Home लेख दानशूर कृष्णाजी बाबुराव खुटाळे.

दानशूर कृष्णाजी बाबुराव खुटाळे.

0

मिळालेल्या पदांच्या जोरावर जास्तीत जास्त संपत्ती कशी गोळा करता येईल, या आजच्या जमान्यात स्वखर्चाने सातारा शहरात रस्ते, पुल बांधणारे, मंडई साठी आपली जमीन देणारे सातारा नगरपालिकेचे
उपनगराध्यक्ष पद भूषविलेले दानशूर कृष्णाजी बाबुराव खुटाळे हे खरोखरच गौरवास्पद व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कन्येने रेखाटलेले त्यांचे हे जीवन चरित्र नक्कीच बोधप्रद आहे. त्यांना विनम्र अभिवादन.
– संपादक.

भाऊंना जाऊन आज ७८ वर्षे झालीत. पण कितीही दिवस झाले तरी बकुळ फुलांचा सुगंध जसा दरवळतच राहतो.  तशा माझे वडील कृष्णाजी बाबुराव खुटाळे यांच्या आठवणी मी खुप मोलाच्या समजते.

अवघे मराठी चौथी शिक्षण असलेल्या, मोडी लिपीत लिहिणाऱ्या माझ्या वडिलांनी केवळ आम्हा बहिण भावांवरच नव्हे तर त्यांचे लहान भाऊ, मोठ्या बहिणीची मुलं, माझे आत्ते भाऊ, बहिण सर्वांवर चांगले संस्कार केले. ते समाजकार्य तळमळीने करायचे. वेळ प्रसंगी गरजूंना आर्थिक मदतही करत.

आम्हा सर्वाचें, म्हणजे सर्व खुटाळे, तंटक सद्स्यांचेच नव्हे तर सर्व सातारा शहरात त्यांचे आदराचे स्थान होते.

भाऊंचे सर्व आप्त, लहान भावंड म्हणजे आमचे काका, आत्या, भाचे, पुतणे भाऊंना भाऊ नावानं पुकारत. माझी आत्या भाऊंची मोठी बहिण. तिचे मिस्टर स्वातंत्र्य सैनिक असल्याने ते कुटूंब आमच्या बरोबर राहात असे. भाऊ वयाच्या १४ वर्षी त्यांच्या वडिलांसोबत भांड्यांचा यशस्वी व्यापार करीत.

भाऊंना सातारा शहरात फार मोठ्ठा मान होता. आणि विशेष म्हणजे अजुनही आहे. ते सतत ९ वर्षे सातारा नगरपालिकेचे नगरसेवक होते. तसेच ते काही काळ उपनगराध्यक्ष ही होते. नगरपालिकेत ईतक्या वर्षानंतरही भाऊंचा मोठ्ठा फोटो लावलेला आहे.

अशा महान व्यक्तीची आम्ही सर्व भावंडे लेकरे आहोत याचा आम्हा सर्वांना खुप खुप अभिमान आहे.
“मरावे परि कीर्तिरुपे उरावे” तसे आजही त्यांच्या कर्तुत्वाचे पुरावे सातारा शहरात दिसतात.
भाऊंनी त्यांचे पिताश्री बाबुराव बापुजी खुटाळे ह्यांच्या स्मरणार्थ सातारा शहरात “खुटाळे ब्रिज” बांधला.

मुन्सिपालटीने खुटाळेंच्या जागेत बांधलेल्या भाजी मंडईला कृष्णाजी बाबुराव खुटाळे असे नाव दिले आहे. भाऊंनी शहरासाठी स्वखर्चाने जुन्या मोटर स्टँडवर रस्ता व पुलाचे बांधकाम केले.

भाऊ तुमची आठवण होते. तुमच्या ठायी असलेल्या दातृत्वाचे, कर्तव्याचे, शिस्तीचे, प्रेमाचे मिळालेले बाळकडू आम्हाला अजूनही पुरते आहे. आजही आठवतो तुमचा पाठीवर फिरणारा हात आणि भक्कम आधार.

ति.भाऊंच्या अमर कर्तुत्वाला मानाचा मुजरा.

सुरेखा तिवाटणे

– लेखन : सुरेखा तिवाटणे. पुणे
– संपादक : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version