प्रवास : आगमनाचा
छोट्याशा थांब्यावर सुबोध आपल्या गर्भवती पत्नीला आणि सासूला घेऊन दोन तासापासून थांबला होता. शहरातल्या दवाखान्यात पत्नीला दाखल करायचे होते. लग्नानंतर दोन वर्षानी शोभा प्रथमच आई होणार होती. डॉक्टरांनी ३-४ दिवसात ती बाळंत होईल असा अंदाज वर्तविला होता. वेळेवर घाई नको म्हणून ते दोन दिवस लवकर निघाले होते. दवाखान्याच्या शेजारी खोलीसुद्धा घेतली होती.
अडीच तासाच्या प्रतिक्षेनंतर बस आली. थांब्यापासून थोडी दूर उभी राहिली. सुबोधने पळत जाऊन बस थांबविली. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. अवघडलेल्या शोभाला एका दयाळू प्रवाशाने जागा दिली. शहर फार नाही तरी तीस किलोमीटर दूर होते म्हणजे एक तासाचा प्रवास होता.
तितक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. साऱ्यांचे चेहरे आनंदले आणि ‘मुलगा’ असा नर्सचा आनंदी आवाज आला…
मूर्खपणाचा कळस :
“ताबडतोब निघून ये.” मामाची तार आली आणि सुबोध लगोलग बसस्टँडवर आला. अकोल्याला जाण्यासाठी सुदैवाने पंधरा मिनिटातच बस होती. तो फलाटावर येवून बसची वाट पाहात उभा राहिला, त्याचे नशीब जोरावर म्हणून वेळेवर बस लागली. भरपूर प्रवाशी असूनही त्याने खिडकीजवळची जागा पटकावली. धक्काबुक्की सुरु होती. त्याच्याशी काही घेणं-देणं नसलेला सुबोध आपल्या शेजारी रुमाल टाकून पुस्तक वाचत बसला. तो वाचण्यात मग्न असतानाच बायकी आवाज आला, “शुक शुक सीट आहे का ?”
“अं. हो, बसा.”
“बसा नाही मिस्टर, ऊठा. दोन्ही सीटचं आरक्षण केलेल आहे.”
“काय ?”
“काय …. काय ? ऐकू येत नाही ? ह्या २१ आणि २२ क्रमांकाच्या सीटच आरक्षण केलेलं आहे… समजलं ?”
“समजल…” असं म्हणत सुबोध ऊठला. गालातल्या गालात हसत ती स्त्री सीटवर बसली.
त्याच सीटच्या शेजारी सुबोध कसा बसा एका पायावर उभा राहिला. त्याने आजुबाजूला बघितल, अर्धवट टेकण्यासाठी कुणी ही ओळखीचं नव्हतं.
“येतो येतो….” पाठीमागून प्रतिसाद देत, तिचा नवरा रस्ता काढत सीटवर येवून बसला. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन उभ्या असलेल्या सुबोधच्या कानावर संवाद आला,
“अगं एवढ्या गर्दीत दोन जागा शेजारी-शेजारी कशा मिळविल्या ?”
“हळू बोला. एका माणसाला आरक्षण आहे असं सांगितलय.”
“काय ? अग एक तर आपल आरक्षण नाही आणि ही बस बाहेर गावाहून आलीय हिचं इथं आरक्षण मिळत नाही…” तो गृहस्थ हसत म्हणाला नि स्वत:च्या मुर्खपणाला दोष देत सुबोध तसाच उभा राहिला..
– लेखन : नागेश शेवाळकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मा. भुजबळ सर, नमस्कार.
माझे सदर सुरू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!