आजचे आपले कवी श्री पुरुषोत्तम करमरकर ऊर्फ पुरुदत्त रत्नाकर हे मूळचे जळगाव येथील असून एका तपाच्यावर त्यांचे वास्तव्य बेंगळुरू येथे आहे. यंत्र अभियंता असलेले करमरकर भारतीय आणि जागतिक वाहन उद्योगांमध्ये संशोधन आणि विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. न्युज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
— संपादक
कोसळत्या धारेतला चुकार तुषार व्हावे
अवखळ वार्यासंगे खुशाल पसार व्हावे
गवताच्या पात्यावर अलगद उतरावे
बिन्दु दवाचा होऊन चांदण्यात पहुडावे
येता किरण कोवळे धरणीला बिलगावे
बिन्दु बिंदूंना स्पर्शून प्रवाहपतित व्हावे
पाट इथलेतिथले येता ते निर्झर व्हावे
झुळझुळ झुळझुळ सप्त सुरात म्हणावे
झरे झर्यास मिळता फेसाळती नदी व्हावे
गावोगावी खळखळ्ळ करत वाहत जावे
पार होऊन किनारा सागरमिलन व्हावे
लाट ललाटी शिळांशी धुंवाधार द्वंद्व व्हावे
ऊनऊन उन्हे येता ऊर्ध्वगामी बाष्प व्हावे
नभातला पिंजलेला घोर घनःशाम व्हावे
कडकड कडाडत आगमन कळवावे
झोत विद्युत टाकून कोठे कोरडे बघावे
रथ वार्याचा रोखून रिमझिम बरसावे
हिम होत नगावर शांत ध्यानस्थ बसावे
पाझरत पसरत जल गंगेतले व्हावे
मातीमध्ये झिरपून बिजासवे अंकुरावे
— रचना : पुरुदत्त रत्नाकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
