मिळे नदी सागरा…6
— रचना : सौ. मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
