Home लेख मुक्त चिंतन

मुक्त चिंतन

0

इच्छामरण – दयामरण- अवयवदान
साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वी पुण्यामध्ये मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती. एक गृहस्थ माझ्या स्मरणशक्ती प्रमाणे बहुदा त्यांचे नाव श्री मंडलिक असे असावे, त्यांनी कोर्टामध्ये एक अर्ज केला होता.

त्यात त्यांनी साधारणपणे असे म्हटले होते की – “मी निवृत्त होऊन काही वर्षे झाली आहेत. माझी पत्नी जिवंत नाही. माझी मुले चांगली आहेत. माझी काळजी घेतात. परंतु मी माझ्याच घरात राहत आहे. माझ्या घरात माझी काळजी घेणारी माणसे आहेत. तरीही मी मरत नाही म्हणून जगतो आहे. माझ्या जगण्याला काहीही प्रयोजन नाही. मृत्यू येईपर्यंत जगणे एवढ्या एकाच गोष्टीसाठी जिवंत राहणे मला मान्य नाही. त्यामुळे माझ्या इच्छेने मला मरणाचा हक्क मिळाला पाहिजे.

मला कोणतीही व्याधी नाही. माझे आरोग्य चांगले आहे. व्याधीग्रस्त म्हणून नाईलाजाने किंवा निराशेपोटी मला मृत्यू हवा आहे अशी परिस्थिती नाही. तरीही माझी प्रकृती चांगली असतानाही मला सन्मानाने मरण्याचा हक्क का मिळू नये ? मला आत्महत्या करावयाची नाही. कोणतेही बेकायदेशीर कृत्य करणे मला मान्य नाही. मला कायदेशीरपणे सन्मानाने मृत्यू चा हक्क हवा आहे.” माझ्या माहितीप्रमाणे यासाठी श्री मंडलिक हे सुप्रीम कोर्टापर्यंत लढले परंतु त्यांना मृत्यू चा हक्क मिळाला नाही. त्यानंतर बहुधा हृदयक्रिया बंद पडून कालांतराने त्यांचा मृत्यू झाला.

मंडलिक यांचे विचार आणि त्यांचे म्हणणे यात चुकीचे काय आहे ? मला त्यांचा विचार तंतोतंत पटतो आहे. म्हणून आपल्या देशात इच्छामरणाचा कायदा होणे गरजेचे आहे असे मला वाटते.

खरं म्हणजे इच्छामरण आणि दयामरण असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. अनेक जण त्यामध्ये गोंधळ घालतात. काही वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दया मरणासाठी परवानगी दिलेली आहे. एखाद्या व्यक्तीला, ती व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असताना कृत्रिम उपायांनी त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहणे आणि त्यामध्ये त्या माणसाला आणि त्याच्या नातेवाईकांना सुद्धा त्याचे जगणे हे अत्यंत वेदनादायी आणि कष्टप्रद होत असते, त्यामुळे अशा वेदनादायी अवस्थेत उपचार घेत असलेल्या रुग्णावर त्याचे सर्व उपचार थांबवून त्याला शांतपणे मृत्यू घेण्याची परवानगी देता यावी. (अर्थात त्या रुग्णाच्या इच्छेने)

हा कायदा जरी मंजूर झाला असला तरी त्याची अंमलबजावणी कितपत होऊ शकत असेल याबाबत शंका आहे.
पण तरीही इच्छामरण आणि दयामरण यामध्ये अजूनही कोर्ट किंवा वकील किंवा कायदेतज्ञ किंवा वैद्यकीय तज्ञ हे चर्चा करायला सुद्धा तयार दिसत नाहीत. म्हणूनच मुळातच इच्छामरण आणि दयामरण यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. काही देशांमध्ये इच्छामरणाचा व काही देशांमध्ये इच्छामरण व दयामरण दोन्ही पद्धतीच्या मरणाचा हक्क न्यायसंस्थेने मान्य केलेला आहे. भारतामध्ये अजून त्यासाठी मागणी मोठ्या प्रमाणात पुढे व्हायला पाहिजे. त्यासाठी नवीन कायदा निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली पाहिजे असे वाटते.

सध्या जागतिक सरासरी प्रमाणे व्यक्तीचे वय 70 वर्षे आहे. त्यामुळे कायदा करताना 70 वर्षानंतर इच्छा मरणाची इच्छा व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला सन्माननीय मरणाचा हक्क प्रदान करता आला पाहिजे.
यामध्ये गैरप्रकार होऊ नयेत यादृष्टीने अनेक सुधारणा करून त्या कायद्याला चांगले स्वरूप देता येईल आणि माणसाला सन्माननीय मृत्यूचा हक्क प्रधान करता येईल अशा दृष्टीने कायदा निर्माण करण्याची गरज आहे.

अशा तर्‍हेने इच्छामरण आणि दयामरण या दोन्हीचा कायदा झाल्यास जो मनुष्य मरणाला इतक्या धैर्याने सामोरा जात असेल त्या माणसाला अवयवदाना संबंधी जर प्रबोधन केले तर या इच्छा मरणाच्या किंवा दया मरणाच्या नंतर शरीरामध्ये उपलब्ध असलेले चांगले अवयव काढून घेण्याची परवानगी सहसा तो नाकारणार नाही. अवयव दानासाठी किंवा देहदानासाठी सूद्धा या कायद्याचा उपयोग होऊ शकेल. विचारवंतांनी यावर विचार मंथन करून सरकार कडे देण्यासाठी काही निश्चित निवेदन तयार करून त्याचा पाठपुरावा करण्यास काय हरकत आहे ?

सुनील देशपांडे

– लेखन : सुनील देशपांडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version