Home साहित्य जवर जीतं

जवर जीतं

0

जवर जीतं आपलं माणूस
तवर त्याच्याशी बोलून घ्यावं
मनातल्या त्याच्या नैराश्याला
प्रसन्नतेत तोलून द्यावं
**

रेशिम हिरव्या चादरी खाली
डोंगर एकटा उदास असतो
आत घुसळूनी लाव्हा
शिखरावरती दीप माळतो

थव्याबरोबर उडत जावं,
आपलं घरटं शोधून घ्यावं
डवरलेल्या वृक्षमिठीत
हिरवेपणात हरवून जावं
जवर जीतं आपलं माणूस……
**

वाळुवंटात कुठेही खोदा
झऱ्यात तीर्थगोडवा असतो
पिढ्या पिढ्या आल्या दिंडीत
एकच अमर भाव असतो
भक्तीत तरंगत म्हणूनच
चंद्रभागातीरी जावं
आत्मभान विसरलेल्या
वाळूमधला कण व्हावं
जवर जीतं आपलं माणूस…..
**

सुग्रास पक्वान्नांची चव
नित्य नवी घेतली जरी
शेतामधल्या हुरड्याचाही
आठवण व्हावी कधीतरी
दारात चांदणं आहे तवर
त्यात मनसोक्त खेळून घ्यावं
खेळता खेळता त्यालाच पिरून
स्वतः चांदणं होऊन जावं
जवर जीतं आपलं माणूस….

— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version