Home यशकथा अमेरिका : ‘मेडपॅक’ च्या अध्यक्षपदी डॉ. अमोल नवाथे

अमेरिका : ‘मेडपॅक’ च्या अध्यक्षपदी डॉ. अमोल नवाथे

0

अमेरिकेच्या गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिसने डॉ. अमोल नवाथे यांची ‘मेडिकेअर पेमेंट ॲडव्हायझरी कमिशन’ (MedPAC) च्या अध्यक्षपदी अधिकृतपणे नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीमुळे अमेरिकेच्या आरोग्य धोरणात मराठी नाव झळकले आहे.
२०१९ पासून कमिशनर आणि २०२२ पासून ‘मेडपॅक’चे उपाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर आता ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहेत. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ एप्रिल २०२९ पर्यंत असेल.

१९९७ मध्ये स्थापन झालेली ‘मेडपॅक’ ही एक महत्त्वाची आणि स्वतंत्र संस्था असून  ती  अमेरिकन संसदेला ‘मेडिकेअर’ अंतर्गत आरोग्य सेवा पुरवठादार आणि आरोग्य योजनांच्या पेमेंट संदर्भात सल्ला देण्याचे काम करते.

अमेरिकेचे हंगामी नियंत्रक महालेखापाल आणि ‘GAO’ चे प्रमुख ओरिस डब्ल्यू. ब्राउन म्हणाले, “गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून मेडपॅकने मेडिकेअर प्रोग्रामसमोरील आव्हानांवर संसदेला स्वतंत्र, निष्पक्ष सल्ला देण्याचे काम केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की नवीन नेतृत्व संसदेला पुराव्यांवर आधारित अचूक माहिती आणि शिफारसी पुरवणे सुरू ठेवेल”.

नव्या भूमिकेतून संसद, मेडिकेअर प्रोग्राम आणि त्याच्या लाभार्थ्यांसाठी मेडपॅकचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. नवाथे यांनी दिली.

“अल्प परिचय”
डॉ. अमोल नवाथे हे अंतर्गत औषधशास्त्र तज्ज्ञ आहेत. ते आरोग्य सेवा, वित्तपुरवठा आणि वर्तनशास्त्र अर्थशास्त्र या विषयातील अग्रगण्य राष्ट्रीय अभ्यासकही आहे. ते युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या पेरेलमैन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये ‘मेडिकल एथिक्स आणि हेल्थ पॉलिसी’चे प्राध्यापक आहेत, तसेच ‘वॉर्टन स्कूल’ येथे हेल्थकेअर मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांनी वॉर्टन स्कूलमधूनच ‘हेल्थ केअर मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक्स’ या विषयात पीएचडी पूर्ण केली आहे, तर हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमधून वैद्यकीय प्रशिक्षण घेतले आहे.

डॉ. अमोल नवाथे यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा शैक्षणिक आणि सेवेचा मोठा वारसा आहे. त्यांचे वडील, डॉ. शामकांत बी. नवाथे, हे जागतिक कीर्तीचे संगणक शास्त्रज्ञ आणि ‘जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे दीर्घकालीन प्राध्यापक आहेत. डेटाबेस सिस्टम, डेटा मॉडेलिंग आणि कॉम्प्युटिंग शिक्षणातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना ‘ACM फेलो’ या जागतिक सॅम्मानाने गौरवण्यात आले आहे, ACM फेलो हा ‘असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी’ (ACM) द्वारे प्रदान केला जाणारा सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठित असा मानद सदस्यत्व दर्जा आहे. ‘ACM’ ही संगणकीय क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी आणि आघाडीची वैज्ञानिक तसेच शैक्षणिक संस्था आहे. त्यांच्या पुस्तकांनी भारतातील आणि जगातील अनेक पिढ्यांच्या संगणक अभियंत्यांना घडवले आहे.

डॉ. शामकांत नवाथे आणि डॉ. अमोल नवाथे या पिता-पुत्रांची कामगिरी संगणक विज्ञान, डेटा सिस्टम, वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय धोरण या क्षेत्रांमध्ये ज्ञान, नाविन्यता आणि लोककल्याणासाठी असलेल्या कौटुंबिक वचनबद्धतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

डॉ. नवाथे यांच्या या नियुक्तीबद्दल न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version