Home लेख सुंदर जगण्यासाठी नाती जपा !

सुंदर जगण्यासाठी नाती जपा !

1

आजकाल नाती गोती संपुष्टात आली की काय अशी शंका येते.माणसे कधी नव्हे इतकी एकमेकांपासून दुरावत चालली आहेत.पूर्वीच्या लळा जिव्हाळ्याची ओल कुठे दिसत नाही. एकतर कुटुंबातील माणसांची संख्याच कमी झाली.पुरुष स्त्री दोघांच्याही हातात पैसा आल्याने कुणाला कुणाची गरज भासेनाशी झाली. परावलंबित्वच संपले.
आधी कुणी मामा, काकांजवळ शिकले,कुणाला मावशीने मोठे केले,कुणाचा सांभाळ आजी आजोबांनी केला असे जुन्या आठवणी सांगताना हमखास ऐकू यायचे.मोठे झाल्यावर देखील त्या जुन्या नात्याविषयी अखंड कृतज्ञता होती.आम्ही त्यांचे उपकार जन्मभर विसरणार नाही असे भारावून बोलले जायचे.

आता कुणीच कुणाचा नाही. अगदी नवरा बायकोच्या नात्याला देखील कीड लागली आहे.आई बापाचे लाखो रुपये खर्च करून लग्न करायचे,नाटकी संस्कार सोहळे करायचे,खोट्या आणा शपथा घ्यायच्या अन् वर्षा आत धुसफूस सुरू. एकमेकांचा द्वेष,मत्सर, तुझे माझे..अशी भांडणे सुरू. कुठेही तडजोडीची भाषा नाही,संयम राहिलेला नाही. एकमेकांना समजून घेण्याइतका पेशन्स देखील नाही.एकदम एक घाव दोन तुकडे हीच टोकाची अविवेकी प्रवृत्ती.

आश्चर्य म्हणजे आधी अशा भांडणाना आई वडिलांची साथ नसे.उलट ते समजावण्याचे,जोडण्याचे काम करीत. तडजोड शिकवली जायची.माघार घ्यायला,शिकवले जायचे. दुसऱ्याचा आदर करायला शिकवले जायचे.आता उलट आई वडीलच आगीत तेल ओतण्याचे काम करतात. भांडण मिटविण्याऐवजी भांडण वाढण्यास मदत करतात,प्रवृत्त करतात! नाती जोडण्याऐवजी तोडण्याचे काम करतात.यालाही कारण तेच..हाती आलेला पैसा! शिक्षणाने मिळालेले स्वातंत्र्य. स्वावलंबित्व.म्हणजे ज्याचा उपयोग सृजना साठी करायचा त्याचा उपयोग विघटनासाठी होतो आहे.

आधी एकत्र कुटुंब पद्धत होती.सणावाराच्या निमित्ताने, लग्न समारंभाच्या निमित्ताने सगळे एकत्र जमायचेच.तिथे ऑप्शन नव्हता.पळवाट नव्हती.ते आद्य कर्तव्य होते प्रत्येकाचे.आता ते कुळाचार घरच्या घरी निपटले जातात. ना कुणाला कुणी यावेसे वाटते, ना कुणाला कुठे जावेसे वाटते.मुलांच्या शाळा,दोघांच्याही कामाचे प्रेशर ही कारणे दोन्ही पक्षी मान्य होतात.कुणी आले काय, न आले काय, कुणालाच कशाचेच काही वाटत नाही.आल्याचा आनंद नाही. न आल्याचे दुःख नाही. देण्याघेण्याचे व्यवहार सुद्धा नाटकी,हिशेबी झाले आहेत. माणसे पाहून,आधीची नात्याची पार्श्वभूमी तपासून, स्टेट्स सांभाळून देण्याघेण्याच्या किंमती ठरवल्या जातात.

आता या नातेसंबंधाच्या दुराव्याला गेल्या दोन तीन दशकात नवे डायमेन्शन आले आहे. मुलामुलींचे परदेशात जाणे,तिकडेच स्थायिक होणे. या साता समुद्राच्या अंतरामुळे आधीचे नात्याचे बंध अधिकच सैल झाले आहेत. आता भेटीगाठी, त्यांच्या सुट्या,त्यांची सोय,त्यांची गरज,त्यांची इच्छा यावर अवलंबून.त्यांच्या इथे मागे असलेल्या नात्या गोत्याच्या हातात काहीच नाही!प्रत्यक्ष भेटीगाठी ऐवजी व्हॉट्सॲप मेसेजवर,घाई घाईच्या व्हिडिओ कॉलवर समाधान मानून आवंढे गिळत स्वस्थ बसायचे इकडच्या आजी आजोबांनी! ते अश्रू,ते आवंढे, गिळलेले हुंदके कुणालाच दिसत नाहीत.दिसले तरी डोन्ट बीकम सेन्सी म्हणून तुम्हालाच समजावले जाते!!

आधी सख्खे चुलत,जवळचा दूरचा असे काही नव्हते.मला आठवते.इथे हैदराबाद ला माझ्या आईच्या माहेरच्या नात्यातले एक कुटुंब गवसले. त्यांना,आम्हाला खूप आनंद झाला.जिव्हाळा वाढला. एकदा त्या काकांची ओळख करून देताना माझ्या तोंडून दूरचे नातेवाईक, distant relative असा शब्द प्रयोग निघून गेला! तेव्हा त्यांना इतका राग आला की…माझी मलाच लाज वाटली बोलण्याची.. जुने मित्र, मैत्रिणी, (भाडेकरू) शेजारी,चुलत चुलत,आईच्या माहेरचे,चुलते,काका मामा, मामी..मग त्यांच्या त्यांच्या नात्याचे..अशी साखळी लांबतच जायची नात्याची.

मी तर माझ्या काकूच्या माहेरी देखील राहिलेलो आहे. मावशीच्या सासरी गेलेलो आहे.काकानी प्रत्येक वेळी येता जाताना दिलेला बंदा रुपया मला आठवतो. माझ्या तिसऱ्या पिढीतल्या काकानी दिलेले कोऱ्या करकरीत शंभर रुपयांचे बक्षीस माझ्या स्मरणात कायमचे कोरले गेले आहे. दम्याचा त्रास असताना मी आल्यावर माझ्यासाठी आजीने केलेल्या शिऱ्याची चव जिभेवर रेंगाळते आहे.

आजकाल च्या तरुण मुलामुलीत अशा कोणत्या आठवणी आहेत अत्तरासारख्या जपून ठेवण्यालायक ? त्यांच्या गळ्यात कुणासाठी दाटून येणारे अश्रू, हुंदके आहेत, आमच्यासारखे..?

कुणाला हे अती भावनिक वाटेल.निरर्थक वाटेल.जग बदलले आहे, लहान मुलांचे आचार विचार संस्कार शिक्षण बदलल्याचे सांगितले जाते. मान्य आहे हे सगळे.पण ॲट व्हॉट कॉस्ट? हा माझा प्रश्न आहे ! जग बदलले म्हणून नीती, अनीती,माया ममता, लळा जीव्हाळा, प्रेम करुणा, आस्था यांच्या व्याख्याही बदलतात का ? हा नात्यातला कोरडेपणा,तुटलेला संवाद, विस्कटलेला संसार, विसरत चाललेली नातीगोती, हे आपल्याच मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने घातक नाही का? आता फक्त पृथ्वीचेच तापमान वाढत चालले असे नाही.आपला माणसाचा ताप, संताप, मनस्ताप वाढत चालला आहे.त्यामुळे मनोविकार वाढले.घटस्फोट वाढले, आत्महत्या वाढल्या.हिंसाचार देखील वाढला.जे घरात तेच दारात.जे राज्यात तेच आपल्या देशात.जे देशात तेच अख्ख्या जगात.कुणीही अपवाद राहिले नाही या नात्यातल्या दुष्काळाला! म्हणूनच इराण, इस्रायल, रशिया , अमेरिका, चीन, युक्रेन.. युरोप..कुणालाच कुणाची पर्वा राहिली नाही. कुटुंब उध्वस्त होताहेत. मुले, स्त्रियांवर अत्याचार होताहेत. घर, घर राहिले नाही. राष्ट्र, राष्ट्र राहिले नाही. सगळीकडे एक प्रकारची उदासीनता, अशांती,भीती, असुरक्षितता.. अशा वातावरणात कुणी कसे जगायचे,आनंदी समाधानी रहायचे ही खरेच गंभीर समस्या आहे.याचे मुख्य कारण आपण आपल्या श्रद्धा,आपले संस्कार, आपल्या निष्ठा यांनाच तिलांजली दिली.भौतिक सुखालाच सबकुछ मानण्याचा मूर्खपणा केला. आपण इंद्रधनुष्याऐवजी मृगजळाचा पाठलाग केला. आपण आपला स्वतःचा मार्ग निवडण्याऐवजी आपण गर्दीच्या मागे धावलो.आपण झुंडीच्या चळवळीत सामील झालो.आपल्याला वाटले, जग चाललेय म्हणजे योग्य दिशेनेच असणार. पण जगाऐवजी आपण आपल्या संत, ऋषी मुनींनी शेकडो वर्षापूर्वी सांगून ठेवलेले ऐकले, आचरले असते तर ही इतकी दुरावस्था आली नसती.

नवे स्वीकारायचे याचा अर्थ जुने अडगळीत टाकायचे असे नाही. जुने नवे एकत्र नांदू शकतात की गुण्या गोविंदाने! विवेक गहाण न ठेवता सजग राहिले,की हेही शक्य आहे. कोण म्हणते फक्त तबल्यावरच हात ठेवा अन् ढगा बाजूला टाका.गोड संगीत साथी साठी तबलढगा दोन्हीची एकत्र गरज असते.
सगळ्याच नात्यांना नाव नसते. नात्याला नावाचे लेबल असलेच पाहिजे असे ही नाही.मी तर एकापेक्षा एक नाव नसलेली जिव्हाळ्याची , निस्पृह प्रेम देणारी नाती अनुभवली आहेत.त्या नात्यांनी मला घडवले आहे. वाढवले आहे.केवळ वयाची वाढ नाही म्हणत मी. विचारांची वाढ..सुसंस्कृतीची वाढ.उत्तम चालीरीतीची वाढ.वैचारिक वाढ..ही नाव नसलेली नाती एकेक करून निखळली,दूर गेली तेव्हा मी व्यथित झालो.आतल्या आत रडलो.जे अश्रू कुणाला दिसले नाहीत ते मोलाचे होते. आयुष्याला श्रीमंत करणारे होते.म्हणून हे लिहिणे, म्हणून हे सांगणे.नाती जपा. कुणालाही दुखवू नका. आपल्याच जगात उतू नका मातू नका.एकट्याचा प्रवास दुःखद असतो.मिळून मिसळून केलेली वाटचाल माणसाला माणूस म्हणून जगायला अधिकच समृद्ध करते.आता यातली कोणती वाट शोधायची तुम्हीच ठरवा. मी नाही सांगणार.मी सांगून सांगून थकलो आहे !

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. नाती जोडणे कठिण, तोडणे सोपे. ह्या म्हणीची आठवण डॉ.प्रा.पांढरीपांडे सरांनी वाचनीय लेख द्वारे करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version