Home बातम्या रिव्हीलिंग दि सिक्रेट ऑफ कॅन्सर

रिव्हीलिंग दि सिक्रेट ऑफ कॅन्सर

1

कॅन्सर हा शब्द उच्चारताच आजही भल्याभल्यांच्या छातीत धडकी भरते. तर रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांची काय अवस्था होत असेल ? याची कल्पनाच केलेली बरी !
या आजाराचे गांभीर्य ओळखून अमेरिकेत गेली ४० वर्षे कॅन्सर संशोधक असलेल्या, मूळ मुंबईकर डॉ सुलोचना गवांदे यांनी ३/४ वर्षांपूर्वी “कर्करोग आणि आपण” हे मराठी पुस्तक आणि लिहिले. त्या पुस्तकाला छान प्रतिसाद मिळाला. त्यातूनच कॅन्सर ही जागतिक समस्या असल्यामुळे हे पुस्तक इंग्रजीत असावे, अशा सूचना येऊ लागल्या. त्यामुळे मूळ मराठी पुस्तकात अधिकची भर घालून डॉ गवांदे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण, रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना धीर देणारे आणि मुळातच कॅन्सर होऊ नये यासाठी आपण काय खबरदारी घेतली पाहिजे हे सांगणारे “रिव्हीलिंग दि सिक्रेट ऑफ कॅन्सर” हे इंग्रजी पुस्तक लिहिले.

खरं तर या पुस्तकाचे प्रकाशन डॉ गवांदे या अमेरिकेत ही सहज करू शकल्या असत्या. पण त्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांचे शिक्षण झालेले मुंबईतील रुईया कॉलेजचे सभागृह निवडले. तसेच प्रकाशनासाठी तथाकथित सेलिब्रिटी न निवडता उमेदीच्या काळात ज्यांच्या सोबत काम केले ते आंतरराष्ट्रीय कॅन्सर तज्ञ डॉ एस एच अडवाणी,डॉ रविन थत्ते आणि त्यांचे आदर्श डॉ अनिल काकोडकर यांच्या हस्ते काल पुस्तकाचे प्रकाशन केले.

यावेळी बोलताना डॉ अडवाणी यांनी कॅन्सर विषयीची माहिती देऊन डॉक्टरांनी रुग्णांशी चांगला संवाद साधण्याची कशी गरज आहे, ते विशद केले.

मुंबईतील पहिले प्लास्टिक सर्जन डॉ रविन थत्ते यांनी पुस्तकाचे कौतुक करून विज्ञानाआधी मानवता कशी येते, याचे सुंदर विवेचन केले.

डॉ अनिल काकोडकर यांनी आपण या विषयातील तज्ञ नसून सामान्य माणसाच्या नजरेतून कॅन्सर आणि त्या विषयी बोलणार आहोत, असे सांगून कॅन्सर उपचारांवर होणारा खर्च सर्व सामान्यांच्या आटोक्यात येण्याची गरज प्रतिपादन केली. कॅन्सर जागृती करण्यासाठी डॉ गवांदे करीत असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली.

डॉ सुलोचना गवांदे यांनी मराठी आणि आता इंग्रजी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली. आपण योग्य आहार विहार ठेवला तर ५२ प्रकारचे कॅन्सर टाळू शकतो असे सांगून सुशिक्षित वर्गात ही कॅन्सर विषयी मोठे अज्ञान, गैरसमज आहेत याकडे लक्ष वेधले.

एक वाचक म्हणून आधी मराठी आणि आता इंग्रजी पुस्तकाविषयी आपल्याला काय वाटते, याचे रसाळ वर्णन गणितज्ञ अलका परळकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ज्योस्त्ना ओक यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक या पुस्तकाचे प्रकाशक इनकिंग इनोव्हेशन चे श्री आनंद लिमये यांनी केले. आभार प्रदर्शन रेश्मा कसाल यांनी केले.

या कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती तसेच डॉ गवांदे यांचे सुहृद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम झाल्यावर पुस्तकाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना जीवनशैली तज्ञ डॉ एम नारायणराव म्हणाले की, या पुस्तकामुळे नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगिकारण्याची आणि कॅन्सर झाल्यास त्यास समर्थपणे तोंड देण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल, असा विश्वास वाटतो.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. वा! खूप छान माहिती देणारा आटोपशीर अहवाल. उभय भाषांतील पुस्तके वाचण्याची इच्छा निर्माण करणारा. मन:पूर्वक आभार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version