Home यशकथा झेप : 25

झेप : 25

0

“कृषीरत्न यज्ञेश सावे”

पालघर जिल्हा बहुतांशी शेतीसाठी ओळखला जातो . महाराष्ट्रातिल हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पुढाकाराने आणि भारताच्या कृषि मंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार एम.एस. स्वामिनाथन यांनी केलेल्या हरित क्रांतीमुळे अनेक शेतकरी पारंपारिक शेती सोडून अत्याधुनिक शेतीकडे वळले. बोरीगाव – बोर्डी येथिल शेतीतज्ञ यज्ञेश वसंत सावे हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील या पैकीच एक प्रगतिशील शेतकरी आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे देण्यात येणारा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार’ हा सर्वोच्च राज्य पुरस्कार ; कृषिदिनी म्हणजेच दिनांक १ जुलै २०२६ रोजी यज्ञेश सावे यांना सपत्निक राज्यपाल श्री.जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितित प्रदान करण्यात आला.

कृषिरत्न पुरस्कार स्वीकारताना यज्ञेश सावे वा सौ. शीतल यज्ञेश सावे

बोरीगाव – बोर्डी येथे जन्मलेल्या यज्ञेश वसंत सावे यांनी पारंपारिक शेती पद्धतींमध्ये बदल करून फळे, भाजीपाला आणि मत्स्यपालनामध्ये मोठे यश मिळवलेले असुन शेतीमधिल अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. १९८१ साली १० वी पर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढिल शिक्षण पूर्ण न करू शकलेल्या यज्ञेश सावे यांनी वडिलोपार्जित साडेतीन एकर जमिनिमध्ये आंबा लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर स्वकष्टाने आणि शेतीमध्ये निरनिराळे प्रयोग करत एक गरीब शेतकरी ते राष्ट्रीय कृषी पुरस्काराचे मानकरी हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

पारंपारिक शेती पद्धतींमध्ये बदल करून फळे, भाजीपाला आणि मत्स्यपालनामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी तसेच घोलवड-डहाणू येथिल चिकू फळाला GI मानांकन प्राप्त करुन देण्यामध्ये मोलाचा सहभाग असलेले एक प्रतिथ्यश प्रगतिशील शेतकरी अशी बोर्डी आणि आसपासच्या पंचक्रोशीमध्ये त्यांची ओळख आहे.

१९८१ साली केवळ साडेतीन एकर जमिनितून सुरुवात करून पुढे आंबा लागवडीमध्ये मिळालेल्या यशाचा वापर करून जवळपास ८ एकर शेती खरेदी करून शेतीमधिल निरनिराळे प्रयोग ते सतत करत असतात. सुरुवातीला गुजराथ मधून आणलेल्या ३५० आंब्याच्या रोपांची यशस्वी लागवड आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातिल तज्ञांच्या मार्गदर्शनाने एका आंब्याच्या झाडामागे ७० ते १०० किलो आंब्याचे उत्पादन घेत काही टन आंब्यांची यशस्वी लागवड करून एकप्रकारे विक्रम त्यांनी केलेला आहे. रोहू, कटला या सारख्या उत्त्पन्न देणार्‍या विविध माश्यांची पैदास ते करत असतात. जैविक शेती, मधुमक्षिका पालन, आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आणि थेट विपणन या सारख्या उपक्रमांमुळे स्वत:ची वेगळी ऒळख त्यांनी निर्माण केली आहे. लोणच्यासाठी मागणी असलेल्या राजापुरी आणि चविने गोड केशर आणि हापुस आंब्याची लागवड त्यांनी केलेली आहे. या बरोबरच करार शेतीची यशस्वी पद्धत अवलंबुन त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये सुमारे २०० एकर क्षेत्र चिकू, आंबा, नारळ आणि इतर फळबागाची उभारणी केली आहे.

प्रसिद्धीच्या अजिबात मागे न लागता शेतीमधिल निरनिराळे प्रयोग आणि काम हा दिनक्रम संभाळणार्‍या यज्ञेश सावे यांच्य़ा यशामध्ये त्यांची पत्नी शीतल यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या शेतीमधिल विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आता पर्यंत पुढील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

⦁ कृषीभूषण राज्य पुरस्कार
⦁ शेती निष्ठ राज्य पुरस्कार
⦁ राष्ट्रस्तरीय कृषीभूषण पुरस्कार
⦁ महात्मा ज्योतिबा फुले कृषीभूषण पुरस्कार
⦁ दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान २०१९ (RCF सुफला प्रायोजित)

‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार’ हा सर्वोच्च राज्य पुरस्कार ही शेतीतज्ञ यज्ञेश सावे यांच्या आजवरच्या शेतीमधिल यशस्वी प्रवासाची पोचपावती असुन यापुढेही शेतीमधिल निरनिराळे उपक्रम राबविण्यासाठी तसेच त्यांच्या पुढिल प्रवासासाठी त्यांना मनापासुन शुभेच्छा !

— लेखन : नितान्त राऊत. बोर्डी, जिल्हा पालघर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version