ललित

0

“आरस्पानी सौंदर्य वसंताचे”

माघात वसंत पंचमी झाली आणि वसंताची चाहुल लागली. देखणा ऋतू.. वसंत ऋतू, ऋतूराजच आहे तो. येतो तो सुद्धा एखाद्या राजकुमारासारखा. आनंद, चैतन्य, ऊत्सव घेऊनच. शिशिराची अनुत्साही पानगळ, निराशा वाढवणारी मोठी रात्र अंधार, बर्फ पडल्याने थंडावलेल्या आळसावलेल्या हालचाली पर्णहीन वृक्ष वेली. सारेच नकोसे होते. अंथरूणात पडावेसे वाटते.

परंतु वसंताची वर्दी येताच शेकोट्या गायब ! दिवस मोठा होत प्रकाश सांडू लागतो. वृक्षवल्लरी नव्या चैत्रपालवीने बहरतात. पानोपानी अधिक नवी फूट हिरवाई आणते. रानावनात फुलोरे फूलतात. पांगारा काटेसावर पळस नवरदेवासारखे लाल रंगात रंगुन मजा आणतात.

कूठे पिवळी कूठे जांभळी गुलाबी फूलांची नक्षीदार झाडे रंगतात. आम्रवृक्षाचा मोहोर सुगंध घेऊन येतो. कोकिळा लगेच पंचम लावत कू हू कू हू करू लागते. सृजनाचा काळ येऊन घरटी किलबिलाट करतात.
अंगणे सारवलेली दिसतात. अंगणात रांगोळ्या चैत्रांगणे सजतात. घरात मखरात चैत्रगौर माहेरी आणुन थाटमाट, आरास, पक्वान्ने, हळदीकूंकू, जाईजुईची शुभ्र सजावट, नव्या कैरीचे पन्हे, आंबाडाळ, काकड्या, चिबुड, कलिंगडे यांची छान रंगसंगती साधली जाते. स्त्रिया नटून थटून हळदीकूंकवाला मोठ्या हौसेने जातात.

आंब्यावर कैरीची तोरणे लटकलेली असतात, फणस बुंध्यापासुन फणसफळे लगडून घेत देखणा होतो. जांभळे, करवंदे कैरी जांब यांची झाडे लेकूरवाळी होऊन मिरवतात. अंगणात जाई जुई कूंद मोगरा अनंत सोनटक्का अबोली बहरतात. जांभळी जांभळे बहार आणतात.

अनेक रंगात वसंत रंगपंचमी खेळतो. अवनीला अंगभर सजवतो. लाल कलिंगडे पिवळी चिबूड टरबूजं, पपया, चिकू नुसती रेलचेल असते. बघावं तिकडे चैतन्याचा बहार असतो.

याच ऋतूत मांगल्याच्या परंपरा घेऊन सण येतात हिंदू वर्षारंभ म्हणजे गुढी म्हणजे हिंदू धर्माची विजय पताकाच घेऊन गुढी पाडवा, रामाचा आदर्श घेऊन रामनवमी, पराक्रम आठवत हनुमान जयंती व शेवटी अक्षयतृतिया असे मंगलमय सणवाराचा आनंद ऊत्साह‌ वेगळाच असतो.

शेवटी वसंत थाटात आम्रफळांची पालखी घेऊन रूबाबात येतो. आम्रफळे वाटुन सर्वांचा निरोप घेतो. अक्षयतृतियेला चैत्रगौरही माघारी जाते आणि हा देखणा सोहळा संपतो.
असा हा आरस्पानी देखणा ऋतूराज. आकाशीचा चित्रकार तो वसंताचे नेहमीच चित्र देखणे रंगवतो.

आता ग्रिष्म येईल कारण पिवळ्या फुलांच्या अंगभर मुंडावळी बांधुन बहावा एखाद्या नवरदेवासारखा हळद लावेल आणि लाल चूटूक अग्नी फूलांचा गुलमोहर रस्तोरस्ती पायघड्यांची शोभा वाढवेल.

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version