Home साहित्य गुढी पाडवा : काही कविता

गुढी पाडवा : काही कविता

1

आज गुढी पाडवा. या निमित्ताने काही कविता पुढे सादर करीत आहे.
आज कवियत्री अस्मिता चौधरी यांची ही कविता, पहिल्यांदाच आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध करीत आहे. त्यांचे हार्दिक स्वागत करू या. मराठी नवं वर्ष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
-संपादक

१. गुढीपाडवा
शुष्क पानगळ संपवून शिशिर
देतो ऋतुराजाला आमंत्रण
येतो चैत्र महिना, नववर्षाच्या
भव्य स्वागताच लेवून कोंदण

सोनेरी सूर्य किरणासोबत
उगवते कोवळी प्रसन्न पहाट
कोकिळेचे स्वर कुजन करतात
आज गुढीपाडव्याचा आहे थाट

सडा सारवण करून गृहिणी नटते
दारीं सजते चैत्रांगणाची रंगावली
चंदनाचा पाट, वेळूची काठी सांगतात
सारे या, गुढी उभारण्याची वेळ झाली

भगवे रेशमी वस्त्र, फुलांच्या माळा,
उपडा कलश, आंब्याची डहाळी
गोड चपट्या साखर गाठीसोबतच
कडुलिंबाची फांदी पण बांधली

यश, आनंद, आणि प्रसंनतेचे
ल्याली गुढी देखणे रूप
स्वास्थ्य, आरोग्य पर्यावरणाच्या
रक्षणाचे असते तिचे स्वरूप

गुढीची पूजा मनोभावे करताना
आज करूया एक संकल्प नवा
उभारू माणुसकीची, ऐक्याची गुढी
आपुल्या मनी दृढ विश्वास हवा !!!

– रचना : अस्मिता चौधरी. ठाणे

2. उभारू गुढी
पाडव्याला गुढी उभारु दारी
बांधू तोरण संकल्पाची
घेऊ आण राम करी इच्छा पूर्ण !!धृ!!

सृष्टी निर्मिली ब्रह्मानं रक्षिली वसु राजानं
चैत्र मासी वसंतात धरा जाई बहरुन
विश्वबंधुत्व जपावे रक्षावे पर्यावरण !!1!!

तपस्या केली चेदिच्या राजा वसुनं
सृष्टी रक्षिण्या वसुला वर दिला इंद्रानं
देवाने दिल्या वेळूचे त्याने केले पूजन !!2!!

संकल्प पूर्ण करण्याचा आज शुभदिन
प्रभू आयोध्येस आले वनवास संपवून
नगरवासी बांधीती आनंदे गुढ्या तोरण !!3!!

अरुण गांगल

– रचना : अरुण गांगल. कर्जत -रायगड

3. नववर्ष
नववर्ष मराठी येते,
चैत्राची नवी पालवी,
कोकीळ नाद हो होतो,
धरती ही उत्सुक हळवी,

या गुढ्या, तोरणे लावू,
ध्वज उंच, उंच हो सजवू,
जयकार करू मातीचा,
या गुलाल, बुक्का लावू,

या सारे सजवूनी घरे,
भरजरी वस्त्र साजरे,
नाऊवारी, सुंदर, गजरे,
या केशरीटीळा सजवू,

करू सुंदर ती पक्वान्ने,
श्रीखंड पुरी, स्वादान्ने,
या वाढू किती पंगती,
किती हास्य विनोद होती,

जा घरोघरी हो भेटा,
आलिंगन द्या आप्तेष्टा,
अनुभव सांगावा धीटा,
सगळ्यांना जोडून घेऊ. .!!!

– रचना : हेमंत भिडे

हेमंत भिडे

4. नववर्ष
पहाट नववर्षाची
नवउन्मेषे फुलली
लाली नवसंकल्पांची
क्षितिजी फुलून आली

कष्टक-याला भाकरी
सुशिक्षिताला चाकरी
नीतीमत्ता व्यवहारी
घेऊं गगनभरारी

महागाईचा असूर
माजलासे भ्रष्टाचारी
जाळुनिया भ्रष्टाचार
सचोटीची कास धरी

उद्यान सुविचारांचे
जनमनांत फुलवू
विचार जातियतेचे
फेकून देऊ उडवू

भारतीय हीच जात
माणुसकी हाच धर्म
नववर्ष सुरुवात
नवसंकल्पांचे मर्म

रामराज्या जाणुनिया
शिवशाही आठवूया
गुढीपाडवा दिनी या
नवप्रेरणा घेऊ या

स्वाती दामले

– रचना : स्वाती दामले. बदलापूर

5. चैत्रपाडवा
चैत्रपाडवा,
नव्हाळी ल्याला,
पोपटी स्वप्नांना
मोहर आला,
रोमारोमात माणसांच्या
उरूस भरला.

सतीश शिरसाट

– प्रा. डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे

6. चैतन्याची गुढी
आला चैत्र महिना आला
बांधले तोरण नटले आंगण
झाले नव वर्षाचे आगमन
स्वागत करु गुढी उभारुन

नेसउन साडी, माळून हार
कडवट गोडाने उभारु गुढी
जोपासू भारतीय संस्कृती
शिवरायांची पारंपारिक रुढी

गरज आहे सदविचारांची
प्रेमाची अन आपुलकीची
समाधानाची गोडव्याची
माणसांतील माणुसकीची

तोडा जातीयतेच्या बेड्या
गुढी उभारा धर्मनिरपेक्षतेची
बंधुभावाची, एकात्मतेची
सर्वधर्म अन समभावाची

गुढी उभारा चैतन्याची
समवृध्दीची, समाधानाची
देशप्रगतीची, भरभराटीची
वीरांच्या शौर्यांंच्या गाथांची

प्रा.अनिसा शेख

– रचना : अनिसा सिकंदर. ता.दौंड जि.पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version