Home कला हलकं फुलकं

हलकं फुलकं

0

“नियम व अटी लागू !”

आम्ही सर्व जण मिळून नुकतेच “नियम व अटी लागू” हे नाटक पाहण्यासाठी गेलो होतो. नाटकाच्या नावावरून थोडी उत्सुकता होतीच.

नाटकाला सुरुवात होऊन कलाकारांची एन्ट्री झाली. मनातले कुतूहल वाढत होते. नाटक पाहता पाहता थोड्याच वेळात असे वाटायला लागलं की, अरे हे तर आपणच आहोत ! काही फरक नाही. त्याला म्हणजे हिरोला मिळालेले यश, अवॉर्ड याच आनंदात, त्याच्याच विश्वात तो मग्न आहे.यात त्याच्या यशाबद्दल तिला म्हणजे हिरॉईन ला वाटलेला आनंद या गोष्टीला कोठेच जागा नाही. तो स्वतः मध्येच धुंद आहे.

हा, पण मित्र मैत्रिणींनी केलेले कौतुक मात्र नायकाला छान सुखावून जात होतं. बिचारी बायको, नाराज झाली होती. यातूनच लागतो मुख्य विषयाला हात. तो म्हणजे, ‘तुम्हाला माझं काही वाटतच नाही’ तिची तक्रार म्हणजे छोटीच होती की, त्याने तिलाही त्याच्या आनंदात सहभागी करून घ्यावं, तिच्याशीही थोडं बोलावं, वेळ द्यावा. याचं म्हणणं मी बाहेर काम करून थकून घरी येतो आणि आलो की तुझी काय ही रोजची किरकिर !

मग एकमेकांच्या तक्रारीची लिस्ट सुरू होते. वाद वाढत जातो. तिसरा व्यक्ती हे वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांना खरी आपल्या प्रेमाची जाणीव होते ती एकमेकांपासून दूर राहिल्यावर. त्यात मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे स्वतःच्या आनंदी न राहण्यासाठी दुसऱ्याला दोष देऊ नये. स्वतःचा आनंद स्वतः शोधायचा तो म्हणजे स्वतःच्या आवडी जपून त्यात आनंद मिळवता येतो. मग दुसऱ्याला दोष देण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो. त्यात कविता करणे, चित्रं रेखाटने या आवडी ती या सर्व राड्यात पूर्णपणे विसरूनच गेलो होती. त्या तिसऱ्या व्यक्ती ने याची जाणीव करून दिली. पण याचा अर्थ असा नाही की ती यात रमली म्हणून त्याने तिच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करावे. असो.

याचा शेवट म्हणजे दोघांना आपापल्या चुका कळून येतात व दोघेही एकमेकांचा विचार करण्याचे वचन देतात व नाटकाचा शेवट गोड होतो.

नाटक संपल्यावर माझ्या नवऱ्यानेही नाटकातील नायकासारखेच वागायचे मला कबूल केले ! काहीही असो आता माझ्याशी बोलण्यासाठी थोडा वेळ नक्की द्यायचा, हे त्याने ठरविले आणि आम्ही बाहेर पडलो. मग काय मीही खुश. घरी येऊन पोहोचलो रात्रीचे १२ वाजले होते. मीही आनंदात होते.

पण हे काय ? घरी आल्या आल्या माझ्या आनंदावर विरजण पडले. कारण माझ्या नवऱ्याने घरात पाऊल ठेवताच टिव्हीवर न्यूज चॅनल लावून तो इस्राईल ला जाऊन पोहोचला होता. मी त्याच्या समोरून निघून गेली आहे, हेही त्याच्या लक्षात आले नाही.!
शेवटी काय नाटक पाहण्याचा परिणाम फक्त तिथं पर्यंतच होता. तो घरी येईपर्यंत सुध्दा राहिला नाही.

एवढ्यावरच भागले नाही. दुसऱ्या दिवशी शुल्लक कारणावरून माझ्या नवऱ्याने माझ्याशी भांडण केले. शेवटी काय आपले चालू आयुष्य कोणीही बदलू शकत नाही !😂

— लेखन : सौ. क्रांती उपरे. अंबाजोगाई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version