Home यशकथा जन्मदिन: भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम

जन्मदिन: भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम

0

भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाला सलाम

डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वर येथे झाला. त्यांचे वडील रामेश्वरला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुषकोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करत. डॉ कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम येथे पूर्ण केले. लहानपणीच वडिलांचे छत्र गमावल्याने ते गावात वर्तमानपत्रे विकून तसेच अन्य छोटीमोठी कामे करून पैसे कमवत व घरी मदत करत. शाळेतच त्यांना गणिताची विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथून बीएस्सी झाल्यावर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. या प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेऊन त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ” नासा ” या जगप्रसिद्ध संस्थेत एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या कलाम यांनी भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने संशोधन क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवला.

भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे ते जनक ठरले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्याच कारकिर्दीत १९९८मध्ये पोखरण येथे यशस्वी अणू चाचणी झाली. भारत सरकारने पद्मविभुषण व पुढे भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.२००२ ते २००७ या कालावधीत त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून आपल्या चमकदार कामगिरीची मोहोर उमटविली . साधी राहणी , ऋजु स्वभाव, भविष्याचा वेध घेण्यासाठी देशाला प्रेरित करण्याच्या सततच्या प्रयत्नांमुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे राष्ट्रपती ठरले. राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यावर डॉ. कलाम यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम केले. मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी भरपूर कष्ट करा, असे ते सांगत. ते उत्तम वीणावादक होते. डॉ. कलाम यांना कर्नाटक संगीतात रुची होती. ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘इंडिया २०२०’ आणि ‘इग्निटेड माइंड्‌स’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.या पुस्तकांचे अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यावर डॉ. कलाम विविध संस्थांमध्ये व्याख्याने देत असत.


डॉ.अब्दुल कलाम यांचे २७ जुलै २०१५ रोजी निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर हा वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ.अब्दुल कलाम यांना आदरांजली.

– संजीव वेलणकर ,पुणे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version