जागतिक परिस्थितीमुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्या संकटांवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसाधन बचत करण्याच्या केलेल्या आवाहनास अहिल्यानगर येथील पूजा पौरस गिल्डा व पूजा निष्णात गिल्डा या दोन लेकींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या दोघींनी स्वयंपाकाचा गॅस आणि खाद्यतेलाचा अजिबात वापर न करता तब्बल नऊ खाद्यपदार्थ केले.
दोन्ही पूजा या नगरमधील भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी निवृत्त मुख्याध्यापिका गीता गिल्डा यांच्या सुना आहेत. त्यामुळे दोन्ही पूजांचे आणि गिल्डा परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केंद्र सरकारद्वारे इंधन संरक्षण एवंम् खाद्यतेल बचत जागरूकता अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत नुकतेच महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी राज्यभरातील प्रमुख महिला पदाधिकार्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर घेतले. यात दिल्लीच्या तज्ज्ञ महिलांद्वारे प्रत्येक महिलेने स्वतःच्या घरापासून बचतीची सवय अंगिकारण्याचे आवाहन केले गेले. या अनुषंगाने आपल्या घरापासून बचतीची सुरुवात कशी करता येईल, यावर गीता गिल्डा यांनी दोन्ही सुनांशी चर्चा करून तांदूळ न वापरता फक्त भिजवलेले ओटस् वापरून केलेला कर्ड राईस-विदाऊट राईस व पनीर-कोथिंबीर-पुदिना वापरून केलेले ग्रीन डीप सँडवीच अशा दोन पदार्थांचा व्हीडीओ करून तो चित्राताईंना पाठवला. त्यांनी राज्यस्तरीय महिला पदाधिकारी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यासमोर त्याचे सादरीकरण केले. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर मुंबई भाजपचे विशेष चित्रीकरण पथक नगरला गिल्डा यांच्या घरी आले व त्यांच्या या अनोख्या कुकरी शोचे चित्रीकरण केले गेले. या उपक्रमात दोन्ही पूजांनी तब्बल 9 पदार्थ बनवले. ते करण्यासाठी खाद्यतेल वा गॅस वापरण्याची गरज पडली नाही. फक्त नाचणीचे थालीपीठ करण्यासाठी त्यांनी इंडक्शन इलेक्ट्रिक शेगडी वापरली.
घरगुती साहित्यातून निर्मिती
दोन्ही पूजांनी घरगुती साहित्य व कच्च्या भाज्यांपासून बहुतांश खाद्यपदार्थ बनवले. भिजवलेल्या ओटस्पासून दही-भातासारखा कर्ड राईस विदाऊट राईस, भिजवलेली मटकी-मूग व मखाणा वापरून स्प्राउट भेळ, नाचणी पीठ व बेसन पीठाचे थालीपीठ, चिया सीड दुधात भिजवून त्यात मध व ड्रायफ्रूटस् टाकून चिया सीड पुलिंग हा गोड पदार्थ, हरभरा डाळ व गहू पीठापासून बनवले जाणारे सातूचे पीठ गुळाच्या पाण्यात भिजवून होम मेड प्रोटीन शेक, बाजार मिळणार्या प्रोटीन पावडरमध्ये दही व आंबा समाविष्ट करून त्याचा स्मुदी बाऊल तसेच ग्रीन डिप सॅन्डविच व बारीक चिरलेल्या कच्या फळ भाज्यांमध्ये दही टाकून हंग कर्ड सॅन्डविच आणि ज्वारी बारा तास भिजवून त्याची साबुदाण्यासारखी खिचडी असे 9 खाद्यपदार्थ केले. मुंबईच्या पथकाने हे खाद्यपदार्थ करतानाचे पूर्ण चित्रीकरण केले व त्याचे संकलन करून सुरेख सादरीकरण रिल्स बनवले. त्यांचे सादरीकरण नुकतेच प्रदेश भाजपच्या झूम मिटींगमध्ये झाले व सर्वांकडून त्याचे स्वागत झाल्याने आता राज्यभरातील महिलांपर्यंत व त्यांच्याद्वारे घरा-घरातील महिलांपर्यंत ते पोहोचत आहेत.

याबाबत गीता गिल्डा यांनी सांगितले की, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या प्रेरणेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रोत्साहनातून खाद्य पद्धतीचा जागर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पंतप्रधान नरेंज्र मोदी हे नेहमी आत्मनिर्भरता, संसाधनांची बचत आणि निरोगी आरोग्याची जीवनशैली याचा आग्रह धरतात हेच लक्षात घेऊन हा उपक्रम करण्यात आला.
दरम्यान, गॅस व तेल बचतीचा संदेश देताना शारीरिक आरोग्य जपणार्या पदार्थांचा खाद्यपदार्थांतील वापर सर्वांचीच दाद मिळवून गेला आहे. हे सादरीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. यानिमित्ताने अहिल्यानगरच्या तीन लेकींचा अनोखा प्रयोग राज्यभरातून कौतुक मिळवून जात आहे.
“ग्रामीण पदार्थांचा अभ्यास”
दोन्ही पूजांनी केलेले 9 खाद्यपदार्थ बहुतांश शहरी भागातील मध्यमवर्गीय व उच्च मध्यम वर्गीयांकडून स्वीकारले जाऊ शकतील. पण देशातील ग्रामीण भागातील महिलांना करता येतील व त्यांच्याकडूनही गॅस व तेल बचत कशी होईल यादृष्टीने ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांचा अभ्यास दोन्ही पूजांकडून सुरू आहे. लवकर असे खाद्यपदार्थ कसे करायचे, याचे सादरीकरण करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800