Home Uncategorized कुटूंब रंगलंय काव्यात ( ५३ )

कुटूंब रंगलंय काव्यात ( ५३ )

0

“गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्” मध्ये माझ्या एकपात्री कार्यक्रमाची नोंद व्हावी यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू होतेच, २००९ नंतर सौ.उमा आणि कन्या डॉ.तन्वी दोघींनी त्यासाठी विशेष प्रयत्न करायला सुरुवात केली. साधारण पाच वर्षांनंतर, “गेली कांही वर्षं आम्ही शोध घेतला तेंव्हा ‘स्वतः कवी नसताना इतर कवींच्या कविता सादरीकरणाचा एकपात्री प्रयोग’ जगातील इतर कोणत्याही भाषेत नाही, असे आढळून आले आहे. परिणामी इथे नोंद करण्यासाठी नवीन कॅटॅगरी निर्माण करावी लागेल, त्यासाठी तुम्ही चार नवीन कॅटॅगरी सुचवाव्यात” असे गिनीज बुककडून उत्तर आले. तन्वीने नवीन चार कॅटॅगरी कळविल्या, पण ‘पैकी एखादी कॅटॅगरी नवीन निर्माण करायला जास्त खर्च येईल, त्याऐवजी जुने एखादे रेकॉर्ड तुम्ही मोडून स्वतःचे रेकॉर्ड करू शकता’ असे आम्हाला गिनीज बुकने २०१८ साली कळवले. त्यानंतर मात्र गिनीजच्या पुण्यातील एका प्रतिनिधीकडे मी आमच्या रेकॉर्डची सर्व सूत्रे सोपवली.

अमेरिकेतील एका महिला एकपात्री कलाकाराने एक एक तासाचे सात दिवसांत २१ प्रयोग केले होते, ते रेकॉर्ड मोडण्यासाठी मी सात दिवसांत २८ प्रयोग करायचे‌ ठरवले, गिनीजने त्याला मंजुरी दिली. नंतर आम्ही आमच्या मित्र मैत्रिणींची एक कार्यकर्त्यांची टीम तयार केली आणि सर्वजण कामाला लागलो. गिनीज बुकने सांगितले त्याप्रमाणे ३०० रसिकांची बैठक व्यवस्था असणारे अद्ययावत असे नाशिक जिल्ह्यातील २८ हॉल निश्चित केले, त्यांची लोकेशन काढली, २८ हॉल लोकेशन्स सह गिनीज कडून मंजूर करून घेतले. एप्रिल २०२० मध्ये ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चे २८ प्रयोग करायचे निश्चित झाले, तशी गिनीजकडून मंजुरी मिळाली आणि २१ मार्च २०२० ला कोरोना महामारी मुळे “लॉकडाऊन” लागले. हाता- तोंडाशी आलेले गिनीज बुक चे रेकॉर्ड हुकले.

गिनीज बुकमध्ये माझ्या एकपात्री कार्यक्रमाची नोंद करायची, मराठी कविता तिथे पोहोचवायची हे माझे ध्येय आहे. सरस्वतीच्या कृपेने, आपल्या सारख्या सर्व रसिकांच्या आशिर्वादाने माझ्या ध्येयाची पूर्तता होईलच, यांची मला खात्री आहे.

माझ्या एकपात्री कार्यक्रमाच्या वाटचालीचा हा त्रेपन्नावा लेख आहे. रसिक वाचकहो, यानंतरचा माझा ५४ वा समारोपाचा लेख लिहून मी आपणा सर्वांचा निरोप घेणार आहे.

विसुभाऊ बापट

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर
(सादरकर्ते – ‘कुटुंब रंगलंय काव्यात’)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version