जहाज जॉईन करण्यासाठी कधी निघाव लागेल याचा फोन एक दिवसाआड मुकुंद ऑफिसला करतच होते. शेवटी एकदा लोकपालक ही शिप विशाखापट्टण या पोर्टला येत आहे. तुम्ही जॉइनिंग साठी तयार रहा असं ऑफिसने मुकुंदांना सांगितलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुकुंद ऑफिसला गेले. त्यावेळी ते मोगल लाईन या शिपिंग कंपनीमध्ये काम करत होते. विशाखापट्टणला आमच्या दोघांच्याही जॉइनिंग बद्दल लागणारी सर्व कागदपत्रं, आम्हा दोघांची तिकिटे कंपनीच्या ऑफिस मधून ते घेऊन आले.
दोन दिवसानंतर ट्रेनने आम्ही विशाखापट्टणला निघणार होतो. शिपवर जायचं आहे हे माहित असलं तरी प्रत्यक्ष ती वेळ येऊन ठेपल्यावर घरातला सारा माहोलच बदलून गेला. निघायच्या तयारीची गडबड सुरू झाली. जहाजावर जायची उत्सुकता, उत्साह होताच… पण एक व्याकूळता ही मनाला व्यापून राहिली होती.
मुकुंदांच्या आवडीचे बेसनाचे लाडू,चिवडा,चकली आणि काय काय बरोबर करून देऊ असं सासूबाईंना होऊन गेलं होतं. थोडासा घरातला तयार केलेला मसाला पण त्यांनी दिला.
आमची बरोबर घ्यायच्या सर्व सामानाची तयारी, बांधा बांधी सुरू झाली.अगदी सुई दोरा, टॉयलेटरीज, आवश्यक ती औषधे, कपडे, पुस्तकं, एक पत्र्याची ट्रंक भरून माझी एम.ए.च्या अभ्यासाची वह्या-पुस्तकं सारं सज्ज झालं.
कंपनीच्या नियमाप्रमाणे दोघांचाही medical checkup, doctor’s certificate वगैरे सर्व झालं. शेवटी तो निघायचा दिवस आलाच…आणि जिवाची नुसती घालमेल झाली. आता खूप महिने भेट होणार नाही हे तर होतंच ! वहिनीच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं. लाडक्या लेकाच्या आवडीचे पदार्थ करून वहिनी वाढत होती.
बाळ जातो दूर देशा
मन गेले वेडावून
आज सकाळपासून
हात लागेना कामाला
वृत्ती होय वेड्यावाणी
डोळ्याचे खळेना पाणी
वहिनी… म्हणजे सासूबाईंची अवस्था खरोखर अशीच झाली होती. आयुष्यभर असंख्य वेळेला याच जीवघेण्या अनुभवातून त्या गेल्या होत्या.त्याची ही माझ्यासाठी पहिलीच झलक होती ! मी आणि वृंदा तेवढ्यात अगदी धर्मकृत्य असल्यासारखं संध्याकाळी शर्मा चाटवाल्याकडे जाऊन भेळपुरी, शेवपुरी खाऊन आलो.
जहाजावर जायची खूप ओढ होतीच, पण घर सोडून जाताना फार फार व्याकुळ व्हायला झालं. दादा-वहिनी, वृंदा, शेजारची मंडळी सर्वांना सोडून जहाजाच्या न माहित असलेल्या विश्वात मी प्रथमच पाऊल टाकणार होते.
सांगलीला घरी आई-बाबां बरोबर शेजाऱ्यांच्या फोनवर बोलणं झालं. त्यांचंही मन उचललं होतं. कितीतरी सूचना देत होते. काळजी घ्या, एकमेकांना सांभाळा असं सारखं सांगत होते.
ट्रेनला जाण्यासाठी टॅक्सी आली. सामान भरलं. वहिनीने आमच्या हातावर दही-साखर घातली. माझी ओटी भरली. वृंदा, वहिनी, मी तिघींच्या ही डोळ्याला आसवांचा पूर लोटला होता. दादा वहिनींच्या पाया पडलो. दोघेही टॅक्सीत बसलो. आता विशाखापट्टणकडे ट्रेनने आमचा प्रवास सुरू झाला. निरनिराळ्या प्रांतातून ट्रेन जात होती. प्रांतोप्रांतीच्या विलोभनीय निसर्गाचं, वेगळ्या भाषा, पोशाख असलेल्या आपल्याच देशातल्या माणसांचं, गावांचं दर्शन घडत होतं.
एवढा मोठा प्रवास मी प्रथमच करत होते. ट्रेनमध्ये दोन रात्री, तीन दिवस काढायचे होते. एक वेळचं जेवण आम्ही बरोबर घेऊन आलो होतो. पण पुढची सर्व जेवणं, नाश्ता चहा-कॉफी त्या ट्रेनच्या केटरिंग कडे ऑर्डर केली.
बरोबर शब्दकोडी सोडवायचा एक भला मोठा पेपर घेतला होता.अधून मधून कोडी सोडवणं, मुख्य म्हणजे खिडकीतून बाहेरची मजा बघणं यात भरपूर वेळ जात होता. बरोबर एक पत्त्याचा कॅट पण होता. अधून-मधून पत्त्यातला सात-आठ… म्हणजे आमच्या सांगलीच्या भाषेत मांडिंनडाव, रमी असे पत्ते खेळत होतो. थोडी चिडाचिडी पण होत होती. म्हणजे मी हरले की मुकुंद चिडवत होते.
ऑक्टोबर महिन्यात दोन रात्री तीन दिवसांचा प्रवास करून दमून भागून विशाखापट्टणला पोहोचलो. अंग अक्षरशः अंबून गेलं होतं. आम्हाला नेण्यासाठी विशाखापट्टण मधला कंपनीचा एजंट आला होता. कार मध्ये सामान भरलं. लोकपालक जहाजावर जायची माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण शिप बंदरात जेट्टीला आलेली नव्हती.ती किनाऱ्यापासून खूप दूर मध्य समुद्रात अँकरेज मध्ये नांगर टाकून उभी होती.
आपल्याकडे कार पार्किंग साठी जशी रिकामी जागा लागते तशीच जहाजासाठी पण बंदरात यायला रिकामी जेट्टी म्हणजे जहाजाचा धक्का लागतो. बंदरात किनाऱ्याला असे अनेक धक्के म्हणजे जेट्टी बांधलेल्या असतात. पण सर्व मोठ्या बंदरातून शेकडो मोठ्या जहाजांची ये जा सुरू असते. त्यामुळे जेट्टी रिकामी होईपर्यंत काही जहाजांना वाट पाहत लांब समुद्रात नांगर म्हणजे अँकर टाकून उभे राहावे लागते. बंदरा पासून खूप लांब असलेल्या या भागाला अँकरेज असं म्हणतात. आता आमच्या जहाजाला आत बंदरात कधी यायला मिळणार, याची वाट पाहणं आलं.
लोकपालक शिप किनाऱ्याला येईपर्यंत कंपनीने आमच्या मुक्कामाची व्यवस्था अप्सरा नावाच्या हॉटेलमध्ये केली होती. एजंटने आम्हाला हॉटेलच्या रूमवर पोहोचवलं आणि तो निघून गेला.
तो दिवाळीचा आदला दिवस होता. नवे लग्न झालेले आम्ही दोघंच त्या दिवाळीला घरच्या मंडळींपासून खूप लांब आलो होतो. आपल्याकडे दिवाळीचा जो धुमधडाका असतो तसा आंध्र प्रदेशात नसतो.
ऐन दिवाळीत घरच्या सगळ्यांना सोडून इथे आलो, फार वाईट वाटत होतं.आपल्याकडची फराळाची गडबड, नव्या कपड्याची खरेदी, रांगोळ्या, फटाके, आकाश कंदील,पणत्या, रोजचे जेवणाचे नवे बेत, पाहुणेरावळे, सुगंधी तेल, उटणं, खास दिवाळीचा साबण आणि उदबत्त्यांच्या सुगंधात आणि दिव्यांच्या चमचमत्या माळांच्या, आकाश कंदीलाच्या आणि पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेलं घर….. आणि आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी आपली माणसं….सारं सारं खूप खूप लांब राहिलं होतं….. !
सगळ्यांच्या आठवणींनी माझे डोळे भरून येत होते. माझ्या डोळ्यातलं पाणी बघून मुकुंदाचा जीव कासावीस होत होता. मला जवळ घेऊन खूप समजूत घालत होते.
ते हॉटेलचं जेवण नको वाटत होतं. घरचे वहिनीने दिलेले चिवडा, लाडू, चकली होतेच. त्यात आमच्या रूम मधला गिझर बंद पडला होता. ऐन दिवाळीत पहिली अंघोळ आम्ही थंड पाण्याने केली.
आपल्याकडे दिवाळीला किती छान हवा असते. इथे मात्र त्यामानाने गरम होत होतं. दिवाळी पाडव्याला आम्ही जवळच्या देवळात जाऊन देवदर्शन करून आलो. पहिली दिवाळी म्हणून सुगंधी तेलाची छोटी बाटली, वासाचा साबण दुकानातून घेऊन आलो. मुकुंदाना तेल लावलं. बरोबर स्टीलचं निरंजन, उदबत्तीचा पुडा, उदबत्तीचं छोटं घर, हळदी कुंकू,कापूस पेळू आणला होता. त्याची वात केली. काचेच्या डिशमध्ये आरती तयार केली. उदबत्त्या लावल्या. आमची पाडव्याची आरती झाली. पहिला पाडवा म्हणून मुकुंदानी माझ्यासाठी मस्तपैकी साडी घेतली.
मग आम्ही सिनेमा बघ, फिरायला जा असा वेळ घालवत बसलो होतो. विशाखापट्टणच्या बाजारात फुलांची, गजऱ्यांची रेलचेल होती. मी मनसोक्त गजरे माळून घेतले. बायकोच्या फुलवेडाची हौस नवरा पुरवत होता. शेवटी एकदा “उद्याला जहाज किनाऱ्याला जेट्टीला येत आहे, जॉइनिंग साठी तयार रहा” असा मेसेज आला. आम्ही सर्व बॅगा परत व्यवस्थित भरून जहाजावर जाण्यासाठी तयार झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला जहाजाकडे नेण्यासाठी एजंट कार घेऊन आला. कार मध्ये सामान भरलं गेलं. आता आमच्या जीवन नौकेचा प्रवास जहाजाच्या दिशेने सुरू झाला.
क्रमशः
— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

वाचक हो,
तुम्ही सर्वजण ही लेखमाला नियमित वाचता आहात. तुमच्या पैकी अनेक जण आवर्जून नियमित प्रतिक्रिया पाठवतात. त्या खूप बोलक्या आहेत. या सर्वांची मी अत्यंत आभारी आहे.
माझ्या जहाजाच्या जीवनाला आता सुरुवात होईल. तो सर्व अनुभव शब्दात मांडत असताना मला पण त्या सर्व अनुभवांच्याकडे परत एकदा वळायची संधी मिळते. तुमच्या इतकीच मला सुद्धा उत्सुकता आहे. आपल्याच अनुभवांच्याकडे हे असं वळून पाहणे, त्यांच्यामध्ये परत शिरणं आणि काही क्षण तेच आयुष्य आपण परत जगतो आहोत असं वाटणं ही सगळी एक वेगळीच गंमत आहे.
माझेच हे अनुभव माझ्याकडून एका त्रयस्थ दृष्टीने ही पाहिले जात आहेत आणि ते माझ्यासाठी पुनरानुभव पण आहेत. हे लिहिताना ते आयुष्य मी मनानं परत जगते आहे.माझ्या माझ्याच भूतकाळात एक प्रकारे तो एक परकाया प्रवेशंच होतो आहे.
या साऱ्यात अखंड साथ असणार आहे ती
वाचक हो केवळ तुमचीच !
तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाच्या, मोलाच्या आहेत.🌷🙏
शुभैषी,
वेदवती मुकुंद कुलकर्णी
ऐन दिवाळीत असं घरच्या माणसांपासून दूर राहून जहाजाची वाट बघणं तुमच्यासाठी कष्टाचं होतं, पण आहे त्या परिस्थितीत आनंद शोधण्याचा तुमचा प्रयत्न आवडला!
प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी करून घ्यायची याची ही शिकवण होती.👌🙏
आपल्या माणसापासून दूर गेल्यावर मनात दाटलेल्या भावनांचं शब्दचित्र तू खूप परिणामकारकपणे रेखाटलं आहेस. आपल्या गावातील,आपल्या घरातील दिवाळीची आठवण येणे साहजिकच आहे. जेट्टी, अँकरेज शब्दांचे नेमके अर्थ तू समजावून सांगितले आहेस. वाचकांना विश्वासात घेऊन केलेले हे मनमोकळे लेखन आहे. पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.
फार सुंदर वर्णन करतेस तू. घर सोडताना आईची कशी मनाची स्थिती होते, पहिल्या दिवाळीला घरापासून लांब असताना कसं वाटतं, आपल्याकडची दिवाळी कशी झोकात, झगमगाटात होते, त्याचे खूप छान वर्णन केलेस.
पहिल्या पाडव्याला स्टीलचे निरांजन असून सुद्धा छान ओवाळून घेतलेस ते बरं झालं.
आवडतं आहे तुझं प्रवास वर्णन. अशीच लिही.
खुपच छान वर्णन, तुझ्या प्रत्येक लेखातून सर्व डोळ्यासमोर उभे राहते, कधी एकदा पुढचा लेख येतो आणि आपण तो वाचतो अशी स्थिती होते.
तुमच्या लेखातील विशाखापटनम वाचून लगेचच तिथला निळा समुद्र डोळ्यासमोर तरळला कारण मीही तो अनुभव घेतला आहे. एकीकडे आपली स्वप्नपूर्ती आणि दुसरीकडे आपल्या प्रियजनांपासून दूर आणि ते सुद्धा दिवाळीच्या दिवशी खरंच वेगळा अनुभव होता. अगदी सासरी जाण्यासारखाच. जहाजाचे नाव *लोक पालक* खरोखरी लोकांचा पालक म्हणून तुम्ही दोघेजण तुमच्या या जलप्रवासाला सुरुवात करणार होतात. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा तुमचा प्रवास सुरू होणार होता ही खरंच आनंदाची गोष्ट. घरचा लाडू चिवडा त्याचा आस्वाद घेत आणि बाहेरच्या जेवणाशी तुलना करत तुमची जीवन नौका थोडीशी हलत असल्याची जाणीव झाली असेल. जस जसे मार्गक्रमण होत गेले तसतसे तुमचे मन थोडेफार शांताबाई असेल शांतवले असैल नवीन अनुभव घेण्यासाठी तुम्ही दोघे सज्ज झाले असणार. घरच्या सर्व प्रयोजनांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुमचा प्रवास नक्कीच सुखमय झाला असेल.
*डॉ. सुरेखा विवेक जोशी*
छान वर्णन केलं आहे, घरापासून दूर जायचं, आपल्या माणसांशिवाय रहायचं, विशेषतः सणावारी म्हणजे कठीण जातं जरा.
खूपच छान.आपण बरोबर आहोत असेच वाटते.इतक सगळ आठवतंय म्हणजे कमाल आहे
घराचा निरोप, मुंबई ते विशाखापट्टणम प्रवास, हॉटेल स्टे, पहिला पाडवा आणि बोटीकडे प्रयाण… वा! आता समुद्र प्रवास वर्णनाची उत्सुकता आहे