Home साहित्य करू या अवयव दान…

करू या अवयव दान…

0

आजच्या अवयव दान दिनानिमित्ताने अवयव दान प्रबोधनाची ही छोटीशी काव्यसफर आपणासाठी सादर करीत आहे.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही।
दानात देह द्यावा, ते श्रेष्ठ कर्म आहे ।।
दान अवयवांचे, हे प्राण दान आहे।
नवजीवनी कुणाच्या, घट अमृते भरावे ।। १

अंधार नष्ट हो सारा, ज्ञान-धर्म उजळू द्या.
अंधश्रद्ध अज्ञानी मनी, ज्ञानदीप उजळू द्या
त्या अद्भुत प्रकाश लहरी, मनोमनी पसरू द्या
श्रेष्ठदान हे अवयवांचे, मनोमनी उमजू द्या !! २ !!

सूर म्हणतो साथ दे
दिवा म्हणतो वात दे
अवयवदान मागणाऱ्याला
सहकार्याचा हात दे. !! ३ !!

आभाळ म्हणत सावली दे
जमीन म्हणते पाणी दे
चळवळीला काय पाहिजे
संकल्पांची साथ दे. !! ४ !!

कावळा म्हणतो पंख दे
चिमणी म्हणते चोच दे
अवयवदान कार्यासाठी
साथ संगत राहू दे. !! ५ !!

पाउस दे, पाणी दे
पोटापुरती नाणी दे
जीवन उत्सव करण्यासाठी
ओठावरती गाणी दे. !! ६ !!

शक्ती दे बुद्धी दे
आरोग्याची वृद्धी दे
अवयवदानासाठी जनांना
माणुसकी सद्बुद्धी दे. !! ७ !!

श्वासा मागुन श्वास धावती तरीही साठा संपेना
किती राहिले आता बाकी, कधी कुणाला उमजेना
श्र्वास कुणाचे देह कुणाचा यांची जोडी जमवूया
गणित चुकले कोठे कैसे यमधर्माला उमजेना. !! ८ !!

राखोनिया देह उत्तम आरोग्ये
कुणासाठी त्याचे दान करी.
त्याचेविण दुजे पुण्य नाही जगी
व्रत जीवनाचे ध्यानी धरी !! ९ !!

गाणे सृजनाचे आला पाऊस घेऊन
तैसे सृजनाचे गाणे गाते अवयवदान
माती जाईल भिजून, तेथे अंकुरेल गाणे
हे अवखळ मन कधी घेईल शिकून !! १० !!

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर
सुगंध पसरुन त्याचा जीवन व्हावे अत्तर !! ११ !!

– रचना :  सुनील देशपांडे, नाशिक.
संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाऊंडेशन, नाशिक
व्हाईस प्रेसिडेंट, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई‌
सदस्य, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती, महाराष्ट्र शासन.
अवयवदान, विभागीय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय रोटरी विभाग क्र ३०३०.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version