Home लेख चला, दृष्टि भेट देऊ या !

चला, दृष्टि भेट देऊ या !

0

आज, १० जून हा जागतिक दृष्टिदान दिन आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख….

जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला….

ओह…..!!! आले असेल लक्षात ! हा मनातला भाव कुठून, कसा कळतो ? एक तर तो बोलल्यावर कळतो किंवा त्याहीपेक्षा न बोलताच तो कळतो, तो डोळ्यातून !

आज सकाळी सकाळी व्हाट्सअप उघडलं.. डोळे किलकिले करून कल्याणीताईचा मेसेज पाहिला आणि खटकन डोळे उघडले. डोळे चोळत आहे त्या डोळ्यांवर दोन कृत्रिम डोळे चढवले आणि चक्क वाचायला लागले, अरे आज दृष्टिदान दिन आहे… दृष्टिदान दिन की नेत्रदान दिन ? हे माझ्या मनातले विचार बाजूला ठेवले आणि कल्याणीचा लेख वाचू लागले. ना नेत्रदान, ना डोळे दान येथे तर त्याचं नामकरण केलं होतं… नेत्र भेट दिन ! .. अरे वा ! मस्तच👌

तिमिराकडून तेजाकडे नेणारे हे डोळे एखाद्याला भेट देणं ही संकल्पना आवडली.कारण दान देणे हि सुद्धा एक उपकृततेची भावना आहे. पण भेट देणे म्हणजे मैत्रीची भावना शिवाय ही भेट द्यायची तर ती आपण आपल्या आयुष्याचा, डोळ्यांचा पूर्णपणे उपभोग घेतल्यानंतर !

खरं तर मलाही नेत्रदान, नव्हे आता नेत्र भेट देण्याची, अवयवदानाची सुद्धा खूप इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करणार आहेच..

सीमाताई म्हणाल्या की, आम्ही अंध विद्यालयात मानद अधिकारी म्हणून काम केलं. त्यांच्या स्कूटरच्या आवाजावरून त्यांचे विद्यार्थी त्या आल्यात म्हणून ओळखायचे… आज त्या किती कौतुकाने हे सांगतात आणि मग विचार करा आपण जर एखाद्याला आपले डोळे दिले आणि आपल्या डोळ्यांनी तो जग पाहत असेल तर तो आनंद किती असीम असेल ? म्हणूनच आपण प्रत्येकाने हा संकल्प करणं गरजेचं वाटतं. प्रत्येकाने हा निर्धार करावा. कारण आपण आपल्या मृत्यूनंतर हे जग पाहू शकतो. या तेजोमय जगाचा, विधात्याच्या या अप्रतिम सृष्टीचा आनंद आपण मृत्यूनंतरही घेऊ शकतो.

तर चला, आज आपणही एक संकल्प करूया आणि म्हणू या “मरावे परी नेत्ररुपी उरावे” आणि शांता शेळके म्हणतात तसं “असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे” त्या धर्तीवर आपण म्हणू या…
“असेन मी नसेन मी तरी तुझ्या डोळ्यातून जग बघेन मी”
दृष्टीदानासाठी डोळे भरून शुभेच्छा💐

अनिता व्यवहारे

– लेखन : सौ अनिता व्यवहारे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version