वाचन संस्कृती वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पुस्तकप्रेमी समूहाचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 23 व 24 मे 2026 रोजी कराड येथे संपन्न झाले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात सुमारे 100 हून अधिक साहित्यिक, कलावंत, रसिकांची उपस्थिती आणि विविध साहित्यिक कलांचे सादरीकरण यामुळे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ प्रकाशक श्री. अनिल मेहता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुस्तकप्रेमी समूहाचे संस्थापक श्री. कृष्णा दिवटे यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका मांडून गेल्या चार वर्षातील संमेलनांचा आणि सहा वर्षातील पुस्तकप्रेमी समूहाच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला.
सकाळच्या सत्रात ठाणे येथील लेखिका सारिका कुलकर्णी यांचे खुमासदार अभिवाचन झाले. भटकंतीत गवसलेले अप्रूप हा विषय मांडताना प्रदीप कुलकर्णी (ठाणे) यांनी पर्यटनादरम्यान आलेले अनुभव शब्दांकित केले. पुणे येथील अनिरुद्ध वैद्य यांनी हस्ताक्षर आणि स्वभाव यांचा संबंध याबाबत केलेले संशोधन सादर केले. ठाणे येथील प्रख्यात कवी अनंत जोशी आणि इचलकरंजी येथील चार्टर्ड अकाउंटंट विश्राम कुलकर्णी यांनी कविता सादर केल्या.

दुपारच्या सत्रात अलका जोशी (पुणे) यांनी पु लं आणि सुनीताबाई यांच्या सहजीवनावर आधारित अतिशय भावपूर्ण असा दृकश्राव्य कार्यक्रम सादर केला. अश्विनी निवर्गी (उदगीर), गौरी दातार (रत्नागिरी) तसेच प्रतिमा मुरुगकर (पुणे) यांनी कथा सादर केल्या, तर स्मिता पतकी यांनी युद्धजन्य परिस्थितीतील असहाय्य स्त्रीचे स्वगत सादर केले.
दुपारच्या सत्रातील डॉ विजयकुमार देशमुख आणि ऋचा देशमुख यांनी केलेले लोकनाट्याच्या अंगाने जाणारे सादरीकरण चांगलेच रंजक ठरले.
पुस्तकप्रेमी समूहाचा मुख्य उपक्रम असलेल्या पुस्तक परिचयांपैकी काही पुस्तकांचा परिचय समाविष्ट असलेल्या ‘संचित पुस्तक प्रेमींचे’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सायंकाळच्या सत्रात मंजिरी धामणकर यांच्या ‘चर्पटमंजिरी’ या निवेदनातील गमतीजमती वर आधारित कार्यक्रमाने संमेलनातील रंगत वाढवली. वैशाली भागवत (बडोदा) यांनी अभिवाचन सादर केले. रंगरेषांच्या जगाची गोष्ट या चित्रकार आणि कवयित्री प्रिया देशपांडे (कोल्हापूर) यांच्या दृकश्राव्य सादरीकरणाने उपस्थितांची वाहवा मिळवली.
सुप्रसिद्ध साहित्यिक व पोटविकार तज्ञ डॉ. संदीप श्रोत्री (सातारा) यांनी ‘स्नो, सिंपलीसिटी अँड स्पिरीच्युअलिटी’ या आपल्या गिर्यारोहण मोहिमेतील अनुभवांवर आधारित सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मुंबई येथील डॉ. महेश अभ्यंकर यांनी शतायुषी होण्यासाठी घ्यावयाची आरोग्याची काळजी याबाबत वैद्यकीय भाषेत पण खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले. पहिल्या दिवसाची सांगता लोकप्रिय कवी अरुण म्हात्रे यांच्या काव्य मैफिलीने झाली.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. राजेंद्र प्रभुणे (वाई) यांच्या ‘चित्रनिर्मितीची प्रक्रिया’ या स्वानुभवावर आधारित असलेल्या सादरीकरणाला रसिकांची दाद मिळाली. छ. संभाजीनगरचे श्री.प्रमोद देशपांडे यांनी सादर केलेल्या भाषाबंध या कार्यक्रमाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुधीर मुळे (मुंबई) यांचे कविता वाचन तसेच दीपक तांबोळी (जळगांव) यांचे कथाकथन सकाळच्या सत्रात सादर झाले. दिपाली चरेगावकर (सातारा) यांच्या एकपात्री कार्यक्रमाने धमाल उडवून दिली.
दोन दिवसांच्या या संमेलनात रंजना शितोळे (पुणे), सुलेखा आराध्ये (सोलापूर), श्रेया राजवाडे (मुंबई), डॉ. कुमार ननावरे (कोल्हापूर), यशवंत बर्वे (चिपळूण) आणि अविनाश गडवे (नाशिक) या पुस्तक प्रेमी समूहातील सदस्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संमेलन यशस्वी होण्यासाठी संस्थापक श्री कृष्णा दिवटे तसेच त्यांचे सहकारी श्री. विकास मोघे यांचे मार्गदर्शन याबरोबरच श्रेया राजवाडे, सचिन केळकर, केदार मारुलकर, अविनाश गडवे, सुनील गोबुरे यांचे सहकार्य लाभले. पूर्वा धारप, प्रियंका आचार्य आणि कौशिक लेले यांनी संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन केले. संध्या साठे- जोशी यांनी आभार मानले. वंदे मातरम आणि पसायदानाने या संमेलनाची सांगता झाली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800