Home लेख या जगाचे होणार तरी काय ?

या जगाचे होणार तरी काय ?

0

पर्यावरण म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर जंगल, नद्या, डोंगर असे काहीसे चित्र येते. पण पर्यावरणाच्या व्याख्येनुसार, “पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली असणारी सर्व परिस्थिती आणि त्यातील सजीव, निर्जीव घटक हे होत.” या दृष्टीने विचार करता, जगाची सद्य परिस्थिती विचारात घेता, आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की, या जगाचे होणार तरी काय ? आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाचू या, आपल्याला आत्मचिंतन करायला लावणारा हा लेख…
— संपादक

आज अवतीभवतीच्या बातम्या पाहिल्या, वाचल्या की मन अधिकाधिक खिन्न होते. वाटते, चांगले काही घडतच नाहीय का आजकाल ? नीट चा भ्रष्टाचार, कुणा मुलीवर, महिलेवर अत्याचार, कुणाची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या, शेतकऱ्याची ढासळती परिस्थिती, जाती धर्मा पोटी असंतोष.. कुठेही आशादायी चित्र दिसत नाही. पूर्वी चांगले स्वच्छ चित्रपट तरी यायचे. आता येतात ते बघवतही नाहीत. सगळे मनोरंजन वाहिन्या, मालिकांनी काबीज केलेले. पण तिथेही हीच बोंबाबोंब ! महिलाच खलनायिका.. त्याच एकमेकीचा जीव घेतात. कुटुंबात कलह निर्माण करतांना दाखवतात.
आपण बघायचे काय, वाचायचे काय ? आशेने बघायचे कुणाकडे ?

आजकाल अगदी लहान मुले सुद्धा बेदरकारपणे वागताना दिसतात. आईवडिलांना उलट उत्तरे देतात. त्यांना ‘नाही‘ ऐकायची सवयच राहिली नाही. शिस्त, आदरभाव, संस्कार, नीतिमत्ता दिसतच नाही फारशी. कुणी समजवायला गेले, मध्यस्थी करायला गेले तर शहाणपणा शिकवू नका, तुमचे दिवस गेले, असे उत्तर मिळते. कुटुंबातही एकवाक्यता नाही. संवाद तर नाहीच. मोठ्यांचा आदर तर राहिलाच नाही.

केव्हापासून आणि का निर्माण झाली ही परिस्थिती ? साधारण पाच सहा दशकापूर्वी ही परिस्थिती नव्हती. हे कुणीही मान्य करेल. आता या जुने ते सोने म्हणणाऱ्या वृत्तीला कुणी भाबडेपणा म्हणेल. म्हणू द्या. पण कटू सत्य हेच आहे. आपण चांगल्यातून अती चांगल्या कडे जाण्याऐवजी वाईटकडे चाललो आहोत. तसे पाहिले तर कधी नव्हे इतका सर्वच क्षेत्रात विकास झालाय.. कधी नव्हे त्या सुविधा निर्माण झाल्या. नवे तंत्रद्न्यान आल्याने आपले जगणे कितीतरी सुखद झाले. आपण कल्पना देखील केली नव्हती इतके आयुष्य जगायला सोपे झाले. सगळ्यांच्याच हातात खूप पैसा खेळायला लागला. सुशिक्षित, नोकरदार महिलांची संख्या वाढली. त्यामुळे कुटुंबाच्या एकूणच उत्पन्नात कितीतरी पटीने वाढ झाली. पण या पैशानेच आपले समाधान हिरावून घेतले. सुख, आनंद याचा पैशाशी काही संबंध नसतो हे कळायला आपल्याला वेळ लागला. माणसाची हाव कधीच सुटत नाही. दिल मांगे मोर..अशी हावरट वृत्ती असते सर्वांचीच. कितीही यश मिळो, कितीही पैसा, प्रसिद्धी मिळो, आपले कधीच समाधान होत नाही. उलट स्वार्थ, हावरटपणा वाढतच जातो. मग त्यासाठी काहीही करण्याची तयारी असते.

भ्रष्टाचार, खोटेपणा, फसवेगिरी, लुटमार, असे पूर्वी काही भामटेच वाम मार्गाला जायचे. आता तसे राहिले नाही. डॉक्टर, कुलगुरू, न्यायाधीश, आय ए एस, आय पी एस अधिकारी, कुणीही सुशिक्षित घसरू शकतो. नव्हे घसरतोच आहे. हा असे करूच शकणार नाही असा ज्याच्याबद्दल आपल्याला अती विश्वास असतो तीही व्यक्ती नको तितकी घसरलेली बघून आपले डोळे पांढरे होण्याची वेळ येते.

हे फक्त बाहेरच घडते असे नाही. घरात, कुटुंबात देखील घडते. ’हा किंवा ही’ असे वागेल, इतक्या खालच्या पातळीवर जाईल असे वाटले नव्हते..’अशी आपली भोळी समजूत देखील बघता बघता धुळीला मिळते. म्हणजे घरी दारी सगळीकडेच अविश्वासाचे, फसवणुकीचे, अनीतीचे वातावरण आहे.

पैसा वाईट असतो. म्हणजे अती पैसा, नको तितका पैसा नेहमीच घात करतो माणसाचा. हे घरापर्यंत, समाजापर्यंत, आपल्याच देशापर्यंत मर्यादित राहिले नाही. आता हे जे राष्ट्रांराष्ट्रात युद्धाचे त्सुनामी वादळ सुरू झालेय, तेही याचेच लक्षण आहे. प्रत्येकाला महासत्ता, नंबर वन, महागुरू वगैरे व्हायचे आहे. त्यासाठी ही जीवघेणी शर्यत सुरू आहे. रक्तपात सुरू आहे. शोकांतिका ही आहे की इथे कुणीच कुणाचे ऐकायला तयार नाही. प्रत्येकाचे म्हणणे मीच बरोबर. माझेच खरे. अन्याय मी करत नाही. माझ्यावर अन्याय होतोय. हीच भावना प्रत्येकाची. हाच दुराग्रह प्रत्येकाच्या मनात.
पूर्वी काय होते, माणसे भांडायची. मतभेद असायचे. पण तात्पुरते. फार ताणून धरण्याचा आग्रह नव्हता. आज एक जण पडते घेईल, उद्या दुसरा आपले पाऊल मागे घेईल, असा समजूतदारपणा होता. आता तसे काही राहिले नाही. प्रत्येकाचा अहंकार महत्वाचा.

निदान पूर्वी संत मंडळी होती आपल्या आधाराला. अध्यात्म होते सोबतीला. कीर्तन, प्रवचनातून चार चांगले शब्द कानावर जायचे. दृष्टांत ऐकायला मिळायचे. त्यांची सांगण्याची पद्धत देखील इतकी प्रभावी होती की विचार करायला मनाची तयारी असायची. आता अशी संत मंडळी राहिली नाहीत फारशी. असली तरी त्यांच्याकडे जायला, त्यांचे ऐकायला वेळ कुठे आहे कुणाला ? आता तर त्यांची जागा भोंदू बाबांनी घेतली आहे. त्यांचे प्रवचन कीर्तन कोणत्या सूरात रागात चालते, रंगते तेही आपण बघतोच आहोत. थेट जेल मधून लाईव्ह !!

एकूण काय सगळा पैशाचा खेळ आहे. हातात नको तितका पैसा खेळायला लागला. त्यामुळे अजून हवे, अजून हवे असा मोह वाढला. मुले चालायला लागायच्या आत विमानाने प्रवास करायला लागली ! त्यांच्या वॉर्ड रॉब मधील ड्रेसेस ची संख्या वाढली. मोठी माणसे लहान मुलांसमोर ड्रिंक्स घ्यायला लागली. पैशाने काहीही कुणालाही विकत घेता येते अशी वृत्ती बळावली. ती अगदी नव्या पिढीत देखील सहजरित्या रुजली. त्यामुळे कायदा, न्याय व्यवस्था, कशाचाच कुणाचाच धाक उरला नाही कुणाला. सत्यमेव जयते या बोध चिन्हांला कोर्टाच्या, सरकारी कार्यालयाच्याच भिंतीवर फाशी दिल्या गेली !

गंमत अशी आहे की हे सगळे उघड्या डोळ्यांनी बघून देखील तुम्ही आम्ही, म्हणजे शिक्षक, पालक, सरकार, मालक कुणीच काही करू शकत नाही. कुणाजवळच या समस्येचे सध्या तरी उत्तर नाही. उद्याचे कुणी सांगावे ?

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version