१) पाऊस
पाऊस आला पाऊस आला
पाणी शिंपित नाचू लागला
पटपट पटपट आला खाली
पहा ही धरती झाली ओली
पागोळ्यांची टपटप गाणी
पडसाद देती पर्जन्यासी
पवनही वाहे भिरभिर भिरभिर
पाचोळ्याला उधळी तरुवर
पदन्यास ते सुरेख टाकीत
पानफुलांना राही हसवित
पर्जन्यवृष्टी सुरु जाहली
पाण्यासाठी तडफड सरली
पाखरेही पंख पसरुनी
प्रभात होता नाचू लागती
— रचना : स्वाती दामले. बदलापूर
2) ये रे घना, ये रे घना
पावसाचे बरसणारे थेंब
उडता,येरे घना येरे घना
शिंपडून तू असशी जात
सकलासाठी पुन्हापुन्हा…1
तप्त काया, मनासी मरगळ
झटकण्या मळभ आलं
आकाश नभी काळंनिळं
शांत भोवती सुकर झालं,..2
बेभान पाऊस ऊर्जा मनात
आसमंत गे गंधित दरवळ
विजेची तुतारी वाजतगाजत
कधीच संपू नये वावटळ…3
गारव्याचे हे तुषार उडवत
ओलेती मी नखशिखान्त
खिडकीतून मला खुणावत
चैतन्यस्वरूपदिसेनिसर्गात..4
वसुंधरेस या घ्यावे कवेत
अंतरात शांत होई खदखद
आतुरतेने प्रतिक्षा करत
हर्षाने घेई गिरकी गदगद…5
वर्षा ऋतुत फुलतं बहरत
लावण्य चोहोबाजू उजळतं
कोसळतो पाऊस अविरत
रमुनी मन गे भान विसरतं…6
— रचना : सौ मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
