Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यअसं झालं पुणे स्नेह मिलन

असं झालं पुणे स्नेह मिलन

बदलत्या जीवन शैलीमुळे आजकाल आपण एकमेकांच्या घरी जाणं तर दूरच राहिलं, सहजपणे, निर्हेतुकपणे बोलत सुध्दा नाही. सहज सुंदर संवाद दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळे आव्हानात्मक होत चाललेल्या आपल्या जीवनात एकटेपणाची भावना वाढीस लागली आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन आपण काही केले पाहिजे, या विचाराने आपण आपल्या वेबपोर्टलचं स्नेह मिलन गावोगावी आयोजित करण्याचं ठरवलं. माझ्या
मताप्रमाणे ते एखाद्या हॉटेलमध्ये किंवा हॉलमध्ये घ्यावं असं होतं. पण अलकानं असं सुचवले की, बाहेर कुठे घेण्यापेक्षा ते घरीच घेत जाऊ या.

खरं म्हणजे सुरुवातीला मी साशंकच होतो. म्हणून प्रायोगिक तत्त्वावर संगमनेर येथील माझा पुतण्या, संदीप याच्या घरी पहिलं स्नेह मिलन घेतलं. तेथील ५ पैकी ३ लेखक, कवी आले. समक्ष भेट झाली. छान चर्चा, ओळख झाली.

पुढे दुसरे स्नेहमिलन, नाशिक येथे झालं. तेथे १२ पैकी ८ जण आले. त्याचा छानसा वृत्तांत कवयत्री, प्रा सुमती पाटील मॅडम यांनी लिहिलाच आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती येथे करीत नाही.

नाशिक येथील वृत्तांत वाचून, आपले जेष्ठ लेखक प्रा डॉ किरण ठाकूर सर यांनी पुणे येथील स्नेह मिलन त्यांच्या घरीच घेण्याचं अतिशय अगत्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान, आपल्या पोर्टलला २७ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत होतं. सरांची ७५ वी याच महिन्यात झाली. त्यामुळे ते लक्षात घेऊन स्नेह मिलन, वेबपोर्टलची वर्षपूर्ती आणि सरांची ७५ वी असा संयुक्त कार्यक्रम सरांच्या घरी, शनिवारी, पुणे येथे झाला.“पुणे हे विद्येचं माहेर घर आहे” असं का म्हटल्या जातं, त्याची प्रचिती या निमित्ताने आली. आपल्या पोर्टलशी संबधित ४२ व्यक्ती पुणे येथील असल्याचं दिसून आलं. त्या सर्वांना आपण या स्नेह मिलनासाठी आमंत्रित केलं होतं. त्यापैकी २८ जण उपस्थित राहू शकले. एकमेकांची समक्ष ओळख, परिचय, अनुभव कथन, कविता सादरीकरण आणि शेवटी अवघ्या ६८ वर्षांच्या असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ विद्या डागा मॅडम यांचं भरतनाट्यम यामुळे हे स्नेह मिलन अविस्मरणीय ठरलं.

या स्नेह मिलनाविषयीच्या प्राप्त झालेल्या भावना पुढे देत आहेच. पण विशेष उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे सरांचे पुत्र प्रा डॉ नचिकेत सर, जे स्वतः आयआयटीतुन इंजिनिअर, पुढे पीएचडी झाले आहेत, तसेच त्यांच्या सुनबाई मानसी मॅडम, ज्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेत प्राध्यापक आहेत.
या दोघांनीही सर्व स्वयंपाक घर व व्यवस्था पाहिली. सर्वांना अगत्यानं वाढणं, त्यांच्या जोडीला संवेदनशील युवा पत्रकार प्रतीक्षा जाधव हिची मदत खूप काही शिकवून गेली.

शलाका मॅडमच्या हातचे पोहे आणि अलकाच्या हातची गूळ पापडी नक्कीच दीर्घकाळ सर्वांच्या जिभेवर रेंगाळत राहील.

अशा प्रकारे बाहेरच्या व्यक्ती, खाद्यपदार्थ यांची कुठल्याही प्रकारची मदत न घेता पार पडलेलं हे स्नेहमिलन निर्भेळ आनंद देऊन गेलं. असो…

पुढे स्नेह मिलनाविषयी व्यक्त झालेल्या भावना देत आहे. आपला सर्वांचा लोभ असाच वृद्धिंगत व्हावा, अशी विनंती आहे.
– टीम एनएसटी

१) अनोखं स्नेह मिलन
न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलचं पुणे येथील स्नेह मिलन, पहिला वर्धापनदिन व ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. किरण ठाकूर यांचा ७५ वा वाढदिवस अशा त्रिवेणी संगमाचं आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या वेब पोर्टलमुळे अनेक लेखक, लेखिका तसेच कवी, कवियत्री यांना त्यांचे काम अनेक वाचकांसमोर ठेवण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. या वेब पोर्टलसाठी देश विदेशातून लोक लिहितात. नवीनच सुरु झालेल्या या वेब पोर्टलने जवळपास ७२ देशात पोहचून उंच झेप घेतली आहे. यावेळी ज्येष्ठ लेखक किरण ठाकुर यांचा वाढदिवस उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ, सौ अलका भुजबळ यांचे कौतुक केले तसेच उपस्थित लेखक व कवी, कवयत्रींचं अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता कविता सादरीकरणाने झाली.

यावेळी प्रा डॉ उज्ज्वला बर्वे, प्रा डॉ सतीश शिरसाठ, स्त्रीरोगतज्ञ डॉ विद्या डागा, सामाजिक कार्यकर्त्या डॉ राणी खेडीकर, उद्योजक प्राची सोरटे, जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर कारखानीस, अनिल टाकळकर, सुनील कडूसकर, कवयत्री पद्मजा नेसरीकर, मंजुषा किवडे, मेघा जोगदेव, सुनंदा पानसे, देवयानी ठाकूर,
लेखिका राधिका भांडारकर, दीपाली दातार, क्रीडापटू नीता देशपांडे, प्रा डॉ नचिकेत ठाकूर, प्रा मानसी ठाकूर, प्रा माटे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.– प्रतीक्षा जाधव

२) प्रिय अलका,
वेब पोर्टल चा प्रथम वर्धापनदिन खूपच उत्तम साजरा झाला. तुला आणि देवेंद्र सरांना प्रत्यक्ष भेटायचा छान योग आला. तुम्ही दोघांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केलेत त्याबद्दल तुम्हा उभयतांचे खूप कौतुक वाटले. तुमच्या या अभिनव उपक्रमाला मनापासून सलाम आणि भरपूर शुभेच्छा.
आम्हाला सहभागी करून घेतलेत त्या बद्दल
धन्यवाद.🙏🏻🙏🏻

– मेधा जोगदेव. पुणे

३) देवेंद्र भुजबळ यांची माझी ओळख अगदी अलीकडे, एकाद  वर्षापूर्वी झाली. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व प्रसिद्धी  विभागाचे संचालक या नात्याने ते कार्यक्षम अधिकारी आहेत असे फक्त ऐकून माहिती होते.  पण ओळख नव्हती झाली.

‘मोल्सवर्थ यांचा मराठी-इंग्लिश शब्दकोश” या विषयी चार-पाच वर्षे अभ्यास करून एक पुस्तिका मी लिहिली त्याची बातमी त्यांच्या वाचनात आली. याविषयी माझ्या पोर्टल मध्ये एखादा लेख द्या यासाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला.  तेव्हापासूनची ही ओळख.
शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी स्वतःचे “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टल सुरू केले. त्यांच्या पत्नी अलकाताई यांनी एम टी एन एल मधून मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली आहे.

या दोघांनी  सामाजिक कामात स्वतःला किती गुंतवून घेतले आहे, हे गेल्या सात आठ महिन्यात मी स्वतः अनुभवतो आहे. जनसंपर्क क्षेत्रात आवश्यक असलेले सर्व गुण श्री देवेंद्रजी यांच्यात आहेत हे मी पाहतो आहे.  “न्यूज स्टोरी टुडे” या पोर्टलच्या देश-विदेशातील लेखकांनी या दोघा पती-पत्नींच्या  कार्यक्षमतेचा,
कल्पकतेचा, सौजन्याचा आणि आपुलकीचा अनुभव घेतला आहे.

पोर्टल आता एक वर्षाचे झाले. ७२ देशातून त्यांना वाचक मिळाले आहेत, असंख्य  ठिकाणाहून त्यांना विविध विषयावरचे लेख मिळत आहेत. यात अनेक लेखक असे आहेत  की त्यांनी पूर्वी थोडे देखील लिखाण केलेले नाही.

२६ मार्च ला वेबपोर्टलचा पहिला वर्धापन दिन झाला. पुण्यात त्यासाठी एक देखणा  कार्यक्रम झाला.  एकमेकांना यापूर्वी कधीही न पाहिलेले पुण्यातील एकोणीस-वीस  लेखक- लेखिका स्नेहमेळाव्याला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाची  संधी भुजबळ दांपत्याने मी आणि माझी पत्नी शलाका यांना दिली. या दोघांनी आयुष्यात किती माणसं जोडली आहेत, किती जणांना आपापल्या जीवनाला नवा अर्थ मिळवून दिला आहे याची कल्पना आली. चार साडेचार तास चाललेल्या   स्नेहमेळाव्यात कविता आणि यश कथा ऐकायला मिळाल्या. रूढ अर्थाने मी या दोघांपेक्षा वयाने मोठा, ज्येष्ठ पत्रकार. माझा अनुभवदेखील त्यांच्यापेक्षा वेगळा. तरी देखील १९६९-७०  ते २०२२ एवढ्या प्रदीर्घ काळात मी करू शकलो  नाही किंवा मी केले नाही एव्हडे  काम श्री भुजबळ यांनी  लिलया कोणताही आविर्भाव, अभिनिवेश न ठेवता केले आहे. कसं  ते सांगतो.

आयुष्यभर मी इंग्रजी वर्तमानपत्र आणि वृत्तसंस्था यासाठी इंग्रजीत लिहिण्याचे काम केले. माझ्या कामाच्या स्वरूपामुळे  मराठी लिहिण्याची वेळ मला आली नाही. गरज भासली नाही. पण निष्णात संपादकाप्रमाणे त्यांनी मला मराठीत लिहितं केलं. बातमीदारी करताना मला आलेले अनुभव दर आठवड्याला शुक्रवारी प्रसिद्धीसाठी त्यांना मी पाठवायला लागलो. आयुष्यभराचे माझे अनुभव दोन तीन लेखात संपतील अशीच माझी कल्पना होती. प्रत्यक्षात 28 लेख गेल्या आठवड्यापर्यंत लिहून झाले. हाताने मराठी लिहितांना कंप पावतो म्हणून मी लिहीतच नव्हतो. गूगल व्हॉइस टाईपिंग  ॲप चा वापर करून मी माझ्या स्मार्ट फोनवर मराठी डिक्टेट करून लिहू लागलो. सुरुवातीला थोडा अडखळलो, पण आता चांगलाच सरावलो आहे.

वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी हे एक व्यवधान लावून घेतले आहे. माझ्या पत्रकारितेशी संबंधित असा एक नवीन व्याप लावून घेतला आहे, तो केवळ आणि फक्त देवेंद्र भुजबळ यांच्या मुळे !.

“ऑनलाईन पत्रकारिता” हा शब्द देखील देशात कुणाला माहित नव्हता त्यावेळी या विषयावर पहिली पीएचडी मी वर्ष 2000 मध्ये केली, असा माझा गौरव होतो. परंतु स्मार्टफोनचा आणि गूगल व्हॉइस टाईपिंग चा वापर करण्याचं तंत्र मी आत्मसात करू शकलो   केवळ भुजबळ पती-पत्नी यांच्या वेबपोर्टलच्या धडपडी मुळे. माझ्यासारख्या असंख्य लेखकांना या दाम्पत्याने मराठी लिहिण्याची संधी दिल्यामुळे. केव्हढे नवे विषय लिहिले गेले !  चार पाच लेखकांना तर आपापली पुस्तके प्रकाशित करण्याचा हुरूप आला आहे.

पहिल्या वर्धापन दिनाच्या चार तास झालेल्या या कार्यक्रमात माझ्या मनामध्ये हेच विचार सातत्याने येत होते. माझ्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली हे भुजबळ दाम्पत्यांना कळले असल्यामुळे खूप आपुलकीने, प्रेमाने देखणा जन्मदिन त्यांनी घडवून आणला. या गेल्या  ७५ वर्षात मला इतके अवघडल्यासारखे कधीही झाले नव्हते ! पण या दाम्पत्याच्या आणि प्रथमच ओळख झालेल्या उपस्थित एकोणवीस-वीस लेखकांच्या उत्स्फूर्त शुभेच्छांच्या ओझ्यामुळे दबून गेलो.

आभार कसे मानावे हे सुचले नाही. पुण्याच्या विश्वकर्मा विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे माझे दोघे सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी-लेखक यांना या दाम्पत्याने छान व्यासपीठ दिले आहे, त्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेच्या भावना  प्रातिनिधिक ठराव्या.  वेबपोर्टलच्या प्रथम वर्धापन दिनी पोर्टल ला आणि भुजबळ दाम्पत्याला शुभेच्छा याच: शतायुषी भव !

– किरण ठाकूर

४) मला व्यक्त होण्याची संधी दिल्याबदद्ल खूप खूप धन्यवाद🙏🏻
सर्वांना भेटून छान वाटले…
नवीन ओळखी झाल्या. ठाकूर सर आणि परिवाराने छान आदरातिथ्य केले…. वेगळे विचार ऐकता आले… आपला उभयतांचा उत्साह तर लाजवाब💐💐
ऊर्जा मिळाली…
पुन्हा धन्यवाद.

– पद्मजा नेसरीकर, कवयत्री. पुणे

५) || गुरुकृपा ||
नमस्कार मंडळी..
२६ मार्च रोजी झालेला आपला स्नेहमिलन कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला.
डॉ ‌किरण ठाकूर सर तसेच अनेक जाणकारांचे विचार ऐकायला मिळाले. आपणां सर्वांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करण्याची कल्पना काही जणांनी मांडली, जी अतिशय चांगली आहे.
श्री देवेंद्र भुजबळ, सौ. अलका वहिनी आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन. तसेच त्यांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा..!💐💐🙏

– प्रशांत थोरात कार्यवाह, गुरुकृपा स्वयंसेवी संस्था. पुणे

६)  नमस्कार 🙏🏻
पत्रकारनगर येथे श्री. किरणजी ठाकूर यांच्या घरी आयोजित केलेला स्नेहमिलन कार्यक्रम खूप साध्या पद्धतीने पण कायमस्वरूपी स्मरणात रहाणारा असा झाला.

अनकोत्तम लेखक, कवी, कवयत्री, प्राचार्य, पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते असे एक से बढकर एक, असे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रत्येकाने आपली ओळख करून देताना सर्वांनीच सौ अलका ताई व श्री. देवेंद्रजी भुजबळ यांच्या कार्याचे कौतुक तर केलेच आणि शुभेच्छा देखील दिल्या.

नेहेमीच बरेचसे कार्यक्रम हे मोठमोठे हॉल, स्टेज अशा वातावरणात झालेले मी पाहिले. पण ह्या कार्यक्रमात जो आपलेपणा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले आदरातिथ्य यामुळे आम्ही सर्वच जण खूप भारावून गेलो. पहिल्यांदाच आम्ही सर्वच जण भेटलेलो, पण जणू काही वर्षानुवर्षे आम्हा सर्वांची ओळख असावी असे सगळे वावरत होतो.

लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सगळेच या कार्यक्रमात आनंदाने उत्साहाने बोलत होते. कवितेचं सादरीकरण, नृत्य, अल्पोपहार असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री. किरणजी ठाकूर आणि सौ. शलाका ताई ठाकूर तसेच त्यांचे कुटुंबीय आणि सौ. अलकाताई भुजबळ व देवेंद्रजी भुजबळ यांचे मनःपूर्वक आभार🙏 असेच कार्यक्रम वरचेवर आयोजित करून नवनवीन कलाकारांना संधी देत रहा. आमचे प्रेरणास्थान तर तुम्ही सर्वंच जण आहात, त्यामुळे पुन्हा भेटूच.😊

– सौ. मंजुषा राजेश किवडे, पुणे

७) अवचिता परिमळू
अचानक अलकाचा मेसेज आला आम्ही पुण्यात येत आहोत. इतका आनंद झाला त्या क्षणी, की आता अलकाची भेट होणार !

अलकाची पहिली फोन भेट सात महिन्यांपूर्वी झाली होती. पहिल्या भेटीतच मन जिंकण्याची कला तिच्यात आहे. परकेपणा कधी जाणवलाच नाही.
देवेंद्रजींची कालची पहिली भेट. पण इतक्या आपुलकीनं त्यानी आम्हा सर्वांचं स्वागत केलं की माणुसकी पुरस्काराचे मानकरी कसे झाले असतील ह्याची पूर्ण कल्पना आली.

तिथे जमलेली सर्वच मंडळी मोकळ्या मनाची वाटली. श्री. किरण ठाकूर आणि त्यांच्या पत्नीने अगदी अगत्याने सर्वांची विचारपूस करून परकेपणा क्षणात घालवून टाकला.
आलेल्या प्रत्येकाचं क्षेत्र वेगळे होते. परंतु काव्य वाचन, लिखाण ह्यात सर्वानाच रस असल्यामुळे आपल्या छोट्याशा मेळाव्यात रंग भरला गेला.

पत्रकारिता काय असते ह्याची जाणीव श्री सुनील कडूसकर ह्यांच्या कथनातून झाली. दोन विद्यार्थिनी ह्यात सामील झाल्या होत्या. त्यांची कविता, कामातले अनुभव ह्यांनी वातावरण भारून टाकलं . ह्या वयात जगाची इतकी जाण असणं अतिशय कौतुकास्पद आहे.

डॉक्टर डागांचा उत्साह तर सर्वांना लाजवणारा होता. नृत्याची झलक दाखवून सत्तरींतही तारुण्य कसं टिकवून ठेवावं ह्याच उत्तम उदाहरण घालून दिलंय त्यानी.

अशाच भेटी वारंवार होत राहोत हीच मनापासून ईच्छा आहे. भुजबळ आणि ठाकूर परिवाराचे मनापासून आभार मानते त्यांच्यामुळे आज आपण सर्व एका मैत्रीच्या बंधनात बांधले गेलो अन् ह्या घरगुती समारंभात एक अवीट गोडी निर्माण झाली…
मधुर सहवासात तुमच्या नाहले माझे मन
आनंदाचे मनी तरंग उठती जवा भेटती सज्जन !– सुनंदा पानसे. पुणे

८) अरे वा, किती छान. संमेलन आवडलं हे एैकून आनंद झाला. भुजबळांशी प्रत्यक्ष भेट व ओळख झाल्याने चांगलं वाटलं असणार. खुप साधे, मेहनती व समाजकार्याची मनापासून आवड आहे, असे वाटते.

लीना फाटक

– सौ लीना फाटक. यु.के.

९) नमस्कार, अलका मॅडम आणि देवेंद्रजी..
आपल्या दोघांशी ओळख झाली, फार बरे वाटले.म्हटलं तर औपचारिक, म्हटलं तर अनौपचारीक कार्यक्रम होता कालचा..

आपण दोघे मुंबईहून येऊन 1 दिवसात सर्व मॅनेज केलेत, विशेष वाटले. प्रा. डॉ. किरणसर आणि सौ. शलाका मॅडम, दोन वडीलधाऱ्या पण तितक्याच खेळीमेळीने कार्यक्रमात सहभागी झालेल्या उभयतांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला होते..
त्यांचे 5 सवाष्णींनी औक्षण केल्यामुळे कार्यक्रमाला एक प्रसन्नता आली. स्नेहसंमेलनाचे रूपांतर एकदम भावपूर्ण सोहळ्यात झाले या औक्षणामुळे.. आपणा चौघांसही मनःपूर्वक धन्यवाद !🙏
या प्रसंगी सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सादर केलेली माझी कविता आपल्या वाचकांसाठी देत आहे.

बुक-मार्क..!
असं काय घडतं,
एक रात्र संपल्यावर,
पण मस्त वाटतंच ना वाढदिवस आल्यावर..!

कळत नाही, ती असते बेरीज, का वजाबाकी,
तरीही उत्तराशिवाय, वाटतंच ना मस्त किती..!

फिल्मी दुनियेत असतो, त्या दिवसाला चार्म..
आणि खरंच असतेही, किती हौस ती छान..!

केक आणि आईसक्रीममध्ये आता काय अप्रूप..
तरीही औक्षणाच्या वेळी, प्रसन्न वाटतेच ना खूप…!

पाने चालले आहे उलटत, अजून किती ?
आज तर आहे ना वाढदिवस,
मग कशाला गिनती !

हसत जगीन रसिकतेने, पुढेही अजून..
आज तर आहे वाढदिवस,
घेईन ना जगून..!

संपत आला आजचा दिवस, रात्र येऊ नये एव्हढ्यात !
तुमच्या शुभेच्छांचं मोरपीस, ठेवीन ना बुक-मार्क म्हणून हृदयात..!🙏– सौ अनुराधा जोगदेव.

१०) आयुष्यात वेळोवेळी अनेक आनंदाचे क्षण वेचले. माझ्या या आनंददायी क्षणांच्या ओंजळीत काल असाच एक अपार आनंददायी क्षण पडून माझी ओंजळ भरून गेली..
निमीत्त होते, न्यूज स्टोरी टुडेचं, पत्रकार नगर पुणे येथे संपन्न झालेले स्नेह मिलन. ज्येष्ठ पत्रकार आणि      एनएसटी चे आवडते लेखक डाॅ. किरण ठाकूर यांच्या निवासस्थानी हे स्नेह मिलन उत्कृष्टपणे आयोजित केले होते. डॉ. किरण ठाकूर यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस हेही एक औचित्य होतेच. एक दुग्धशर्करा योगच म्हणू या !वातावरण अतिशय आनंदी, प्रसन्न होते. अगदी जिन्याच्या पहिल्या पायरीपासून मोगर्‍याचा दरवळ मनाला ऊत्तेजित करत होता. सौ. शलाका ठाकूर सुहास्य वदनाने सर्वांचे स्वागत करत होत्या. देवेंद्रजी आणि अलकाताई हे तर टवटवीत दांपत्य !
प्रत्येकाची आवर्जून चौकशी करत होते. त्यामुळे येणार्‍या प्रत्येकाला, “बरे झाले आपण आलो.” असेच वाटत होते.
मोगर्‍याचे गजरे, गुलाबांची फुलं देऊन केलेलं हे मधुर आणि सुगंधी स्वागतानेच सारे भारावून गेले.
अलकाताईंनी हसतमुखाने कार्यक्रमाची सुरवात केली. शाल पगडी श्रीफळ अर्पून डॉ.ठाकूरांना सर्वांनी वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. सुरेख घरगुती केक, दिव्यांची आरती असा परंपरा जपणारा तो वाढदिन.

शलाकाच्या नयनातली ती तृप्ती आणि आनंद केवळ अलौकिक ! तिचीही साडी चोळीने ओटी भरली.
एनएसटी परिवाराशी अनेक कारणाने जोडलेली माणसे तिथे उपस्थित होती. वास्तविक वेबपोर्टलवर आॉनलाईन सगळेच परिचित होते. पण प्रत्यक्ष भेटीचा हा सोहळा अपूर्वच होता !

गंमत म्हणजे पहिल्या भेटीतच सारेच चिरपरिचित होऊन गेले. सगळा औपचारिकपणा गळून गेला.
प्रत्येकाने करुन दिलेल्या परिचयातून सतत जाणवत होतं की, हा परिवार विशेष आहे. आणि आपण या परिवाराचा भाग आहोत याचा अभिमान वाटत होता. साहित्य, कला आणि माणसे जोडण्याचा हा भुजबळ दांपत्याचा छंद थक्क करायला लावत होता. जगात अशीही माणसे असतात हे फीलींग खूप आनंददायी होतं.
भरभरुन सगळे बोलत होते. सगळ्यांच्या विचारातील आणि कार्यातील रचनात्मकता सकारात्मकता जाणवत होती. विविधांगी आव्हानात्मक क्षेत्रात वावरणारी ही माणसं केवळ या वेबपोर्टलमुळे इतकी जवळून भेटली… कुणाकुणाची नावे घेऊ ?

डॉ.ठाकूर, टाकळकर, ऊज्ज्वलाताई, डॉ विद्या डागा, श्री सुनील कडुस्कर, डॉ राणी खेडीकर, सुनंदा पानसे, जोगदेव, सुश्री प्रशांत जगताप… आणि कितीतरी..
मस्त फोटो सेशनही झाले..
निरोप घेताना प्रत्येक जण हेच म्हणत होता…’पुन्हा भेटूया..
नेहमी नेहमी भेटूया !”

मीही भुजबळ दांपत्यांचं निखळ हास्य आणि एक परमोच्च आनंदाचा अविस्मरणीय क्षण घेऊन परतले…

– राधिका भांडारकर

११) खरोखरच आपला स्नेह मेळावा अगदी घरगुती स्वरूपाचा अनौपचारिक असा झाला. आपण जे रोज वाचतो पोर्टलमधे, त्यांना प्रत्यक्ष पहाणे हा योगच भारी होता. अलकाचा उत्साह, त्या दोघांची वेबपोर्टल वर स्टोरी पब्लिश करताना होणारी अथक मेहनत आणि नवोदितांना देत असलेलं उत्तेजन पाहून थक्क व्हायला होतं. त्यांची ही ऊर्जा, उत्साह असाच बहरत राहो हीच प्रार्थना !!
वेबपोर्टल वर लिहिणाऱ्या पुण्यातल्या सर्व कवि, लेखक, लेखिका ह्यांच्याकडून त्यांचे खूप सुंदर अनुभव, त्यांचा प्रवास, त्यांचं समाजकार्य, खिलाडूवृत्ती ह्याचं हृद्य दर्शन झालं.

श्री व सौ ठाकूर तसेच इतर पत्रकार ह्यांचे अनुभव खूप काही शिकवून गेले. मला काही कारणास्तव लवकर निघावे लागले त्यामुळे सादर केलेल्या कविता ऐकायला नाही मिळाल्या. तर अलका, तुम्ही त्या कवितांना आपल्या पोर्टल मधून प्रसिद्धी द्यावी म्हणजे सर्वानाच त्याचा आस्वाद घेता येईल.

पुन्हा एकदा अलका व देवेंद्रभाऊंना खूप खूप धन्यवाद
पोर्टलला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!!!🙏🏻💐🤝🏻🥰

– नीता देशपांडे. पुणे

१२) श्री.देवेंद्र भुजबळ व सौ.अलका भुजबळ, संपादक, न्यूज स्टोरी टुडे.
नमस्कार.
न्यूजस्टोरीटुडे च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त 26 मार्च रोजी आयोजित स्नेह मेळाव्यात आपण आम्हां पुण्यातील लेखकांना सहभागी करून घेतलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

आपण अत्यंत उत्साहाने या कार्यक्रमाचे नियोजन केले. ज्येष्ठ पत्रकार, आपले गुरु व ज्येष्ठ लेखक श्री. किरण ठाकूर सरांचा 75 वा वाढदिवस साजरा करून त्यांच्याबद्दलचे ऋण व्यक्त करण्याची कल्पकताही दाखविलीत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हालाही सरांना शुभेच्छा देऊन त्यांचे आशिर्वाद घेण्याचे भाग्य लाभले.

न्यूज स्टोरी टुडे द्वारे गेले वर्षभर भेटत असलेल्या अनेक लेखकांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्याशी हितगुज करण्याची व त्यांना जाणून घेण्याची संधी यामुळे मिळाली. त्यांच्यातील सुप्त कलागुणही या कार्यक्रमामुळे समोर आले.

नवोदित लेखकांसाठी आपण उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठामुळे अनेकांना लेखनाची प्रेरणा मिळत असून नवे विचार जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचत आहेत.

या कार्यक्रमाचे नियोजनही आपण अत्यंत नेटके केले होते. एक उत्तम आनंद सोहळा अनुभवण्याचे भाग्य त्यामुळे आम्हाला लाभले. या कार्यक्रमासाठी आपण खास मुंबईहून पुण्यात आलात. आपले खूप खूप आभार व न्यूज स्टोरी टुडे पोर्टलला पुन्हा एकदा शुभेच्छा.💐

– सुनील कडूसकर,
सौ नीलम कडूसकर.

१३) आपल्या स्नेह मिलनात व्यक्तिगत पातळीवरील जिव्हाळा, कोणतेही औपचारिक उपक्रम न घेता सर्वांना मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली. अतिशय उपयुक्त असा उपक्रम होता. बैठकीचे स्वरूप कौटुंबिक स्वरूपाचे व जिव्हाळ्याचे होते. अशाच बैठका सतत व्हाव्यात. सर्वांना परगावी जाणे शक्य नसते. मात्र स्थानिक ठिकाणी येणे सहज शक्य होईल. आणि त्यात संख्या हा यशाचा निकष मानू नये.अगदी तीन चार लोक आले तरी चालेल. अशा बैठकांची वारंवारिता तीन चार महिन्यांची असावी. शनिवारच्या बैठकीतून मला तर अनेक क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तिंना भेटण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
मला जायची घाई होती. अन्यथा माझी एक कथा व कविता मला वाचायची होती. पण मी आपल्या वाटसॅपवर किंवा ईमेलवर त्या पाठवीनच.

– प्रा डाॅ.सतीश शिरसाठ

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. अलका स्नेहमिलन कार्यक्रम संगमनेरला करण्याची तूझी कल्पना मला खूप आवडली. मला आपल्या त्या दिवसांची आठवण झाली. आपणही संगमनेरला खूप धमाल केली होती. तूझे आदरातिथ्य मी अनुभवले आहे. अलका तू आणि देवेनचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. सामाजिक कार्यात तूम्ही छान गुंतवून घेतले आहे.

  2. फारच छान स्नेह मिलन साजरे झाले, मी पुण्यात असतो तर ह्या स्नेह संमेलनात सहभागी व्हायला निच्छित आवडले असतें. देवेंद्र सरांना, पुढील पुण्यातील कार्यक्रमांना मला बोलावणे शक्य असेल तर मलाही आमंत्रण मिळाल्यास मला आनंदाची होईल…… श्रीकांत चव्हाण 🙏

  3. यु के चं आमंत्रण! खूपच छान वाटतंय.☺️
    यायला नक्कीच आवडेल. काही इकडचे,काही तिकडचे असं स्नेह मिलन छान होईल👌

  4. खूप सुंदर स्नेहमिलन व त्याचे यथार्थ वर्णन ,सर्वांचे अभिप्राय वाचून ,स्नेहमिलनाला उपस्थीत राहता न आल्याची खंत वाटली.

  5. हे संम्मेलन झाल्याच मला सुनंदा पानसे कडून कळल. खुपच लांब असल्याने सहभाग घेतां आला नाही याची हळहळ मात्र नक्कीच वाटली. संम्मेलनाची कल्पनाच अतिशय सुंदर.या जगावेगळ्या भुजबळ दांपत्यांना भेटण्याचा अलभ्य लाभ तुम्हा सर्वांना मिळाला. दोघांचे वाखाण्यासारखे गुण आहेत. त्यांचा उत्साह, समाजासाठी ते करत असलेल्या मेहनतीसाठी, त्यांना दिर्घायुष्य लाभो हि प्रभुचरणी प्रार्थना. हे वेबपोर्टल एक वर्षाचे झाले. खुप खुप अभिनंदन. तसंच श्री किरण ठाकूर यांनाहि ७५व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभकामना. पोर्चलवरच्या सर्व लेखक, कवींच्या नावाला फोटोंमुळे चेहरा मिळाला. त्यासाठी धन्यवाद. हा उपक्रम असाच चालू राहो हि सदिच्छा. मग, आता यु.के. ला कधि येताय? सर्वांचे स्वागत आहे.

  6. 🌹एक विचार एक व्यक्ती, त्यातून निर्माण होणारी विचारधारा हेच यातून सिद्ध होतय. 🌹
    अभिनंदन आपण छान उपक्रम केलाय.

    विचारधारेचा हा महासागर 🌹
    भुजबळ साहेब आणि सर्व मान्यवरांचे अभिनंदन🌹🌹

    अशोक बी साबळे
    Ex. Indian Navy
    महाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी