Home साहित्य जीवनाची कविता : मी

जीवनाची कविता : मी

0

भुखेची कविता लिहितो
भाकरीची कविता लिहितो
वेदनेची कविता लिहितो

भाकरीच्या शोधात
बसलोच असेल झाडाखाली
तर
त्या झाडाच्या मजबूत बुंध्याची
हिरव्या पानांची
फांद्यावरील घरट्यांचीही
कविता लिहितो

झाडाच्या बुंध्याकडून
मजबूत व्हायला शिकतो
पानांकडून हिरवं व्हायला शिकतो
फांद्यांकडून आसरा द्यायला शिकतो

दुःखाच्या डोंगराची
कविता लिहितो
दरी एव्हढ्या खळगीची
कविता लिहितो
ओबडधोबड दगडी जीवनाची
कविता लिहितो

गेलोच कधी जीवनाच्या शोधात
रानीवनी तर
डोंगरा गत उंच व्हायला शिकून
शिखराची कविता लिहितो
दरी एव्हढ्या खोल
माणसाच्या मनात
डोकवायला शिकून
ह्रदयात सारं सामावुन घेण्याची
कविता लिहितो

ओबडधोबड दगडातून
मुर्ती व्हायला शिकून
टाके सोसण्याची कविता लिहितो
सुंदर घडण्याची कविता लिहितो
माळरान झालेल्या जीवनाची
कविता लिहितो
तशी
माळरानावर उगवणा-या
आशावादी झाडांचीही
कविता लिहितो
जीवनाच्या हरएक पैलूची
कविता लिहितो
कविता होतो
कविता जगतो

– रचना : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. बदलापुर
–  संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version