Home लेख शिवाजीराव भोसले : परीसस्पर्श

शिवाजीराव भोसले : परीसस्पर्श

0

जेष्ठ विचारवंत, शब्दप्रभू, सुप्रसिद्ध वक्ते, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या या जागवलेल्या काही आठवणी. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना विनम्र अभिवादन.
– संपादन
मी १९७३/७४ साली तिसरी किंवा चौथी इयत्तेत असेन. आता नक्की आठवत नाही. बाजाऱ्यांच्या शाळेत होते एवढे आठवतंय.

प्राचार्य शिवाजीराव भोसले हे नुकतेच फलटणच्या “मुधोजी महाविद्यालयात “नियुक्त झाले होते. आमचा “लक्ष्मी निवास” हा लक्ष्मी नगर मधील,बंगला ही नवीनच होता,बराच मोठा प्रशस्त होता . भोसले सरांच्या बंगल्याचे काम सुरू होते म्हणून भाड्याने घर बघण्यासाठी भोसले सर, आमच्या घरी आले.हाॅल मध्ये बसले .वडील किर्तनकार असल्याने आम्हाला घरी आलेल्या पाहुण्यांना नमस्कार करण्याचा प्रघात होता.
आम्ही सर्व बच्चे कंपनी सरांच्या पाया पडलो, सरांनी सर्वांना डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिला आणि आम्ही खेळायला निघून गेलो. हा सरांचा मला मिळालेला पहिला आशिर्वाद.

आमचे मोठे कुटुंब असल्याने सरांना आमच्याकडे रूम मिळाली नाही.पुढे सरांचा बंगला आमच्याच आळीत असल्याने सरांच्या एका हातात सायकल, नी सर चालत, तर कधी सायकल चालवत असे दृश्य नेहमी पाह्याला मिळे. मधे बरीच वर्षे लोटली.माझं लग्न झालं. सासरी, दुधेबावीला, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना झाली. ही व्याख्यानमाला सलग पाच दिवस चालत असे. या प्रतिष्ठानची मी महिला कार्यकर्ती. त्या वेळी ग्रामीण भागातील महिला व्याख्यानाला वगैरेंसाठी घरातून बाहेर निघत नसत. पण माझ्यामुळे मग बऱ्याच महिला व्याख्यानाला येऊ लागल्या. खुप नामवंतांची व्याख्यान होत. मग भोसले सर कसे विसरल्या जातील ? त्यामुळे ३/४ वर्षात एकदोनदा असे सरांचे व्याख्यान गावात होई.
मग काय सरांना गाडीतून उतरून स्टेजवर घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यायची सरांच्या हाताचा तो मऊ मुलायम स्पर्श माझ्या कायम लक्षात राहील.

सरांचे हात फारच मऊ होते. त्यांच्या वाणीत सरस्वतीच विराजमान होती. सरांनी बोलतच रहावं आणि आपण ऐकतच बसावं अगदी युगाच्या अंतापर्यंत. असे सर्व श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे.शेवटच्या व्याख्यानाला तर सरांनी माझा हात अगदी गाडीच्या दाराजवळ गेल्यावरही कितीतरी वेळ धरुन ठेवला होता, मलाही तो सोडावासा वाटत नव्हता. त्यांच्या वाणीतील मधूर शब्द आणि तो मऊ मुलायम स्पर्श मी कधीही विसरणार नाही. त्यानंतर सर महिन्यात वारले .मला खूप तळतळ लागली.सबंध मराठी माणसाला मंत्रमुग्ध करणारा शब्द प्रभू आपल्यातून निघून गेल्याची खंत मनाला खूप बोचते.

कधी कधी वाटतं सरांच्या त्या परीसस्पर्शानेच आपण साहित्यिक म्हणून घडलो, जे काही थोडेफार लिहिले आहे ते त्यांच्याच आशीर्वादाने.
आज भोसले सरांची पुण्यतिथी आहे. त्या महान तपस्वीला मानाचा मुजरा.

आशा दळवी

— लेखन : आशा दळवी. दुधेबावी, जिल्हा सातारा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version