Thursday, December 26, 2024
Homeसंस्कृतीअसा साजरा करतात, अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन

असा साजरा करतात, अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन

नमस्कार मंडळी.
१ जुलै हा कॅनडा दिवस कसा साजरा होतो, त्या निमित्ताने कॅनडा चा इतिहास, सद्यस्थिती याची छान माहिती तेथील युवा लेखिका प्रियांका शिंदे जगताप यांनी दिली.

तर आज ४ जुलै, या अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेचा इतिहास, सद्यस्थिती, स्वातंत्र्यदिन कसा साजरा करण्यात येतो, याची माहिती घेऊ या… ज्येष्ठ लेखिका, कवयित्री चित्रा मेहेंदळे यांच्या कडून.

अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तेथील मराठी बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या.

असे असले तरी अमेरीका खंड हा युरोपियन लोकांना माहीत नव्हता. १९ नोव्हेंबर १४९३ रोजी क्रिस्टोफर कोलंबस या युरोपियन दर्यावर्दीला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळे व युरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ ९५ टक्के मूळचे अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले.

अमेरिकेला ब्रिटनपासून ४ जुलै १७७६ रोजी स्वातंत्र्य मिळाले. कॉन्टिनेन्टल काँग्रेसने स्वातंत्र्याची मागणी केली होती. १३ वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा स्वीकारण्यासाठी मतदान केलं. या वसाहतींच्या प्रतिनिधींनी जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली आणि अमेरिकन जनतेला स्वातंत्र्य मिळालं. या दिवसापासूनच अमेरिकेत स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. पुढे १०० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा जगप्रसिद्ध भव्यदिव्य असा समुद्रात उभा असलेला पुतळा भेट दिला. हा पुतळा स्वातंत्र्य आणि मैत्रीचं प्रतिक म्हणून ओळखला जातो. अमेरिकेत येणारे पर्यटक या पुतळ्याला भेट देतातच देतात. असो…

अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभर अत्यंत धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. उदाहरणच द्यायचे झाले तर मागच्या वर्षीचे देता येईल. अमेरिकेने मागच्या वर्षी ४ जुलैला $2.7 billion इतका खर्च केला होता !

मी प्रथम जेव्हा अमेरिकेत २००८ साली आले, तेव्हा सर्वच गोष्टींचे अप्रूप होते. त्यावर्षी ४ जुलैचे फायरवर्क बघायला जायचे असे आधीपासूनच ठरले होते. अमेरिकेत आपल्यासारखे गल्लोगल्ली, रस्त्यावर, घरासमोर फटाके उडवतां येत नाहीत.
संध्याकाळी ९ वाजता आम्ही चालतच निघालो. कारण जिथे फटाके उडवले जाणार होते ती जागा आमच्या जवळच होती. मोकळ्या जागेत हे फटाके नेहमी उडवले जातात. आणि असे फटाके उडवण्यासाठी अधिकृत, सरकारच्या मान्यतेने, निवड झालेली असते तेच उडवू शकतात. आपण भारतातले लवंगा ते अॅटमबॅाम्ब वाले फटाके म्हणजे धूर, मोठा आवाज, कचरा ठरलेले. पण इथे तसे काहीच नव्हते. बरोबर नऊ वाजता पहिला फटाका वर गेला आणि फुटल्यावर रंगिबिरंगी चांदण्या आणि प्रकाशाच्या लहरी, कारंज्यासारख्या बाहेर उसळल्या आणि wow चे चित्कार आसमंतात घुमले. त्यानंतर अर्धा तास सर्वांच्या माना वर आणि wow! Beautiful चा जप चालू होता. घरी येतांना कशी पिक्चर मध्ये प्रकाशयोजना करतात तसे वेगवेगळे आकार, रंग, डिझाईन्स चालू होते. डोळ्याचे पारणे फिटले म्हणतात ना, तेच म्हटले आम्ही. धूर नाही, आवाज नाही, फक्त रंगसंगती प्रकाशाचा खेळ ! पण त्यासाठी केला जाणारा खर्च वाचला आणि डोळे पांढरे झाले !

न्यूयॅार्कला नदीजवळ सर्वांना दिसेल असे खूप सुंदर firework असते आणि प्रसिध्द मोठे Macy store गेली कित्येक वर्षे ते करते आहे.

मी इथे जेव्हा शाळेतल्या मुलांना, इतरांना विचारले या दिवशी काय करतात ? माहिती सांगा. तर स्वातंत्र्य दिवसाबद्दल फक्त सुट्टी असते, सर्व दुकानं, हॅाटेल्स बंद असतात, त्या आधी दुकानात सेल असतो, इथल्या झेंड्याच्या रंगांप्रमाणे सर्व रंगीत वस्तू मिळतात, शाळा तर बंद असतात पण आम्हाला सुट्टी असते. मग आम्ही ४ दिवस ट्रिपला जातो. सर्व ठिकाणी फायरवर्क असते ते पहातो. बास, त्यांना इतकेच माहिती !

काही ठिकाणी परेड असते. ती पहायला गर्दी असते. घरावर झेंडे फडकत असतात. घरातल्या वस्तू, कपडे सर्व झेंड्याच्या रंगाचे असते. अमेरिकेत बाहेरच्या देशांतून येणारे खूप आहेत, ते सुट्टी मजेत पार्ट्या करून घालवतात. एक मात्र खरे इथे होणारे विलोभनीय फायरवर्क पहाणे हा आनंद अविस्मरणीय असतो.

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९
शारदा शेरकर on अंदमानची सफर : ९