पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व नागरिक जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना लोकप्रतिनिधी स्थानिक संस्था, विद्यार्थी, व्यापारी, तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
टेबल लॅड व्यापारी असोसिएशन, पांचगणी यांच्या सहकार्याने टेबल लॅड पठार व पांडवांची चूल परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत एकूण २५ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवून सुमारे १२० किलो कचरा संकलित केला .
पर्यटकांसाठी आकर्षण असणाऱ्या पांडवाची चूल येथून जवळपास २ पोती कचरा संकलित करण्यात आला. पर्यटनस्थळ परिसर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे येणाऱ्या पर्यटकांमध्ये पाचगणी येथील महत्वाच्या अश्या टेबल लॅड येथे जबाबदार पर्यटन विषयी जनजागृती होण्यास मदत झाली. तेथे आलेल्या पर्यटकांनी सदर उपक्रमाचे कौतुक करत सदर स्वच्छ सुंदर पांचगणी व जबाबदार पर्यटन ला हातभार लावला.
सदर उपक्रमासाठी टेबल लॅड व्यापारी असोसिएशन, पांचगणीचे अध्यक्ष सुधाकर के.बगाडे, सचिन जानकर, राजेश बगाडे, निलेश मोरे, जोसेफ फर्नांडीस यांच्यासह असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य यांचे सहकार्य लाभले.
यानंतर संजीवन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून संजीवन नाका मैदान परिसरात ‘सीड बॉल थ्रोईंग’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी बीजगोलांच्या माध्यमातून हरित क्षेत्र वाढीसाठी योगदान देत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तसेच संजीवन नाका ते गणेश पेठ रोड या मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा संकलित करून नागरिकांना स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक करत सदर उपक्रमांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनातील नागरिकांची भूमिका तसेच शाश्वत कचरा व्यवस्थापनाची आवश्यकता याविषयी थोडक्यात माहिती दिली.
यावेळी पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, सुरेश मडके, पत्रकार संघाचे सचिन टक्के, रविकांत बेलोशे व लहू चव्हाण यांच्यासह हिलदारी टीम व संजीवन विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर सहभागी विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमांना पांचगणीचे नगराध्यक्ष श्री. दिलीप बगाडे, आरोग्य सभापती राजश्री सणस, मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील व सर्व नगरसेवक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
सदर उपक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी हिलदारी टीमचे गणेश शेडगे, शुभम महाजन, निखील खरात, दीपाली धनावडे, प्राजक्ता बोडरे व ईश्वरी पिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800