Home साहित्य पुस्तक परिचय: “अनुभूती”

पुस्तक परिचय: “अनुभूती”

0

सौ साधना आठल्ये यांचा “अनुभूती” हा काव्यसंग्रह नुकताच
वाचला. अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य कविता, स्त्रीच्या नाजूक पण कणखर मनासंबंधी आणि विविध प्रकारच्या विषयांवरच्या कविता वाचताना या कविता संग्रहातून बाहेर पडावे असे वाटतच नाही. पुन्हा पुन्हा या कवितांची अनुभूती घ्यावी असेच वाटत रहाते.

काही कवितांतून त्यांची देवाची श्रद्धा, त्याप्रती विनम्रपणा, त्याचे मानलेले आभार उदाहरणार्थ “राहो साथ जीवनभराची” ह्या कवितेमध्ये

“या एकांती नसे सोबती मला न वाटे त्याची खंत,

जगत नियंता मनी वैखरी सतत असे हो त्याचा संग”

किंवा

हेचि दान मागते तुज” ह्या कवितेत

“हे परमात्मा नको मज खूप काही,

मी थोड्यातच तृप्त असे,

जे जे मजला देसी देवा,

इतरांसही दे दान तसे”

तसेच त्यांच्या कवितेतून निसर्गाचं रौद्ररूप “चक्रीवादळ” यात दिसते, तर “मनस्वी भेट” मध्ये व्यक्त झालेली गूढ शांतता. निसर्ग कवितेत “सोनसळी बहावा”, “लागे वसंताची चाहूल”, “अरे सूर्या”, “आकाशगंगा”, “अशा कशा या लाटा” यासारख्या अनेक कविता मधून प्रेम, त्याग, निसर्गाचं अतिशय सुंदर वर्णन.

स्त्री विषयक कवितेत, “रुसलेली कळी, “या कातर वेळी”, “चौकट”, “हो अजून काही स्त्रिया” अशा अनेक कवितेतून समाज, स्त्री मन, स्त्री शक्ती, तिची जिद्द हे खूप उत्कटपणे व्यक्त केलय.

प्रेम कवितेत “निळ्या सावळ्या श्यामा”, “जशी आवडते मज”, “कधी कधी वाटतं” अशा अनेक कवितांमधून, प्रेम, माणसा माणसा मधील प्रेम, निसर्गाचे प्रेम, देवावरची श्रद्धा. आणि या सर्वांमध्ये एकमेकांत गुंतलेले असे बंध अतिशय सुंदर रितीने गुंफले गेलेत आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यात, सौ साधनाताई यशस्वी झाल्यात आणि ती अनुभूती आपण त्यांच्या कविता वाचल्यावरच घेऊ शकतो.

त्यांच्या कविता मनात सतत रेंगाळत राहतात, प्रेरणा देतात. कवितेतील ते क्षण त्या भावना तो अनुभव कधीच आपला होऊन जातो तेच कळत नाही. हेच त्यांच्या कवितांचं यश आहे असं मला वाटतं
त्यांच्याच “निळ्या सावळ्या श्यामा”या कवितेमध्ये म्हटल्याप्रमाणे मन मानस व्यापूनि राही..मन मानस व्यापूनि राही…अशी अवस्था होते.

काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ तर खूपच साजेसे आहे. निसर्गाचे, त्या दैवी शक्तीचे मुक्त हस्ताने आभार मानत त्यात एकरूप झालेली युवती.

नीता देशपांडे
  • – परीक्षण : नीता देशपांडे पुणे
    – संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version