Home लेख शौचालयाची गरज

शौचालयाची गरज

0

नागरिकांमध्ये शौचालयाचे महत्व, गरज, सवय रुजावी यासाठी २००१ सालापासून १९ नोव्हेंबर हा दिवस
जागतिक शौचालय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
या निमित्ताने स्वानुभवावर आधारित “शौचालयाची गरज” सांगताहेत निवृत्त पोलिस उपअधीक्षक सुनीता नाशिककर..
– संपादक.

कोल्हापूर जिल्ह्यातील चांदी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरी या माझ्या जन्मगावात आज मी 59 वर्षे मागे गेले आणि त्याकाळी घरी शौचालय नसल्यामुळे झालेली कुचंबणा लिहिल्याखेरीज राहवेना.

इतिहासात वाचले होते की, मोहोंजोदारो व हडप्पा सारखी सांडपाण्याच्या सुविधा असणारी शहरे प्राचीन भारतात होती तरी ती काळाच्या ओघात गडप होवुन दुर्दैवाने हगंदारीयुक्त गावे निर्माण झाली. त्याची जवळून साक्षीदार असणारी मी पार 60, 70 चे दशकात गेले.

घराचे जवळपासचे हगंदारीत सकाळी सकाळी शौचासाठी पाणी, तेही तांब्याभर घेवुन जाणे हा एक अत्यंत लाजिरवाणा, विशेषतः तरूण वयात समवयस्क अगर इतर चौकात पुरूष बसले असताना त्यांच्या नजरेसमोरून जाणे हा महिला आणि मुलींसाठी अत्यंत खजिल करणारा प्रकार असे. अर्थात आमच्या कुटुबांतच नव्हे तर आजूबाजूच्या खात्यापित्या कुटुंबातील स्त्री पुरूषांना देखील हगंदारीत जावे लागे.

पावसाळ्याच्या दिवसात हगंदारीतील परिस्थिती
तर अत्यंत किळसवाणी असे. मी सतत घरी ही सोय का नाही ? याचा विचार करत असे. हा विचार करताना लक्षात आले की, जागेचा अभाव, सांडपाण्याची व्यवस्था नसणे, सरकारी पातळी बरोबरच कुठल्याच पातळीवर त्याबाबत जागरूकता नसणे अशी काही कारणे असल्याने ग्रामीण भागात सर्वानाच या किळसवाण्या प्रकाराला नाईलाजास्तव सामोरे जावे लागे.

विशेषतः स्त्रियांना ते फार लाजीरवाणे होते. शौचाच्या वेळी पुरूष त्या बाजूला आले तर ते जाईपर्यन्त उठून उभे राहताना काय वाटत असेल ? ते स्पष्ट करण्याला शब्द अपुरे आहेत.

अलीकडे या विषयावर आधारित अक्षयकुमारचा एक चित्रपट येऊन गेला. त्या निमित्ताने या किळसवाण्या, अस्वच्छ परिस्थितीवर काही प्रमाणात उघड चर्चा झाली. अर्थात सरकारच्या ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत हागणदरीचे प्रमाण कमी झाले आहे. पण मी पाहिलेली गोष्ट म्हणजे जेथे जेथे सार्वजनिक शौचालय आहेत तिथे पाणी उपलब्ध असेलच असे नाही.

आजच्या जागतिक शौचालय दिवसाच्या निमित्ताने सरकारी पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडेच पण पुरेशी स्वच्छता राखण्यासाठी जी पाण्याची कमतरता आहे, त्याबाबत कार्यवाही व्हावी ही माफक अपेक्षा व्यक्त करते.

सुनिता नाशिककर

– लेखन : सुनिता नाशिककर. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version