Home बातम्या शुभांगी पासेबंद : पन्नासावे पुस्तक प्रकाशित

शुभांगी पासेबंद : पन्नासावे पुस्तक प्रकाशित

0

आपल्या न्यूज स्टोरी टुडे च्या नियमित लेखिका-कवयित्री शुभांगी पासेबंद यांनी लिहीलेल्या व ‘जीवन सुंदर आहे’ या त्यांच्या 50व्या पुस्तकाचे प्रकाशन कवी सर्वश्री अशोक बागवे, सतीश सोळांकूरकर, महेश केळुसकर आणि अमोल नाले यांच्या हस्ते जागतिक मातृभाषा दिवसानिमित्त ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या काव्य लेखन कार्यशाळेत संपन्न झाले. शुभांगी पासेबंद यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.

कार्यशाळा वृत्तांत : ही कार्यशाळा जोशी बेडेकर कॉमर्स महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेस चाळीसहून अधिक कवी उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला अमोल नाले यांनी आपलं मनोगत व्यक्त केल.

डॉक्टर प्रदीप कर्णिक यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेच्या साडेसातशे वर्षाच्या साहित्यशास्त्राच्या दीर्घ परंपरेबद्दल उद्बोधक माहिती देऊन एक नवीन दृष्टिकोन मांडला.

याप्रसंगी तीन दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाले. कवी अशोक बागवे यांचा विषय होता “आशय आणि अभिव्यक्ती”. काय सांगायचं त्याला आशय म्हणतात आणि कसं सांगायचं त्याला अभिव्यक्ती म्हणतात.

कवितेची इतकी साधी सोपी सरळ व्याख्या त्यांनी सांगितली. कवीला शल्य असेल तर कौशल्य येते . कवितेचेबद्दल कधी अपमान झाला आणि सल आला तर ती कविता अधिकाधिक अस्सल बनत जाते. पोटात राहत नाही ते ओठात येते, त्यामुळे कलाकाराला सांगितल्याशिवाय राहवत नाही.अशी छान विचार त्यांनी व्यक्त केले.
.. फुले माझी अळुमाळू
वारा बघे चुरगळू…
या आपल्या लाडक्या कवितेबद्दल देखील त्यांनी खूप सुरेख भाष्य केलं. या विषयावर बोलताना त्यांनी त्यांची प्रसिद्ध कविता अभिव्यक्त केली.
कवि जेव्हा बोलतो प्राणातून, त्याला नसते हसायचं
कवी जेव्हा बोलतो प्राणातून, तेव्हा कवितेसारखं बसायचं !

दुसऱ्या सत्रात कवी सतीश सोळंंकुरकर यांनी ‘मुक्तछंदातील कविता’ या विषयावर भाष्य केले. मुक्तछंदातील कवितेमध्ये छंदोबद्ध कविता आणि मुक्त कविता या दोन्हीचा छान प्रकारे सरमिसळ करून एकसंध बनलेला एक धागा बनतो. त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला, नवोदित कवींनी जरुर घ्यावा. प्रवासाला जाताना जशी आपण सगळी चौकशी करतो तशीच कविता लिहिताना त्याबद्दलची योग्य माहिती मिळवावी, ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावं, असं यावेळी त्यांनी सांगितले.

तिसऱ्या सत्रात कवी, डॉक्टर महेश केळुसकर यांनी ‘छंदबद्ध कविते’बद्दल माहिती दिली. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मनाचे श्लोक, आई बाळाला झोपवायला अंगाई म्हणते ती लय किंवा बाळा जो जो रे, अथवा आपल्या आरत्या वगैरे ह्या छंदबद्ध प्रकारात कशा मोडतात ते गावून दाखवले. मंगलाष्टक ही शार्दुल विक्रीडित वृत्तात लिहिलेली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

या कार्यशाळेत प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार तीन सहभागीनी, आपापल्या कविता सादर केल्या.

या कार्य शाळेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आली. उपस्थितांना धन्यवाद देऊन कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरपूर कष्ट केले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version