आज सांगू इच्छिते तुम्हाला
गोष्ट माझ्या सखीची;
वर्षानुवर्षे उमलत गेलेल्या
आमच्यातील सुंदर मैत्रीची !
दुसरी-तिसरी कुणी नसून,
आहे ती सखी खिडकी;
अतरंगी, मजेशीर आणि जराशी खोडकी.
अधूनमधून तिच्याकडे जाऊन बसते
शांत आणि…अंतर्मुख होत जाते स्वतःशीच निवांत.
खिडकी होते माझा आरसा स्वतःशीच बोलायला;
मनातील उचंबळून आलेल्या भरतीला उधाण व्हायला.
सुख असो, दुःख असो, असो अथवा आनंद;
ही माझी जागा हक्काची भोगण्या मधु-मकरंद
ऋतूचक्रांचे भिन्न प्रदर्शन सुखावह भासते खिडकीतून;
तोच आनंद अनुभवण्यास वेळ घालवते येथे अधूनमधून.
शब्दांनी ती अबोल मात्र दृश्यांनी ती बोलकी;
डगमगत्या मनाची एकटी आधार ती खिडकी !
हितगुज करता करता तिच्यासवे
शिकले, सावरले, प्रगाढल्या कित्येक जाणिवा;
स्वतःशीच अंतर्मुख होता होता सरल्या अनेक उणीवा.
खिडकीमधून बाह्य खिडक्या दिसतात सुंदर फारच;
खिडक्यांमार्फत व्यक्तिमनांचे विश्लेषण करणे काही औरच!
जगात कुठेही जाईल तिथे म्हणूनच शोधत असते तिलाच;
कधी अनोखी नाळ जुळली तिच्याशी, कळलंच नाही मलाच !
🪟✍🏼 डाॅ. कल्याणी मा. मसादे. रशिया

खूप सुंदर कवी कल्पना
खिडकीला मानवी रूप दिलेले भावले
🌹खूप छान कविता. सुंदर शब्द रचना 🌹
एक खिडकी खूप काही सांगून गेली.
Nice to see more
🌹🌹
अशोक बी साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ