Home साहित्य कोणा घालावं गाऱ्हाणं

कोणा घालावं गाऱ्हाणं

0

अशी पावसाची रात
मन नाही थाऱ्यावर
रात्रभर चिंता जाळी
कधी कोसळे छप्पर

ढग वाजविती ताशा
नभी वीज कडाडते
दडे बसती कानात
अंगी कापरं भरते

झालं शिवारात तळं
गेला जिण्याचा आधार
उभ्या पिकाचं मातेरं
पुन्हा नशीबी अंधार

साऱ्या जगाचा पोशिंदा
राही स्वतःच उपाशी
नाव मोठ्ठं बळीराजा
दुनियेची रीत खाशी

निसर्गाचा नाईलाज
कधी पावतो, कोपतो
काय करावं त्यानंही
माणुसच वैरी होतो

मिळे सगळ्यांना न्याय
सरकारी दरबारी
नाही दाद नाही थारा
किती कराव्या तक्रारी

माल आमचाच परि
मोल मनाजोगं नाही
कोणा घालावं गाऱ्हाणं
शोध घेतो दिशा दाही

भारती महाजन-रायबागकर

– रचना : भारती महाजन-रायबागकर. चेन्नई

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version