‘समकालीन साहित्य : नवे संदर्भ’ या विषयावर मुंबई येथील सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या के. जे. सोमैया भाषा व साहित्य विद्याशाखेच्यावतीने दोन दिवसीय राष्ट्रीय बहुभाषिक चर्चासत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटनपर सत्रात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रख्यात लेखिका डॉ. सूर्यबाला यांनी साहित्यनिर्मिती, समीक्षा आणि अनुवादाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विचार मांडले. “नवोदित लेखकांना मार्गदर्शन हवे असते; मात्र स्वतःच्या कलाकृतीवरील चिकित्सक टीका स्वीकारण्याची मानसिक तयारीही त्यांनी ठेवली पाहिजे. केवळ गुणगानाची अपेक्षा न ठेवता टीकेतून स्वतःला समृद्ध करण्याची वृत्ती आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या. “अनुवाद हा दोन भाषा, समाज आणि संस्कृती यांना जोडणारा प्रभावी दुवा आहे. साहित्य निर्मितीत वास्तवता आणि विवेक यांची सांगड असली पाहिजे. आजच्या जागतिक संघर्षांच्या पार्श्वभूमीवर मानवतेचा संहार रोखण्यासाठी लेखकांनी आपल्या कलाकृतींतून विवेक, संवेदना आणि शांततेचे विचार पेरण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

सोमैया विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अजय कपूर आणि डॉ सूर्यबाला यांच्या हस्ते यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थांनी केलेल्या “तेजस्विनी” या अनुवाद प्रकल्पातून साकारलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
विशेष परिसंवाद आणि प्रकाशन हा या चर्चासत्राचा महत्वाचा भाग होता. यामध्ये प्रा. प्रतिभा सराफ लिखित “अनाकलनीय“ या कथासंग्रहाचा हिंदी अनुवाद “दस्तख़त की मुहर“ या पुस्तकावर लेखिक प्रतिभा सराफ आणि अनुवादक डॉ. गोरख थोरात यांनी चिकित्सक विवेचन केले. या संग्रहाला प्रस्तावना देणाऱ्या डाॅ. सूर्यबाला यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या निमित्ताने पुस्तकाच्या शीर्षकापासून अनुवादापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकत त्यांनी काही कथांचे विश्लेषण केले.
डॉ. बाळासाहेब लबडे लिखित ‘चिंबोरे युद्ध’ आणि ‘मुंबई… बंबई… बॉम्बे’, देवा झिंजाड यांचे मूळ मराठीतून हिंदीत अनुवादित ‘एक रोटी तीन चूल्हे’, डॉ. हेमेंद्र चंडालिया लिखित आणि मराठीत अनुवादित ‘व्हिलचेयरवर लोकशाही’, “माधव कौशिक यांची निवडक कविता“ आणि बाळासाहेब लबडे यांच्या “चिंबोरे युद्ध“ या कादंबरीच्या हिंदी अनुवादामुळे तिरकस शैलीतील, वेगळ्या धाटणीची कादंबरी वाचकांपर्यंत पोहोचणार आहे, असा विश्वास व्यक्त करीत लेखिका डॉ. कुसुमलता सिंह यांनी कादंबरीतील प्रतीकात्मता उलगडून दाखवली.
जेष्ठ साहित्यिक प्रा डॉ भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य हिंदीत अनुवादित करणाऱ्या डॉ गोरख थोरात यांनी अनुवादाच्या माध्यमातून समाजवास्तव आणि साहित्य व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेवर विचार व्यक्त केले.
चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी ‘आदिवासी चित्रकला आणि साहित्य’, ‘पत्रकारिता आणि साहित्य’, ‘कवितानिर्मिती ‘या विषयांवर संवादाचे आयोजन करण्यात आले. तसेच पुढील दोन सत्रांमध्ये संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थांनी’ कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषा, अण्णाभाऊ साठे यांची शाहिरी आणि समकालीनता, मराठी ग्रंथसंस्कृती, हिंदी साहित्यातील विकास आणि पर्यावरणाचे चित्रण, लोक साहित्य आणि भाषा, कुणबी समाजाची लग्नगीते, जागतिकीकरण आणि भाषा इत्यादी संशोधनपर निबंधांचे सादरीकरण केले.
प्रा. प्रतिभा सराफ सत्राच्या अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, जरी संशोधनासाठी प्रचंड मेहनत घेतली तरी सादरीकरण करताना केवळ त्याचे वाचन अपेक्षित नाही. कोणत्या दिग्गजानी याच्यावर काय म्हटले आहे याचबरोबर आपल्याला काय वाटते हे व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या वक्तव्याला अनुरूप उदाहरणे देणेही तितकेच महत्त्वाचे आहे !
समारोपप्रसंगी सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या भाषा व साहित्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वीणा सानेकर यांनी सर्व सहभागी साहित्यिक, संशोधक, अनुवादक, विद्यार्थी आणि उपस्थितांचे आभार मानले. समकालीन भारतीय साहित्य, अनुवाद आणि बहुभाषिक संवाद यांना नवी दिशा देणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800