Home साहित्य पाऊस दाटलेला

पाऊस दाटलेला

1

हरवून कसा गेला
तो पाऊस दाटलेला
आशेच्या हिंदोळ्यावर
एक मेघ सावळलेला

अतिप्रिय तयास होणे
मुक्त धरेच्या कुशीत
आतुर होई सांगण्या
मधु प्रीतीचे गुपित

बरसतो टपोरे मोती
कधी रिमझिम नाजूक
करुनी मृदेस पुलकीत
होतो उगाच भावुक

रंगवे मिलन सोहळा
सृजनाचे गीत गात
नटवूनी प्रिय सखीस
भिजतो सुखामृतात

वाटते हल्ली जाहला
अलिप्त पर्जन्य राजा
का असेल दूर लोटला
गडगडाटाचा बाजा

जीव घेतो अबोला
येतो जातो अवचित
असह्य दुरावा साहते
आगळी वसुधेची रीत

मनिषा पाटील

— रचना : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version