Home साहित्य गुढी पाडवा : काही कविता

गुढी पाडवा : काही कविता

0

आज गुढी पाडवा आहे. त्यानिमित्ताने काही कविता सादर करीत आहे. गुढी पाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

1) आला वसंतऋतू

आम्रवृक्षी लपूनी कोकीळ,
कुजन करतो कूहूकूहू,
वृक्षावरची चैत्रपालवी,
म्हणते आला वसंतऋतु,

सडा, रांगोळी, बांधून तोरण,
घरे सजवती सर्वजण,
नटुनीथटुनी अति आनंदून
मिष्टांनाचे करती सेवन,

स्वागत करती गुढी उभारून
नववर्षाचे लोक जन,
मनोभावे करूनी  पूजन
मागती तिचे आशीर्वचन.

— रचना : लीना फाटक. यू. के.

2) सुस्वर माझ्या कानी यावे

जुन्या पिढीला मागे टाकून
नव्या पिढीने सुस्वर माझ्या कानी यावे जग जिंकावे
यशगाथा त्या ऐकत असता
सुस्वर माझ्या कानी यावे

आप्त स्नेहीजन यांचे अनुभव
कटू गोड वा कसेही असले
प्रतिध्वनीतुन मनात त्यांचे
सुस्वर माझ्या कानी यावे

राजपटावर चमकून जावे
न्याय नीतिला सांभाळावे व ‘जीवन
असे कुणी जर असतील त्यांचे
सुस्वर माझ्या कानी यावे

डोंगर हिरवे गार असावे
दुथडी भरूनी नदी वहावी
फुला फळांवर पक्षी दिसावे
सुस्वर माझ्या कानी यावे

युद्धाचे संपवून तांडव
बुद्धाने हे जग जिंकावे
विजयाच्या त्या गीता मधले
सुस्वर माझ्या कानी यावे

सुस्वर ऐसे घेऊन नंतर
नव्या युगाची पहाट यावी
ज्ञानदीप उजळून मनीचे
नववर्षाची गुढी सजावी

— रचना : सुनील देशपांडे.

3) गुढीपाडव्याचा गूढ अर्थ

पाने झाडून शिशिर झाला मोकळा
पवनास कडुलिंबपुष्पगंधाचा लळा

आता तरुवर शोभे नवपल्लव तुरा
साद घालतो कोकिळ गोड गळा

कोकिळा मान डोलवी आनंदात
बाळ कैरी डोकावी आम्र मोहरात

वावटळ आली पवित्र जल सिंचनास
निसर्ग गुंतला नववर्ष आगमनात

मृत्युंजय अमावस्येनंतरची प्रतिपदा
विजयाची आरोग्याची देईल संपदा

गुढी उभारु करत हिंदुत्वाची गर्जना
साफल्य-मांगल्य प्रकटेल संपेल आपदा

सानंदे आज गुढी उभारु मांगल्याची
काठी, करा, गाठी, भरजरी साडी-खण,

यासह समजून गुढीपाडव्याचा गूढ अर्थ
करु देशाचे समृद्धी, पावित्र्य संरक्षण

— रचना : विजया केळकर. नागपूर
(संभाजी महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन अमावस्या
म्हणून तिला मृत्युंजय अमावस्या म्हणतात)

4) नूतन संदेश

चैत्र पालवी गुढीपाडवा नव्या वर्षाचा गोडवा
गोडवा आणतो जीवनात कडू प्रसंग विसरा
विसरा आता वैरभावना नवा अध्याय घडवा
घडवा नवी सुंदर नाती ओढा मनाचा कासरा -१-

कासरा जाऊ देत नाही वेगळ्या वाटेने कधीही
कधीही वागू नका असूयेने कुणाशीही जगात
जगात असावे प्रेम शांतता समृद्धी मानवाला
मानवाला द्या प्राधान्य सांगे संस्कृती गोडवे गात -२-

गात रहावे आनंदाने जपताना जुना वारसा
वारसा वैभवशाली आपला परंपरांना जपा
जपा सहजीवनाच्या तत्वाला जगा आणि जगू द्या
द्या संदेश मानवतेचा हिंदू जनजागृती तपा -३-

तपा हून अधिक काळ देश सांगतो समाजाला
समाजाला पटले तरी वळत नाही वर्तनात
वर्तनात हवे समंजसपण नि मधुरपणा
मधुरपणा येवो चैत्र पालवी सांगे अतोनात -४-

— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर.

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version