Home Uncategorized खिडकी : 2

खिडकी : 2

0

“पुन्हा नव्याने”

मुंबईकरांना लोकलचा प्रवास सरावाचा असतो. लोकांची गर्दी, धक्काबुक्की, अनुभवली नसेल असा एकही मुंबईकर नसावा. इथे कुणालाच सवड नसते. घड्याळाच्या काट्याकडे बघत धावत रेल्वे स्टेशन गाठायचे, आणि लोकल आली रे आली की ती थांबायची वाट न बघता स्वतःला त्या लोकलच्या डब्यात झोकून द्यायचे. समोर कोणीही असो त्याची परवा न करता स्वतःला आत रेटत राहायचे. या गर्दीत ज्यांना बसायला जागा मिळते ते नेमके काय करतात? हे एक न सुटलेले कोडे आहे. नेमके कोणते पुण्य यांच्या गाठीशी असतं ज्यामुळे हे बसतात! त्यातही ज्यांना विंडो सीट मिळते त्यांचे तर कौतुक करावे तेवढे थोडे. ते म्हणजे साक्षात ईश्वरी अवतार आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणायला जे आतपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतात त्यांना एक माणुसकी म्हणून अर्धा, ठाण्यापर्यंतचा प्रवास झाला की बसायला दिले जाते. हा एक अलिखित नियम आहे. काही ग्रुप असतात जे आधीच ॲडजस्टमेंट करून ठेवतात. ते नवख्या माणसाला आज शिरकाव करूच देत नाही. काही ग्रुप हे थोडे माणसात वागतात एखाद्या नवख्या माणसाला ते सांभाळून घेतात.

लोकलचे असे आपलेच एक वेगळे जग असते. त्यातही दिवसाचे जे वेगवेगळे प्रहर असतात त्याप्रमाणे यातील क्राउड बदलतो. ऑफिस टाइमिंग, जी ठराविक चाकरमान्यांची वेळ असते त्यावेळी असलेली गर्दी वेगळी. तो अनुभव वेगळा. आणि इतर काही खास अशा वेळा आहेत जेव्हा एक वेगळीच दुनिया, काही वेगळेच लोक बघायला मिळतात.
गेल्या आठवड्यात सकाळी सोलापूरहून सिद्धेश्वर एक्सप्रेस ने पहाटे पावणे चार वाजता कल्याण स्टेशनवर उतरलो. दहा-पंधरा मिनिटांनी ठाण्यावरून कर्जतला जाणारी लोकल अनाउन्स झाली. सकाळची कर्जतकडे जाणारी ही पहिलीच लोकल आहे. मुंबई-उपनगरात रात्रीचे देखील एक वेगळे जग असते. रात्री तीन-चार वाजल्यापासून या ठिकाणी भाजी मार्केट, फुल मार्केट लागलेले असतात. आजूबाजूच्या गावातून लोक कल्याण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही भाजी, फुलं विकायला आणतात. व याच ठिकाणी व्यापारी, दुकानदार हा माल खरेदी करायला येतात. यापूर्वी देखील मी हे मार्केट, इथे येणारी लोकं बघितली होती. जेव्हा सर्व शहर शांत झोपलेले असते तेव्हा हे जागे असतात. रात्रीच्या वेळी या ठिकाणी हजारो रुपयांची उलाढाल होत असते. आतापर्यंत मी जेव्हा-जेव्हा पहाटेच्या ट्रेनने कल्याणला उतरलो तेव्हा सकाळची पहिली लोकल येईपर्यंत बाहेर या मार्केटमध्ये फेरफटका मारत असे. फिरतांना एखादा कप चहा घेत असे. आणि केवळ वरवर सर्व निरीक्षण करत असे.

त्यादिवशी मात्र जेव्हा मी सकाळी कल्याणला उतरलो आणि पहिल्या कर्जत लोकलमध्ये बसलो तेव्हा फलटावर गर्दी असूनही मला चक्क विंडो सीट मिळाली. फलाटावर गर्दी होती ती बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची, तसेच भाजी व फुलं घेऊन निघालेल्या व्यापाऱ्यांची. मात्र चढताना मला संधी मिळाली आणि मी मस्त विंडो सीट पटकावली. माझ्यासमोर एक आजी व तिच्यासोबत असलेला एक तरुण बसला. त्यांच्याजवळ दोन मोठ्या पिशव्या होत्या. त्यातील एका पिशवीत विविध फुले होती, व दुसऱ्या पिशवीत बेल, दुर्वा व इतर काही साहित्य होते. त्या आजींना मी कुठेतरी पाहिल्याचे आठवत होते, पण नेमके लक्षात येत नव्हते. लोकलमध्ये थोड्या वेळाने सर्व स्थिरस्थावर झाल्यावर, त्या दोघांचे संभाषण माझ्या कानावर पडले. आणि त्यातून लक्षात आले की या आजी काही वर्षांपूर्वी आमच्या बिल्डिंग समोरील चौकात हार-फुलांचे दुकान लावत होत्या. अंदाज घेत मी त्यांच्याशी बोललो, आणि माझा अंदाज खरा ठरला. त्या आजी त्याच होत्या. मात्र काही वर्षां आधी त्यांनी ते दुकान बंद केले होते. व इतक्यातच मी देखील दुसरीकडे शिफ्ट झालो होतो.
ओळख पटल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. सोबत असलेला तरुण हा त्यांचा नातू होता. कल्याण ते बदलापूर या साधारण विसेक मिनिटांच्या प्रवासात आजी बरेच काही बोलल्या. आणि मी फक्त शांतपणे ऐकत होतो….. लोकल बदलापूरला आली ते दोघेही उठले आणि उतरले. मी मात्र शांतपणे खिडकीतून त्या आजींकडे बघत बसलो…. मग अचानक भानावर आलो, व पटकन उठून मी देखील उतरलो. आजींनी जे काही सांगितले त्यामुळे मला उतरायचे देखील भान राहिले नव्हते.

नवरा वारल्यावर एकुलत्या एका मुलाचा सांभाळ करायला त्या माऊलीने हार-फुलांचा व्यवसाय स्वीकारला. त्यावेळी त्या परिस्थितीत तो एकच व्यवसाय तिला सुचला, व हा व्यवसाय तिला जमण्यासारखा देखील होता. पदरात असलेला मुलगा दहा-बारा वर्षांचा होता. आमच्या त्या वेटाळातील काही मंडळींनी या माऊलीला त्यावेळी या व्यवसायात मार्गदर्शन केले. रोज सकाळी उठून चार वाजता कर्जतवरून येणाऱ्या लोकलने कल्याण गाठायचे. त्या ठिकाणच्या फुल मार्केट मधून फुल व इतर साहित्य घेऊन पहिल्या कर्जतने पुन्हा बदलापूरला यायचे. मग फुलांचे हार तयार करणे, बेल व दुर्वा मिक्स करून फुलपुड्या तयार करणे, रोजचे ग्राहक मिळवून त्यांना ते पोचवणे, शनिवारी लिंबू-मिरची तयार करून ती दुकानदारांना देणे. अशा पद्धतीने हळूहळू त्या माऊलीने या व्यवसायात जम बसवला. सर्व जबाबदाऱ्या एकटीने पार पाडत मुलाला चांगले शिक्षण दिले. त्याला कधीही मदतीला घेतले नाही. मुलगा देखील बऱ्यापैकी शिक्षण घेऊन बदलापूर मधीलच एका खाजगी केमिकल कंपनीत कामाला लागला. पुढे त्याचे लग्न, त्याचा संसार सुरू झाला. आणि तिला नातू झाला.

इथपर्यंत सर्व काही सुरळीत व छान घडले. तिने केलेल्या मेहनतीचे फळ तिला मिळाले. नातू झाल्यावर मुलाने आपल्या आईला हा व्यवसाय बंद करून घरीच थांबायला सांगितले. आता ती घरीच राहू लागली. नातवाकडे लक्ष देऊ लागली. हा व्यवसाय तिने बंद केला. आता मुलाला स्वतःचे घर घ्यायचे होते, कारण ते एका भाड्याच्या घरात चाळीत राहत होते. त्यामुळे तो ज्या खाजगी कारखान्यात कामाला होता त्याच ठिकाणी त्याने पत्नीला देखील लावून घेतले. आता दोघे नवरा-बायको कामाला जात होते, व ही आजी घर व नातवंडाला सांभाळत होती. मुलाने व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवले होते व लवकरच त्यांचे घराचे स्वप्नही पूर्ण होणार होते.

मात्र नियतीला काहीतरी वेगळेच हवे होते. ते दोघे ज्या कारखान्यात कामाला होते तो केमिकल चा कारखाना होता. एकदा दोघेही कामावर असताना त्या ठिकाणी बॉयलरचा एक मोठा स्पोर्ट झाला, आणि त्यात ते दोघेही वारले…. स्पोर्ट इतका भयंकर होता की त्या दोघांचे मृतदेह देखील भेटले नाही…..
त्या माऊलीच्या पतीचे निधन झाले तेव्हा तिचा मुलगा ज्या वयाचा होता, त्याच वयाचा नातू आता या आजीच्या पदरात होता. जेमतेम दहा-बारा वर्षांचा…. काळाने चक्र फिरवून पुन्हा त्याच परिस्थितीत तिला आणले. आणि आजीने देखील परिस्थिती पुढे शरण न जाता, पुन्हा नव्याने हाच व्यवसाय करायचे ठरवले. फक्त एकच बदल यावेळी त्या माऊलीने केला. तिने नातवाला देखील सोबत घेतले. याला मुख्य कारण म्हणजे आता तिचेही वय झाले होते. आता नातू मोठा झाला आहे. कॉलेजात शिकतोय, मात्र रोज सकाळी आपल्या आजी सोबत जाऊन फुले वगैरे सर्व साहित्य घेऊन तो तिच्यासोबत येतो. तिला मदत करतो आणि मग दुपारी कॉलेजला जातो.
आजी बोलताना मला म्हणाली, ‘मला हा नातू आता म्हणतो की कॉलेज झाले की मी कामाला लागेल, आणि तू हे काम बंद कर. पण दादा एक सांगू, आता मी हे काम माझ्या जीवात जीव असेपर्यंत बंद करणार नाही. मी आणलेल्या या फुलांनी, मी बनवलेल्या हारांनी कितीतरी घरांमध्ये देवांची पूजा होते. मी हे पुण्य गोळा करणे थांबवले तर पुन्हा माझे सर्वस्व तो काढून घेईल अशी भीती मला वाटते. आता या नातवासाठी तो कितीही मोठा झाला तरी हे पुण्य गोळा करणे मी थांबवणार नाही…..’

किरण आचार्य.

— लेखन : किरण आचार्य. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version