Home साहित्य दिवाळी : काही कविता

दिवाळी : काही कविता

0

१. दिवाळीची गंमत भारी ..!

दिवाळीची गम्मत भारी
पाहुणे आले हो घरोघरी
दिवाळीचे रूप नवेनवे
झगमगती आकाशदिवे ………||

पहाटेची लगबग सारी
सुरेख रांगोळी दारोदारी
खमंग फराळाची कमाल
गोडाधोडाची कित्ती धमाल …..||

धडाड-धुम्म -धडाड -धुम्म
फटाक्यांची ही धमाल धुम्म
फुलबाज्या -अन भुई-नळे
सुईन-सटाक रौकेट पळे ……….||

दिदीसाठी भेट कित्ती छान
भाऊबीजेला भैय्याचा मान
आज्जी -आजोबा आले घरी
मज्जा दिवाळीला आली खरी ….||

– रचना : अरुण.वि.देशपांडे. पुणे

२. हवी शुद्ध दिवाळी …

मस्त मजेची नवी-नवी
अशी दिवाळी हवी हवी
चमचमीत अन् शुद्ध चवीची
अशी दिवाळी हवी हवी

चकचकीत त्या घरोघरी
उजळीत दीपांच्या ओळी
शुद्ध हवेची भोवताली
अशी दिवाळी हवी हवी

लखलखीत त्या शांत प्रकाशी
उजळी आनंदाच्या राशी
गंध फुलांनी बहरून जावी
अशी दिवाळी हवी हवी

सुगंधात बेधुंद होऊनी
शब्द सुरांनी मोहवणारी
नाविन्याच्या हव्यासाची
अशी दिवाळी हवी हवी

मनात तुमच्या मनात माझ्या
स्नेहबंध हे जागविणारी
हृदयामध्ये सदा वसावी
अशी दिवाळी हवी हवी

– रचना : सुनील देशपांडे. नाशिक

३. दिवाळी…

दिव्यांच्या आला सण
घेऊन प्रकाशाचे कण
सुबक तोरण बांधावे दारी
स्वागता लक्ष्मीची स्वारी

सुंदर रांगोळी अंगणी
अंघोळीला लावा उटणी
चकली करंजी अनारसे
खावे गोड पदार्थ असे

आकाशी कंदील विराजमान
जणू आले मंगलयान
फटाके हर्षाचे फोडूनी
आणू प्रसन्नता जीवनी

लुकलुकणाऱ्या माळा जणू
पारी अवतरल्या चांदण्या
शुभ पावले टाकत येईल
घरी धन लक्ष्मी नांदण्या

ह्या दिपावलीत लावूया
एक मंगल दीप अंतरंगी
स्नेह वृद्धिंगत करूनी
आयुष्य बनवूया सप्तरंगी

– रचना : ॐप्रकाश शर्मा. नाशिक

४. स्नेहमय दिपावली

स्नेहवाती त्या मनामनात
राहो सतत हृदयी तेवत ..
दीपावलीच्या मंगलमय सणात
सुख व्हावो सदा वृद्धिंगत

गोड लाडु करंजी डब्यात
जणु मोती बंद शिंपल्यात
शेव चकली झाली खमंग
जिव्हा राही सदा दंग

पणत्या त्या मिणमिणती
सजल्या पहा उंबऱ्यावरती
झाल्या स्वागता आतुरती
देवी लक्ष्मी आणि सरस्वती

रेखीव सुबक रांगोळी दारात
मांगल्य समाधान आणते गृहात
आकाशदिपही सजला थाटात
शोभतो लखलखीत प्रकाशात

राहो अशी दिवाळी सुखाची
समाधानी अन् आनंदाची
आयुष्याच्या रम्य प्रांगणात
स्नेह दीप तेवो मनामनात

– रचना : नेहा हजारे. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version