Home साहित्य काही कविता

काही कविता

2

१. आंबा

फळांचा राजा हा
सांगते जरा थांबा
सान थोरांचा आवडता
नाव त्याचे आहे आंबा

आंब्याच्या पानाला
सर्व स्थानी असे मान
विवाह, वास्तू कलशात
घरावर शोभिवंत स्थान

दाराचे तोरण, पिक, शूक
गोडी येई जीवनात
प्रकार किती आंब्याचे
महत्व देई पुरणात

सरबत, पोळी, वडी,
श्रीखंड, लस्सी, शिरा
नाना प्रकार वर्णावे
चौदस दिनी पूजे एकवीरा

फोडी, रस, प्येय जणू
उन्हाळ्याची मेजवानी
आंबेडाळ, पन्हे, लोणचं
चाखता गाती नेत्र गाणी

हापूस श्रीमंताचा राजा
रायवळ, केशरी, बदामी
साऱ्या प्रकारांचा आस्वाद
तब्येतीचा ठरतो स्वामी

मुखावर तेज येतसे
फल आहार करा सेवन
पाहुणचार करते क्षणी
मन तृप्तीने होई पावन

२. जपू या आरोग्य

पोटासाठी नित्य भोजन
आरोग्यासाठी प्रभंजन
योगा, आहार नियंत्रण
सोबत हवे मनोरंजन

प्राचीन काळी ऋषीमुनी
हवा, फळं, खात वृक्षाखाली
निसर्गाच्या सान्निध्यात
योगमायेची रखवाली

फलाहार घ्यावा रात्रीस
सकाळी आहार भरपेट
वामकुक्षी घ्यावी केव्हा
प्रेम संवादण्या भेटा थेट

प्राणायाम,भ्रमरीने
नित्य करावा योगा
संतुलित,सात्विक आहार
विसरू साऱ्याच! रोगा

पालेभाज्या, कडधान्य
भाकरी सकाळ सायंकाळ
आरोग्य जपते धान्य अन्
भाषा असावी मवाळ

आरोग्य,शरीर मर्दन
मसाज करावा नित्य
तेल अंगी असे आवश्य
हाडे जपणे हेच सत्य

३. वहीची कोरी पाने

बालपणी शाळेत जावे
वहीचे कोरे पान पाही
शिक्षक! ये!आडमुठ्या!
जगायची तर ठेव ग्वाही

खेळ,कैऱ्या,चिंचांसाठी
चढावे वृक्षावरी भरभर
आई! शेती सांभाळा!
पोटापुरते शिकावे तर!

जन्मा आला हेला अन्
पाण्यात वाहत गेला
आयुष्य सारे संपले पण्
पानं अखेर कोरेच केले…

धन,गाडी,बंगला सौख्य
चार दिवसांचे महिमान
सरणावर जळताच वदे
व्यसनात बुडल ध्यान

कोरा कागद न केला काळा
शिक्कामोर्तब कागदावर
मुखी नाही घेतले हरिनाम
अंती काय लिहू कोऱ्या पानावर

सटवीचा टाक कुणा चुकला
खाली हात आला अन् गेला
मरावे परि कीर्ती रूप उरावे
दुर्गंध मातीत विरजला

कोरी पानं हसली खूप
भाळी काय लिहिले आहे..
अध्यात्माने तारले आज
म्हणून जो तो कौतुके पाहे


आयुष्याची सायंकाळ

दिवसाचे तीन प्रहर
शिकवते सायंकाळ
पाठी फिरते पडछाया
नाम स्मरावे त्रिकाळ

सायं प्रार्थना देते उर्जा
जगदंबा फिरवी हात
निद्रेसाठी घेई कुशीत
गोड स्वप्न आठवात

सांज होता येती भरभर
दिवसभराचे गणित
एकमेका सुसंवादात
होती सारेच प्रणित

सकाळ शिकवते कर्तव्य
सांज शिकवी दीप पूजन
मध्यान्ही तळपते तेज
तीन काळ शिकवी सृजन

एक शिकवी जन्मस्थान
दुजा देई जगण्याची शान
त्रिजा उघडी मोक्ष द्वार
तिन कालांचे महिमान

सांजवेळी हळदी कुंकू
सौभाग्याचे प्रतीक
दारापुढे रांगोळी शोभते
सदाबहार ते स्वस्तिक

शोभा कोठावदे

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. वा सर्व रचना छान आहेत. विशेष करून ‘वहीची कोरी पाने’ मला छान वाटली.👌👌

  2. वा छान सर्व रचना छान आहेत. विशेष करून ‘वहीची कोरे पाने’ ही कविता जास्त आवडली👌👌👌👌😊

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version