Thursday, December 26, 2024
Homeपर्यटनअंदमानची सफर भाग २

अंदमानची सफर भाग २

चुनखडीची गुहा, बाराटांग

‘It’s not the destination, it’s the journey’ हे अचूक वाक्य ‘राल्फ वाल्डो इमर्सन’ या अमेरिकन तत्त्वज्ञाचे वाचनात आले आणि त्याची प्रचिती प्रत्येक ठिकाणी आयुष्यात येत गेली. आजही ते आठवायचे मुख्य कारण म्हणजे अंदमान येथील ‘बाराटांग’ या बेटावर आम्ही ‘चुनखडीची गुहा’ पाहण्यासाठी गेलो होतो. अंधारात, ओलसर लेण्यांच्या आत प्रचंड गाळाच्या चुनखडीच्या रचना शास्त्रज्ञ वा सामान्य पर्यटक दोघांनाही मोहिनी घालतात. परंतु या स्थळापर्यंतचा पोहोचण्याचा प्रवास आपल्या आनंदात अधिकची निश्चितपणे भर घालणारा ठरतो.

‘गुहा’ या शब्दाचा शोध घेतला तेव्हा अशी माहिती मिळाली की डोंगर अथवा भूगर्भात जिथे माणूस सहज जाऊ शकेल इतपत मोठी निसर्गनिर्मित पोकळी. गुहा या दोन प्रकारच्या असतात एक निसर्गनिर्मित आणि दुसऱ्या म्हणजे मानवनिर्मित. बाराटांग येथील ही चुनखडीची गुहा निसर्गनिर्मित आहे.
श्री विजयपुरम (पोर्ट ब्लेअर) येथून रांचीवालास बेट म्हणजेच बाराटांगकडे येताना ‘जरावा आदिवासी’ क्षेत्रातून आम्ही प्रवास केला. वाहनांना, विशिष्ट अंतराने, केवळ एका काफिल्याद्वारे या प्रदेशातून जाण्याची परवानगी आहे आणि तेथे कोणतेही थांबणे किंवा फोटो व्हिडिओ काढण्याची परवानगी नाही. येताजातानाच्या प्रवासात आम्हाला काही जरावा आदिवासी दिसले. मिडल स्टेट जेट्टी वरून सरकारी फेरी बोटीतून वीस मिनिटात आम्ही बाराटांग जेट्टीवर आलो. त्यानंतर पंचवीस-तीस मिनिटांच्या, निळ्याशार स्वच्छ समुद्रातून, स्पीडबोटीतून एका सुंदर सागरी प्रवास केला. घनदाट खारफुटीच्या जंगलातून चित्तथरारक प्रवासाचा आनंद अवर्णनीय आहे. खारफुटीच्या झाडांचे छत बनलेल्या अरुंद खाडीसदृश भागातून बोटीचा प्रवास आहे. हेंटल, सुंदरी, बटनवुड आणि काळ्या खारफुटीच्या झाडांच्या जाड पानांमुळे सूर्यप्रकाश असूनही खाली सावली आणि सुखद गारवा जाणवला.

आमच्यातल्या कोणीतरी अंगावरचे सुरक्षा जॅकेट काढून फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना तो बोटचालक जवळजवळ किंचाळलाच ! त्याला मदत करणारा मदतनीस माझ्या बाजूला बसला होता. मी त्याला सहजच विचारले, “आम्ही घातलेल्या या लाईफ जॅकेटमुळे शंभर टक्के वाचणार का ?” तो त्वरेने उत्तरला,
“तुम्ही पाण्यात शंभर टक्के बुडणार नाही परंतु तुम्ही पाण्यात पडताक्षणी असंख्य मगरी तुमच्यावर तुटून पडतील त्यामुळे तुम्ही शंभर टक्के वाचणार नाही. “हे ऐकून माझ्यासहित सगळ्यांचाच थरकाप उडाला. येथील मगरींविषयी मी अनेक कथा वाचल्या होत्या ते आठवले. त्यामुळे एका स्पीडबोटीत दहापेक्षा जास्त प्रवासी ते घेत नव्हते याचे कारण कळले आणि बोटचालक आणि त्याचा मदतनीस या दहा माणसांवर जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते की कोणी पाण्यातसुद्धा हात घालू नये म्हणून !

तेथे एका लाकडी जेट्टीवर आम्ही उतरलो. ही जेट्टी अत्यंत आकर्षक आहे. त्याच्यावरून चालतांना फोटो काढण्याचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात उष्णकटिबंधीय जंगलातून कधी खाली कधी वर उतरत, दीड किलोमीटरचा चालल्यावर आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो. अनेक जुन्या वृक्षांची मूळं इकडेतिकडे निवांत पसरलेली आहेत. या मुळांवर माती अडकून नैसर्गिक पायऱ्या तयार झालेल्या आहेत. अंदमान येथे क्षणात पाऊस तर क्षणात आग ओकणारा सूर्य तळपत असतो. आम्ही गुहेकडे जाताना पाऊस पडत होता. साहजिकच मातीचा हा रस्ता थोडासा निसरडा झाला होता. त्यावर मी पडण्याचाही अनुभव घेतला. रस्त्यात अतिशय सुंदर अशा लाकडाच्या झोपड्या बांधलेल्या आहेत तर छोटे छोटे लाकडी पूलही तयार केलेले आहेत. चालून दमून येणाऱ्या माणसांसाठी चहा नाश्ता आणि सरबताचे काही स्टॉलसुद्धा तयार केलेले आहेत जेथे लाकडी बेंचवर निवांतपणे बसून आपण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो ! स्थानिक विक्रेत्यांकडून काळे मीठ, नारळ पाणी तसेच आणखीही काही मसाले लावून विकत घेतलेल्या कच्च्या कैरीचे तुकडे इतकेच चविष्ट होते की ती चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.

गुहेत, शंकूच्या आकाराचे, तुलनेने रुंद प्रवेशद्वार आहे आपण आज जसे पुढे जातो तसतशी ती पायवाट अधिकाधिक अरुंद आणि गडद होत जाते. छताकडे पाहिल्यावर, एखाद्याला फक्त दोन लहान छिद्रे दिसतात ज्याद्वारे संपूर्ण गुहेला प्रकाश आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो. भूकंपानंतर ही गुहा समुद्राच्या तळातून बाहेर पडल्याचे सांगितले जाते. बोटचालकासोबत असणारा सहाय्यक हा मार्गदर्शकाने (गाईड) काम केले. कार्बन डायऑक्साईडवर रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे नैसर्गिकरीता गुहेच्या छतावर आणि भिंतींवर विविध विचित्र रचना तयार झाल्याचे, मार्गदर्शकाने मोबाईलचा लाईट वा टॉर्च वापरून दाखवले.
चुनखडीच्या गुहा निर्मिती ही एक ‘नैसर्गिक वास्तुकला’ आहे. चुनखडी विरघळल्याने गुहा तयार होतात. पावसाचे पाणी हवेतून कार्बन डाय ऑक्साईड आपल्यात सामावून घेते आणि ते जमिनीत झिरपते, ज्याचे सौम्य आम्लामध्ये रूपांतर होते, यामुळे जिथे चिरा, मोकळी जागा वगैरे असतात तिथे चुनखडी हळूहळू विरघळते, ज्यापैकी काही गुहा तयार करण्यासाठी पुरेसे मोठे होतात. स्टॅलेग्माइट्स, स्टॅलेक्टाईट्स आणि फ्लो स्टोन नावाच्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या गुहा आकर्षक आकारांनी सुशोभित आहेत.

गुहेचा आतील भाग ओलसर आणि निसरडा आहे. गुहेच्या आतल्या तुलनेने विस्तीर्ण भागात, स्टॅलेक्टाईट्स छतावरून झुंबरांप्रमाणे लटकतात तर भिंतीसदृश भागात, स्टॅलेग्माइटची रचना फुलांच्या गुच्छ किंवा हत्तीच्या डोक्यासारखे आकार घेतल्यासारखे जाणवतात. काही ठिकाणी, वरून आणि खालून येणाऱ्या चुनखडीच्या रचना एकत्र येऊन खांब तयार झालेले आहेत.
एका ठराविक बिंदूनंतर, गुहेच्या आतील भागात पर्यटकांना जाण्याची परवानगी नाही. कारण तिथे नवनवीन चुनखडीच्या रचना तयार होत आहेत शिवाय तिकडचा भाग अरुंद असल्यामुळे जाताना या रचनांना आपला स्पर्श होऊ शकतो. ज्या भागांमध्ये चुनखडीच्या रचना तयार होत आहेत त्या रचनांना जर चुकूनही आपला स्पर्श झाला तर ती रचना पुढे वाढण्याचे आपोआप थांबते. ज्या रचनांना आत्तापर्यंत स्पर्श झाले आहेत त्या काळ्या रंगात बनलेल्या दिसतात तर नवीन बनणाऱ्या रचना या अतिशय सुंदर पांढऱ्याशुभ्र चकचकीत आकर्षक दिसतात.

पर्यटकांना या चुनखडीच्या रचनांमध्ये कधी देवदेवता, प्राणी, पक्षी किंवा एखाद्या प्रसंगाचे आकार दिसू शकतात. ते आपल्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे.त्यामुळे श्रद्धाळू माणसाला तिथे तेहतीस कोटी देवांचे दर्शन झाल्याचे समाधान मिळू शकते ! शेवटी समाधान हे मानन्यावरच असते ना…!
चुनखड जशी विरघळते आणि इतक्या सुंदर आकारात बदलून त्याला देवत्व प्राप्त करून देते त्याप्रमाणेच चुनखडीच्या या गुहेत आल्यावर, मनातील सर्व वैषम्य विरघळून टाका आणि आपल्या पुढील जगण्याला वैश्विक आकारात साकारण्याचा प्रयत्न करा. निसर्गाकडून इतके तर दान आपल्याला सहजी पदरी पाडून घेता येईलच ना ! असो.

या भेटीवर आधारीत व्हिडिओ आपण पुढील लिंक वर क्लिक करून अवश्य पाहा.


क्रमशः

— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९