“स्टोनहेंज”
सकाळी सॅलिसबरी स्टेशनला पोहोचलो. स्टेशनबाहेर प्रचंड ऊन होतं. विलोभनीय निसर्गही मलूल झाला होता. तिथून स्टोनहेंज (मराठीत ‘लटकणारे दगड’) पाहायला जायचं म्हणजे जीवावर आलं होतं. पण आलोच आहोत तर बघू म्हणून टॅक्सीनं गेलो.
मुख्य ऑफिसमधून तिकीट आणि माहिती घेऊन जवळच्या प्रदर्शनात डोकावलो. तिथे कळलं – स्टोनहेंज हे इतिहासपूर्व काळातील मंदिर आहे. दगडांची रचना सूर्याच्या हालचालींनुसार केली आहे. त्याची निर्मिती एकाच काळात झाली नाही. शेकडो वर्षांपासुन अनेक पिढ्या त्याची उभारणी आणि पुनर्रचना करत होत्या.

पर्यटन केंद्राच्या बसमध्ये बसून बराच दूर गेलो. तिथे प्रचंड मोठे दगड विशिष्ट पद्धतीने उभे दिसले. हे इ.स.पूर्व नवपाषाणयुगीन लोकांनी बांधलेलं भव्य समाजमंदिर. काळाच्या ओघात त्याची मोडतोड होऊन भल्या मोठ्या शिळांचे अवशेष उरले आहेत.
सुरक्षा रक्षक सांगत होते, जेव्हा चाकांचाही शोध लागला नव्हता, तेव्हा दूरवरून हे प्रचंड दगड बैल आणि दोऱ्यांच्या सहाय्याने ओढून आणले गेले. सूर्याची बदलणारी स्थिती या वास्तूतून ओळखता येत होती. या अर्थाने तीहा त्या काळातील खगोल वेधशाळा होती. सापडलेल्या भांडी- व्यापाराचं अस्तित्व सिद्ध होतं. जवळच एकत्र जमण्याची, उत्सव साजरे करण्याची तसेच अंत्यसंस्काराची जागा होती.
मुख्य ऑफीसजवळ, तत्कालीन लोकांची दगड-मातीची घरं प्रतिकृतीत दिसली. हजारो वर्षांपूर्वीचं कौटुंबिक जीवन उभं राहिलं. लहान घरात मध्यभागी चूल होती. झोपण्यासाठी लाकडाचे बिछाने होते. पाणी साठवत होते. पाळीव प्राण्यांसाठी घराच्या बाजूलाच हवेशीर खुराडी होती.
थंडीपासून बचाव शेकोटी करे आणि कडक उन्हातही नैसर्गिक वातानुकूलित हवा राहील अशी रचना होती.
पाषाणयुगातील समाजजीवनातील एकात्मिक भावना आणि समृद्ध सांस्कृतिक जीवन – याचं मूक समालोचन स्टोनहेंमधल्या प्रचंडकाययू दगडांनी केलं.
सगळं पाहून कॅन्टीनमधून पदार्थ पोटपूजा केली, पण त्या पदार्थांच्या थंडपणात स्टोनहेंजमधली ऊब नव्हती.
दोन निरीक्षणं :
१) मुख्य केंद्राजवळ दुकानात स्टोनहेंजचे विविध आकाराचे मॉडेल धातू, कापड, कागद, प्लॅस्टिकमध्ये विकले जात होते. लोकांची झुंबड उडाली होती. काही हजार वर्षांपूर्वीचं ‘अँटिक जीवन’ आता ‘अँटीक शोपीस’ बनून घरांची शोभा वाढवणार होतं.
२) जवळच्या म्युझियममध्ये, जगभरातील प्राचीन घरांची स्थिती चित्रांतून मांडली होती. लहानपणी शाळेत वाचलेलं इतिहासाचं पुस्तक आठवलं. इ.स.पूर्वी इथून हजारो मैल दूर असलेली सिंधू संस्कृती विकसित होती. तिथेही पक्क्या वीटांच्या घरात लोक राहत होते. सण-उत्सव साजरे करत होते. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन संपन्न होतं.
स्टोनहेंज आणि सिंधू संस्कृतीतील लोक व्यापाराने जोडले गेले असतील का ? हा इतिहास पुढे का आला नसेल ? याचाच विचार करत तिथून निघालो.
क्रमशः
— लेखन : प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800