Home साहित्य 🦄🐴ट्रोजन हाँर्स🐴🦄

🦄🐴ट्रोजन हाँर्स🐴🦄

1

‘ट्रोजन हाँर्स‘ हे श्री अमित दुबे यांच्या गुन्हेगार शोधाच्या तीन दीर्घ कथांचे मराठीतील पुस्तक गेल्यावर्षी प्रकाशित झाले. विदेशात प्रकाशित या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ब्रिजमोहन हेडा यांनी केला आहे.

एक तरुण साँफ्टवेअर इंजिनिअर, हौस म्हणून गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना मदत करायला लागतो आणि एक महत्वाचा स्तोत्र बनून जातो. यंत्रणेमध्ये अडकून जातो. या पुस्तकात त्याचीच कथा आहे.
कसे तो वैयक्तिक आयुष्यातून काहीबाही घेत, कुशाग्र बुध्दी आणि विचाराच्या जोरावर गुन्ह्यांचा तपास करतो. या तिन्ही घटना सत्य घटनांवर आधारित असून, आगामी काळात गुन्ह्यांचा तपास कसा होईल याची झलक देणाऱ्या या कथा आहेत.

लेखक अमित दुबे हे प्रसिद्ध अपराध अन्वेषक आहेत. त्यांनी भारतातील विविध पोलीस विभागांना आणि अपराध अन्वेषण संस्थांना अपराधाचा शोध घेण्याकरिता मदत केली आहे. ते आयआयटी. कानपूरचे विद्यार्थी असून संगणक आज्ञावलीचे अभियंता आहेत. त्यांनी सँमसंग, एसटी-एरिक्सन, क्वाँल काँम, आणि टेक महेंद्र या संस्थामध्ये काम केलेले आहे. ते आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सायबर अपराध आणि नैतिक हँकिंग या विषयावर नियमितपणे बोलणाऱ्या वक्त्यांमधील एक आहेत.

अमित दुबे

सीएनएन आणि आयबीएन यांनी त्यांचा उल्लेख
राष्ट्रीय सुरक्षा तज्ञ म्हणून केला असून त्यांनी भारतात सोडविलेल्या काही प्रकरणावर सायबर लढ्यांचे लघु चित्रपटही तयार केले आहेत त्यांच्या पत्नी कुमुद या आयआयटी कानपूरच्या त्यांच्या सहाध्यायी असून त्यांना दोन वर्षाची अदविका ही मुलगी आहे. दोन टीव्ही मालिकेत अमित यांनी काम केले असून कविता देखील करतात. यांचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण म्हणजे या तिन्ही कथेत त्यांनी याचा छान उपयोग करून घेतला आहे.

■■■■■■■■■■■■
🏋🏻‍♀️~हँलो अमित,
उगाच वेळ घालवू नकोस. तु आमची सिस्टीम हँक करू शकणार नाहीस. आम्ही मात्र तुझा देश हँक करू.
– अमीन.
◆अमित : लेखक
◆अमीन (आतंकवादी)
— “कोणत्याही हँकरची सर्वात मोठी भीती असते ओळखले जाणे ! मी माझी ओळख, कोणत्याही गोष्टींचा शोध घेतांना, कोहिनूर हिऱ्याप्रमाणे मी माझी ओळख सुरक्षित ठेवायचा कायम प्रयत्न करतो. मग त्यांनी मला ओळखलेच कसे ? हे जवळजवळ अशक्य होते.”.
~~लेखक अमित..
■■■■■■■■■■■■

वास्तवापेक्षा अधिक चित्तथरारक काहीही नसते अशी त्यांची धारणा आहे. माहिती तंत्रज्ञान तज्ञ म्हणून पोलिसांना गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यासाठी ते मदत करतात. या पुस्तकातील तीन कथात अपहरण, आंतकवादी हल्ले, अपराधी गुन्हे अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांचा समावेश असून अपराध्यांना पकडण्याकरिता अग्रणीचे तंत्रज्ञान, सकारात्मक कल्पना शैली यांचा कसा उपयोग करता येऊ शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या प्रकरणात गुंतत असतांना निर्माण होणाऱ्या वैयक्तिक संघर्षाचे वर्णन बिनधास्तपणे केले आहे.

ट्रोजन म्हणजे नेमके काय ? असं विचारलं तर पहिल्या कथेत त्याची कल्पना लेखकाने विशद केली आहे. ट्राँय हे ग्रीसचे एक बेट राज्य होते. आणि त्याच्या चोहोबाजूंनी मजबूत परकोट बांधलेला होता. ट्रोजन युध्दाच्या दरम्यान हल्ला करणाऱ्यांना तो परकोट तोडणे शक्य झाले नाही. यामुळे त्यांनी शहरात प्रवेश करण्याकरिता एका युक्तीची योजना केली १० वर्षे वेढा घालूनही त्यांना हे शहर जिंकता आले नव्हते ते त्यांनी या युक्तीने जिंकले.

दहा वर्ष व्यर्थ वेढा दिल्यानंतर हल्लेखोरांनी एक प्रचंड लाकडी घोडा तयार केला आणि त्यात आपले सैनिक लपवले आणि बाकीच्या सैनिकांनी आपण माघार घेत आहोत असे दाखवून आपल्या नौका माघारी वळवून परतायला सुरुवात केली. खुश झालेल्या ट्रोजनच्या लोकांनी तो घोडा युध्दातीलविजयाची ढाल म्हणून आत ओढून नेला.

त्या रात्री त्या घोड्यात लपलेले सैनिक बाहेर पडले आणि त्यांनी रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन परतलेल्या आपल्या सैनिकांकरिता परकोटाचे दार उघडले. ट्राँयचा विनाश झाला आणि त्या युध्दाचा निर्णायक शेवट झाला. तर आपल्या कामात आपण जे प्रलोभन पाठवतो त्याला ट्रोजन हाँर्स म्हणतात.

या युक्तीचा फायदा घेऊन कोणाच्या संगणकात वा मोबाईल मध्ये व्हायरसची आज्ञावली पाठविली, की तो व्हायरस त्या संगणकात दडलेली माहिती आपल्याकडे पाठवू लागतो या ट्रोजन विषाणूंचा उपयोग करता येऊ शकतो या कामात समाज माध्यमांचा आधारही घेण्यात येतो या तांत्रिक माहितीचे विश्लेषण या कथांमधून सर्वांना समजेल अशाप्रकारे लेखकाने केले आहे.

अपराध अन्वेषण ही बाब अशी आहे की जिच्यावर वास्तव जीवनावरच्या आधारित कथा लहान मोठ्या सर्व वयाच्या आणि सर्व स्तराच्या लोकांकरिता नेहेमीच उत्साहवर्धक असतात. म्हणून मी कथानक न सांगता हे पुस्तक मुळातच वाचण्याचे सांगत आहे. एवढं मात्र खरं की एकदा हे पुस्तक हातात घेतलं की संपवल्याशिवाय खाली ठेवणे अगदीच अशक्य !
🐴🐴🐴🐴🐴🐴🐴🐴🐴

सुधाकर तोरणे

– लेखन : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version