ती रम्य सांजवेळ
तो अबोल नदीचा किनारा
त्या तिथे उभी मी एकटी
संथ, नितळ, शांत – – – –
वाहणारे पाणी न्याहाळत
भिरभिरणारे ते लहान भोवरे
वरून शांत आतुन खदखदणारे
अगदी माझ्या सारखे – – – –
नदीकडे पाहाताच, उमगले
तिचे सतत वाहाणे,
पुढे पुढे जाणे – – – – –
वहाताना गाळही वाहून नेणे
ती थांबली तर?
तळे होईल शेवाळ्याने भरलेले
वहात राहिली तर,
अजूनही शुद्ध,
अजूनही निर्मळ,
नितळ होईल.
मलाही नदी व्हायला हवे
मलाही वहात रहायला हवे
मलाही वहात रहायला हवे——.
रचना-फरझाना इकबाल
( हुंदका )
