Home साहित्य दिवाळी दिवाळी….

दिवाळी दिवाळी….

0
OLYMPUS DIGITAL CAMERA

दिवे लावायचे दिवाळीत
करायचा परिसर प्रकाशाचा,
आणि मनातला कोपऱ्यात
एक दिवा सतत तेवायचा….

क्षण समाजाच्या ऋणांचे
त्या प्रकाशात शोधायचे,
आणि आपल्या आायुष्याचे
मग तेच ध्येय ठरवायचे….॥१॥

पारंपारिक दिवाळीत
फराळ तर करायचा,
आणि बरोबरच हातात
एक डबा भरून ठेवायचा….

बाहेर जाता येता नजरेने
कोणी भुकेला शोधायचा,
आणि तो डबा त्याला अर्पायचा,
मगच तृप्तीचा ढेकर आपण द्यायचा…..॥२॥

काढायची रांगोळी दिवाळीत
रंग भरायचे मनापासनं,
आणि तेच रंग ओंजळीत
घेऊन उधळायचे आनंदानं….

सहवासात येणाऱ्याला
रंगवायचे त्या रंगात प्रेमानं,
आणि जोडायचं जिव्हाळ्यानं
मग आपणही रंगून जायचं त्या रंगानं….॥३॥

करायचा कंदील दिवाळीत
यशाचं प्रतिक समजायचं,
आणि तो समाधानीनी बघतांना,
इतरांचे कंदीलही निरखायचं…

कौतुकाच्या आपल्या एका शब्दानी
त्यांचे कंदील हसतील,
आणि आपला कंदील मनानी
मग आनंदानी आणखी झुलत राहील…॥४॥

नाहीच लावायचे फटाके दिवाळीत
धुराचे, आवाजांचे प्रदूषण ते,
आणि त्या पैशांचा धुराळा वाचवत
सतत साठवत रहायचे ते….

चूल न पेटल्यामुळे असतात
काही श्रांत घरं ,बीन धुराची
आणि पेटते त्याची चूल त्या पैशात
मग आपली दिवाळी होते दानाची.. ॥५॥

भेटीगाठी हव्यातच दिवाळीत
धट्ट विणायला धागे दोरे,
आणि मागचे व्रण विसरत
मन ठेवायचे नेहमीचं कोरे…..

नात्यांसारखे कोणी नाही जवळचे
मागून मिळत नाहीत नाती निस्वार्थी
आणि म्हणूनच त्यांना सांभाळायचे
मग दिवाळी करा साजरी खऱ्या अर्थी !

— रचना : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version