Home साहित्य मी वाचलेलं पुस्तक : १९

मी वाचलेलं पुस्तक : १९

0

दशक्रिया

‘दशक्रिया’ नावाचा चित्रपट मी दुरदर्शनवर ब-याच दिवसापूर्वी पाहिला होता. प्रसिद्ध लेखक बाबा भांड यांच्या याच नावाच्या कादंबरीवर तो बेतलेला होता म्हणून ही कादंबरी घेण्याचा बरेच दिवस प्रयत्न करत होतो. अखेर ‘दशक्रिया’ या नावाचे पुस्तक मिळाले. तथापि ते कादंबरी ऐवजी दशक्रिया चित्रपटाच्या पटकथेचे होते. अर्थात ते वाचून काढले. परंतु त्यामुळे मूळ कादंबरीची उत्सुकता प्रखरतेने वाढली. काही दिवस इतर अनेक पुस्तके वाचून काढल्याने पुन्हा एकदा ‘दशक्रिया’ कादंबरीची आठवण झाली. मग पुस्तक दुकानात शोधतांना दहावी आवृती हातात आली आणि मग मी ती झपाटल्यागत वाचून काढली.

बाबा भांड यांच्या यापूर्वी एक दोन कादंब-या मी वाचल्या होत्या. व्यवसायाने ते प्रकाशक – लेखक आहेत, अगदी सहज ओघवती बोली भाषाशैली, सुक्ष्म निरीक्षणातून सभोवतालचे, परिसराचे अतिशय सुरेख आणि परिपूर्ण चित्रसदृष्य वर्णन ही त्यांची ताकद मला या ‘दशक्रिया’ कादंबरीत प्रकर्षाने जाणवली़.

पैठण गावचे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक धार्मिक स्थळ महात्म्यावरची, लोकजीवनाची माहिती कुशलतेने त्यांच्या कसदार लेखणीतून दृष्टीस पडली हे या कादंबरीचे वैशिष्ट्य मला प्रथमदर्शनी भावले !

तशी ही भानुदास उर्फ भान्या या शाळकरी मुलाच्या आयुष्याची कहाणी आहे.
बुध्दी, चातुर्य व साहस पणाला लावून पोटाची खळगी भरू पाहणा-या दारिद्र्य्याने ढासळून गेलेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भानुदासची कहाणी हळूहळू विस्तारत जाते आणि रोगट रूढीमुळे, विदारक जातिव्यवस्था, धर्माला आलेली अवकळा, पार कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, उच्च-नीच वर्गांना व वर्णांना पोटासाठी एकाच पातळीवर आणणारी विचित्र समाज स्थिती, अर्थाजनाचे एकाचवेळी संतापजनक व करुणाजनक पर्याय, आधुनिकीकरणाकडे पाठ फिरवणारे समूह, मानवी नात्यांचे पैशांमुळे पटापट बदलत जाणारे रंग, मृत्यू आणि धर्माबाबतचे चिंतन, सोनेरी इतिहासाचे सडलेले कातडे अंगावर ओढून सुस्त पडलेली नगरी या व इतर, वैचारिक भुमिका, खोलवर चिंतन अशा अनेक बाबी कवेत घेत “‘बाबांची’ दशक्रिया'” कादंबरी त्या काळातील स्थितीचा क्लेशदायक दस्तऐवज झाली आहे !

या कादंबरीस महाराष्ट्र शासन उत्कृष्ठ वाङ्ममय पुरस्कार, अमेरिकतील महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार, मराठी साहित्य परिषद ह. ना. आपटे पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, भैरूरतन दमानी पुरस्कार, सोलापूर, तसेच बेळगाव, इचलकरंजी येथील संस्थाचे पुरस्कार मिळाले आहेत हे या कादंबरीचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्यच मानले पाहिजे !

जवळपास २७ वर्षापूर्वी प्रकाशित झालेली ही ‘दशक्रिया‘ कादंबरी मराठीतच नव्हे तर इंग्रजी, हिंदी आणि कानडी भाषेत देखील अनुवादित झाली आहे आणि हे या कादंबरीचे मी अपूर्व यश समजतो.
तत्कालिन वास्तवाला जेंव्हा अवकळा प्राप्त झाली होती तो काळ लक्षात घेता बाबा भांड यांची ही कादंबरी आपल्या समकालीनांच्या साहित्यापेक्षा वेगळी, आगळी वैशिष्ट्यपूर्ण आणि मौलिक अपवादात्मक झाली आहे. सर्व स्तरावरच्या वाचकांना ‘दशक्रिया’ निश्चितच प्रभावित करणारी आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही ! आता पैठणचे, दशक्रिया घाटाचे साधारण २५ वर्षानंतरचे एकूण स्वरुप, समाज जीवन आणि सद्यस्थिती पहाण्याची तीव्र उत्सुकता मात्र या कादंबरीने नकळत निर्माण केली आहे !

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version