Home कला सुगंधी सकाळ

सुगंधी सकाळ

2

चैत्र म्हणजे साऱ्या निसर्गाचा मैत्र.
तर वैशाख म्हणजेअगदी वैराण वख वख ! वैशाखवणवा म्हणतात ते काही खोटं नाही. आग ओकणारा सूर्य आणि जीवाची होणारी काहिली…

सहाजिकच या उन्हाळ्यातली पहाट, हवेतील मोहणारा गार…वारा अतिशय आल्हाददायक वाटतो. नाशिकचे सुखवणारे हवामान… रेडिओला लागलेले सुमधुर गीत..’ जाई जुईचा छंद मातीला…. हिरव्या पानांचा छंद गीताला.. ‘मनाची प्रसन्नता अधिकच वाढवत होता. पक्षांचा रव कानी साद घालतच होता. या विलक्षण जादुई वातावरणात लक्ष जात होतं सोनचाफ्याच्या झाडाकडे.

अनेक सोनकळ्यांनी बहरलेलं ते झाड त्या कळ्यांचा नाजूक स्पर्श आणि त्याचं बहुमोल सौंदर्य…. नि त्या फुलांनी खिडकीचा सुगंधी झालेला कट्टा. तेवढ्यात येणारा शेजारणीचा आवाज……
अगं पाहिलंस का ? आज पारिजातकाचा केवढा सडा पडलाय ! थांब ग जरा…. थांब…. असे म्हणत मी दोन सोनचाफ्याची फुले तिच्या हातावर ठेवते आणि तिच्या प्राजक्ताने माझी ओंजळ सुगंधी होऊन जाते आणि सकाळ सुगंधाने प्रसन्न हसते…

तेवढ्यात फोन वाजतो… कोणाचा बरे फोन सकाळी सकाळी ? हा विचार करत असतानाच वहिनी जरा मागच्या बाजूला या ….अशी प्रेमळ साद येते. फोन ठेवून मागे जातानाच एक धुंद सुगंधित अनंताच्या चांदणफुलांची परडी हातात अलगद येऊन पडते…आणि पुन्हा एकदा सकाळ सुगंधी होऊन जाते… परसातली फुले देवासाठी काढताना आपल्या गुलाबी पांढऱ्या पण नंतर गडद लालसर होणारे मधुमालतीचे लांब दांड्याच्या झुपके समोरच्या बाजूला राहणाऱ्या काकूंना साद घालतात …काकू हळूच थोडी फुले काढून त्याची छोटीशी वेणी तयार करून मंद सुगंध दरवळत अन्नपुर्णा देवीला सकाळी अर्पण करताना सकाळ सुगंधी होते…

परसातली फुले देवासाठी काढताना अचानक पणे मन भरून घ्यावा असा परिचित परंतु बागेत नव्याने आलेला हा सुगंध कोणता ? याचा शोध घेताना चार-पाच वर्षांपूर्वी लावलेली बकुळ नाजूक इवल्याशा फुलांनी बहरू लागलेली आहे हे पाहून मन फुलून येते . दोन-तीन झाडाखाली वेचलेली फुले शेजारच्या सखीला मुठ बंद करून सुवास घे… असे सांगताना तिचा आश्चर्यचकित झालेला चेहरा आणि तिच्या शाळेतल्या जागलेल्या आठवणी याचा एक अप्रतिम अनुभव तिला प्रसन्न करतो. तिच्या हाती पहिला वहिला बहर देताना माझी सकाळ पुन्हा एकदा सुगंधित होऊन दिवसभर दरवळत राहते माझ्या सोबत.

वासंती पाठक

– लेखन : वासंती पाठक. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. 🌹अप्रतिम वर्णन, क्षणभर मन हरवून गेलं. वाचन करताना. प्रत्येक फुलांचा, प्रसंगाचा योग्य मेळ जुळून येतो. 🌹
    🌹धन्यवाद वासंती पाठक मॅडम 🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version